
महायुती सरकारच्या काळात राज्यात गुंडा‘राज’ सुरू असून कायदा-सुव्यवस्थेच्या अक्षरशः चिंधडय़ा उडाल्या आहेत. ठाण्यात प्रदीप पुर्णेकर यांच्या निर्घृण हत्येची घटना ताजी असतानाच मुंबईतील जुहू येथे आज बॉलीवूड अभिनेता टायगर श्रॉफ याच्या कारवर गोळीबार झाला. या हल्ल्यातून टायगर श्रॉफ थोडक्यात बचावला तर त्याच्या चालकासह दोघे जखमी झाले.
टायगर श्रॉफ हा जुहूच्या पुष्पा पार्क येथे फुटबॉलची मॅच खेळण्यासाठी आला होता. मॅच संपल्यानंतर सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास तो घरी परतत होता. कारमध्ये तो पुढच्या सीटवर बसला होता. त्याची कार गेटच्या बाहेर पडताच बाईकवरून आलेल्या दोघांनी कारवर जवळून गोळ्या झाडल्या. त्यांनी तीन राऊंड फायर केले. त्यानंतर हल्लेखोर विलेपार्ले स्टेशनच्या दिशेने पसार झाले.
हल्लेखोरांच्या शोधासाठी 15 पथके तयार करण्यात आली असून जुहू पोलीस व गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे तपास सुरू केला आहे. टायगरचा चालक फिरदोस याच्या हाताला गोळी लागली असून त्याला नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तर जखमी योगेश चव्हाणवर कूपर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हल्ल्यामागे लॉरेन्स बिष्णोई गँग?
लॉरेन्स बिष्णोई टोळीने या हल्ल्याची जबाबदारी घेतल्याचा मेसेज सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. गँगस्टर अनिल पंडित याने ही पोस्ट केल्याचे बोलले जाते. ‘आम्हीच या हल्ल्यामागे आहोत. आम्ही त्याला कॉल करून समजावण्याचा प्रयत्न केला होता, पण त्याने ऐकले नाही. म्हणून आम्ही आज त्याला समजेल अशा भाषेत सांगितले. सलमानसोबत काम करणे थांबवले नाही तर हल्ले सुरूच राहतील. वेट अॅण्ड वॉच,’ अशी धमकी पोस्टमधून देण्यात आली आहे.
























































