
दहा वर्षांपूर्वी पुण्यातील जंगली महाराज रोडवर झालेल्या साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी असलम शब्बीर शेख ऊर्फ बंटी जहागीरदार याला उच्च न्यायालयाने गुरुवारी जामीन मंजूर केला. जहागीरदारला 2013 मध्ये अटक करण्यात आली होती. त्याला जामीन मंजूर होण्याची ही दुसरी वेळ आहे. याआधी 1 ऑक्टोबर 2015 रोजी जामीन मंजूर झाला होता. मात्र त्यावेळी जामिनाच्या अटींचे उल्लंघन केल्याने त्याचा जामीन रद्द केला होता.
आरोपी बंटी जहागीरदारने याआधीच सुमारे सहा वर्षांचा तुरुंगवास भोगला आहे. त्यामुळे त्याला आणखी कोठडीत ठेवण्याची गरज नाही, असे निरीक्षण नोंदवत न्यायमूर्ती ए. एस. गडकरी यांच्या खंडपीठाने आरोपीला दुसऱयांदा जामीन मंजूर केला. 1 डिसेंबर 2012 रोजी संध्याकाळी 7 वाजता पुणे शहरातील डेक्कन जिमखाना, बाल गंधर्व रंगमंदिर आणि इतर लगतच्या परिसरात पाच बॉम्बस्फोट झाले होते. बॉम्बस्फोटातील आरोपी इरफान लांडगे याला बंटी जहागीरदारने शस्त्र्ा पुरविल्याचा आरोप करण्यात आला होता. आरोपींमध्ये जहागीरदारसह मुनीब इक्बाल मेमन, असद खान, इम्रान खान, सय्यद फिरोज, इरफान मुस्तफा लांडगे, फारुख बागवान, काशिफ बियाबानी यांचा समावेश होता.
























































