वीज मीटर रीडिंगमध्ये गडबड करणाऱया कर्मचाऱयांवर गुन्हा दाखल होणार; महावितरणचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ग्राहकाने वापरलेल्या विजेचे रीडिंग घेताना गडबड करणाऱया आणि अचूक रीडिंग न घेणाऱया कर्मचाऱयांवर आता फौजदारी गुन्हा दाखल होणार आहे. वीज मीटर रीडिंगमधील चुकांमुळे महावितरणचा मोठय़ा प्रमाणात महसूल बुडतो. तसेच ग्राहकांनाही मनस्ताप सहन करावा लागतो. याची महावितरणने गंभीर दखल घेतली असून संबंधित कर्मचाऱयांवर आणि रीडिंग एजन्सीवर कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

राज्यात महावितरणचे दोन कोटी 60 लाख वीज ग्राहक असून त्यांनी वापरलेल्या प्रत्येक युनिटचे वीज मीटर रीडिंगमुळे वीज बिलात रूपांतरित होते. त्यासाठी एजन्सींची नेमणूक केली असून एका मीटरच्या रीडिंगसाठी त्यांना अकरा रुपये दिले जातात. त्यामुळे त्यांनी प्रत्येक महिन्याला संबंधित मीटरच्या ठिकाणी जाऊन अचूक मीटर रीडिंग नोंदवणे बंधनकारक आहे. मात्र अनेक कर्मचारी अचूक रीडिंग नोंदवताना चुका करतात. अनेकदा मीटर रीडिंगचा घेतलेला फोटो अस्पष्ट असतो. रीडिंग घेता आले नाही अशी कारणे दिली जातात. अचूक रीडिंगमुळे महावितरणच्या महसुलात घट होते. तसेच ग्राहकाचा वीज वापर कमी असताना जादा रीडिंग नोंदवल्यास त्याचा ग्राहकाला भुर्दंड बसतो, बिलात दुरुस्ती करण्यासाठी फेऱया मारव्या लागतात. याची महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी गंभीर दखल घेतली असून यापुढे मीटर रीडिंगमध्ये गडबड करणाऱयांवर महसुलाचे नुकसान केल्याचा ठपका ठेवत गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.

एजन्सीला दंड होणार

वीज वापराचे मीटर रीडिंग घेण्यासाठी महावितरणने विभागनिहाय खासगी एजन्सींच्या नेमणुका केल्या आहेत. यामध्ये रीडिंगमध्ये गडबड करणाऱया कर्मचाऱयांवर गुन्हा दाखल केला जाणार आहे, तर संबंधित एजन्सींला दंड केला जाणार आहे. तसेच हीच चूक वारंवार केल्यास काळ्या यादीत टाकले जाणार आहे.