
गेल्या काही दिवसांपासून आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर काॅक्रोच जनता पार्टीचे प्रमुख अभिजीत दीपके यांनी दिवाळीपर्यंत कोणत्याही आंदोलनाचे नियोजन नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच, कार्यकर्त्यांनी दिवाळीचा सण आपल्या कुटुंबीयांसोबत साजरा करावा आणि काही दिवस आप्तस्वकीयांसोबत वेळ घालवावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. सौरव दास आणि आशुतोष तुरुंगात असले, तरी त्यांच्या अटकेमुळे आंदोलनातील कार्यकर्ते घाबरून मागे हटणार नाहीत, असा विश्वासही दीपके यांनी व्यक्त केला.
अभिजीत दीपके यांनी आपल्या समर्थकांना ‘कॉकरोच’ असे संबोधत त्यांच्याशी संवाद साधला. गेल्या १० ते १२ दिवसांत आंदोलनाशी संबंधित कार्यकर्ते आणि त्यांच्या कुटुंबीयांना अनेक संकटांचा सामना करावा लागल्याचे त्यांनी सांगितले. आंदोलनात सहभागी असलेल्या काही स्वयंसेवकांना रस्त्यावर मारहाण करण्यात आली, तर ताब्यात घेतल्यानंतरही त्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागला. या घटनांचा परिणाम त्यांच्या कुटुंबीयांवरही होत असून, त्यांच्याही मनात चिंता असल्याचे दीपके म्हणाले. त्यामुळे दिवाळीच्या काळात कार्यकर्त्यांनी आपल्या कुटुंबीयांसोबत राहावे, त्यांच्या भावना समजून घ्याव्यात आणि त्यांना वेळ द्यावा, अशी विनंती त्यांनी केली.
सौरव दास आणि आशुतोष यांच्या कुटुंबीयांशी आपले बोलणे झाल्याचे दीपके यांनी सांगितले. सौरव आणि आशुतोष दोघेही खंबीर असून, त्यांच्या कुटुंबीयांकडूनही त्यांना पाठिंबा मिळत आहे. त्यांच्या अटकेमुळे आंदोलनातील इतर कार्यकर्ते घाबरतील, असे समजू नये, असे दिपके यांनी स्पष्ट केले. “आम्ही मागे हटणार नाही. सौरव आणि आशुतोष तुरुंगात गेले म्हणून आम्ही घाबरणार नाही. आम्ही कोणत्याही चुकीच्या गोष्टीसाठी नव्हे, तर योग्य गोष्टीसाठी लढत आहोत,” असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
संविधानाने दिलेली मूल्ये आणि महात्मा गांधी यांनी दाखवलेला शांतता व अहिंसेचा मार्ग यांवरच आपला विश्वास असल्याचे दीपके यांनी स्पष्ट केले. आंदोलनात सहभागी असलेल्या प्रत्येक स्वयंसेवकाच्या योगदानाची दखल घेतली जाणे आवश्यक आहे. अनेक कार्यकर्त्यांच्या संघर्षाच्या कहाण्या माध्यमांपर्यंत पोहोचत नसल्या, तरी त्यांनीही गेल्या काही दिवसांत मोठ्या अडचणींचा सामना केला आहे, असे त्यांनी सांगितले.



























































