रेल्वे हद्दीतील अपघाती मृत्यू आणि गुन्ह्यांचे प्रमाण घटले, पोलिसांच्या प्रभावी उपाययोजना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रेल्वे हद्दीत दररोज कुठे ना कुठे अपघाती मृत्यू तसेच वेगवेगळे गुन्हे घडत असतात. ते रोखण्यासाठी सर्व स्तरावर सातत्याने प्रयत्नदेखील केले जातात. प्रशासनाच्या मदतीने रेल्वे पोलिसांनी प्रभावीपणे राबवलेल्या उपाययोजनांमुळे गेल्या सहा महिन्यांत या दोन्ही बाबतीत दिलासादायक चित्र दिसून येत आहे. वर्ष 2019 च्या तुलनेत या वर्षी अपघाती मृत्यू आणि गुन्ह्यांच्या प्रमाणात घट झाली आहे.

उपनगरीय लोकल तसेच लांब पल्ल्यांच्या मेल गाडय़ा प्रवाशांनी खचाखच भरून धावत असतात. प्रवाशांच्या होणाऱया गर्दीचा समाजकंटकांकडून सर्रास गैरफायदा उचलला जातो. गुन्हेगार चोरी, दरोडा, विनयभंग आदी गुन्हे करतात. एका बाजूला गुन्हे तर दुसऱया बाजूला अपघातात मृत्यू होण्याच्या घटनादेखील घडत असतात. त्यामुळे याची गंभीर दखल घेत रेल्वे पोलिसांनी प्रशासनाच्या मदतीने काही महत्त्वाची पावले उचलली. गुन्हे आणि अपघाताच्या घटना कशा रोखता येतील, त्यासाठी काय केले पाहिजे याचा आराखडा बनवला आणि त्यानुसार प्रभावी अंमलबजावणी सुरू केली.

  • रेल्वे पटरीलगतच्या संरक्षक भिंती तोडून तेथून लोक ये-जा करायचे. परिणामी अपघात व्हायचे. त्यामुळे त्या भिंती मजबूत करून लोकांची ये-जा थांबविण्यात आली. पटरी तसेच स्थानकांवर प्रभावी गस्त सुरू केली. विविध माध्यमांतून सातत्याने जनजागृती करण्यावर विशेष भर दिला जात आहे. लाइन क्रॉसिंग करणाऱयांना अटकाव केला जात आहे. धावत्या लोकलमध्ये चढताना अथवा उतरताना प्रवासी पडलाच तर त्याला वेळीच कसे वाचविता येईल याकडे विशेष लक्ष दिले जात आहे. स्टंटबाजांवर नियंत्रण मिळविण्यात येत आहे. या सर्वांचे फलस्वरूप रेल्वे हद्दीतील गुन्हे आणि अपघाती मृत्यूची संख्या गेल्या सहा महिन्यांत घटल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होत असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱयाने सांगितले.
  •  या वर्षी जानेवारी ते जून या सहा महिन्यांत एकूण 1 हजार 196 अपघाती मृत्यू झाले. त्यात लाइन क्रॉसिंग करताना 637, धावत्या लोकलमधून पडून 283 तर खांबाला धडकून 3 जणांचा मृत्यू झाला. वर्ष 2019 मध्ये एकूण 1 हजार 322 अपघाती मृत्यू झाले. 2019 च्या तुलनेत यंदा 126 अपघाती मृत्यू कमी झाले. लाइन क्रॉसिंग करताना मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 76 ने घटली. धावत्या लोकलमधून पडल्याने 19 जणांच्या मृत्यूच्या संख्येत घट झाली.
  • गेल्या सहा महिन्यांत वेगवेगळय़ा स्वरूपातील एकूण सहा हजार 313 गुह्यांची नोंद झाली, तर वर्ष 2019 मध्ये पहिल्या सहा महिन्यांत 16 हजार 948 गुन्हे दाखल झाले होते. म्हणजेच या वर्षी 10 हजार 635 इतक्या संख्येने गुह्यांमध्ये घट झाली आहे.