
हत्येच्या गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपीला गुन्हे शाखेने अटक केली. अजय पवार असे त्याचे नाव आहे. तो मानखुर्द परिसरात स्वतःची ओळख बदलून राहत होता. त्याला पुढील तपासासाठी ट्रॉम्बे पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
अक्षय तिकुडवे हा नवी मुंबई येथे राहत असून तो पिण्याचे पाणी पुरवण्याचे काम करायचा. दोन वर्षांपूर्वी तो ट्रॉम्बे येथे त्याच्या मित्रांना भेटण्यासाठी आला होता. तेव्हा पूर्ववैमनस्यातून अक्षयवर काही जणांनी धारदार शस्त्राने वार केले होते. छातीवर, पोटावर आणि डोक्यावर गंभीर दुखापत झाल्याने अक्षयला उपचारासाठी गोवंडी येथील शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले; परंतु तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. अक्षयच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून ट्रॉम्बे पोलिसांनी गुन्हा नोंदवला होता.
गुन्हा दाखल होताच चार ते पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. मात्र, इतर फरार आरोपींचा शोध स्थानिक पोलीस आणि गुन्हे शाखेचे पोलीस घेत होते. शोधमोहिमेदरम्यान फरार आरोपी अजय पवार हा मानखुर्द येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. सहाय्यक निरीक्षक नवनाथ काळे, उपनिरीक्षक शरद नाणेकर, तुपे, बोडारे, मयूरी पाटील आदींच्या पथकाने तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांनी अजयला महाराष्ट्र नगर येथील एका चाळीजवळून ताब्यात घेऊन अटक केली. पुढील कारवाईसाठी त्याला ट्रॉम्बे पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.





























































