निसर्गमैत्र – कमी पर्जन्य भागातही येणारा बोंडारा

अभय मिरजकर

पावसाचे प्रमाण कमी असलेल्या आणि कायम दुष्काळी भागात वृक्ष लागवडीसाठी एक चांगला पर्याय म्हणजे देशी वृक्ष बोंडारा होय. डोंगर उतारावर आणि कमी पाण्याच्या भागात हा वृक्ष चांगल्या प्रकारे वाढतो. अगदीच लहान झाडालाही फुले येतात. महाराष्ट्राचे राज्यफुल म्हणून ताम्हणची ओळख असलेल्या कुळातील हा देशी वृक्ष आहे. त्याला ‘लेंडी’ म्हणूनही ओळखले जाते. महाराष्ट्रामध्ये कोकणात सर्वत्र नदी-नाल्यांच्या काठांवर बोंडारा आढळून येतो. लातूर जिह्यात मात्र हा वृक्ष दुर्मीळ आहे. देशातील बंगाल, आसाम, म्यानमार, दक्षिण हिंदुस्थान, अंदमान-निकोबार आणि श्रीलंकेतील जंगलांमध्येही तो आढळतो. अतिशय डेरेदार आणि शोभीवंत दिसणारा हा वृक्ष असून दाट सावलीसाठी, रस्त्याच्या कडेला लावण्यासाठी हा उत्तम वृक्ष आहे.

या वृक्षाचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे रेशीम किडय़ांना खाण्यासाठी यांची पाने अतिशय उपयुक्त आहेत. महाराष्ट्रातील लातूरसह काही जिह्यांत रेशीम उत्पादन वाढत आहे. लातूर जिह्यात पावसाचे प्रमाण कमी आहे. दर दोन-तीन वर्षांनी दुष्काळाचा सामना करावा लागतो. त्यामुळे या वृक्षाची लागवड करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले पाहिजेत.

या झाडाचे लाकूड उंच, मजबूत, टिकाऊ, चमकदार लाल रंगाचे आहे. सागाला पर्याय म्हणूनही ते वापरले जाते. या लाकडावर उत्तम प्रकारे कोरीवकाम करता येते. समुद्राच्या पाण्याचाही लाकडावर परिणाम होत नाही, ते लवकर कुजत नाही. त्यामुळे बंदरामध्ये खांब रोवण्यासाठी व बोटीसाठी या लाकडाचा वापर केला जातो. तसेच इमारती, पूल आणि विहिरीचे बांधकाम, जहाज बांधणी, रेल्वे

वॅगन, शेतीची अवजारे, लाकडी खेळणी तसेच विविध प्रकारच्या वस्तू बनविण्यासाठी याच्या लाकडाचा उपयोग होतो. बोंडाराचा डिंक उत्तम प्रतिचा आहे, गोड चवीचा आणि खाण्यासाठी योग्य आहे. औषधांमध्ये याचा वापर केला जातो. झाडाची साल औषधी आहे. सालीचा काढा ताप आल्यावर दिला जातो. तसेच झाडाच्या सालीचा काळा रंग तयार करण्यासाठीसुद्धा वापर होतो.

[email protected]