रायबरेली, अमेठीतून गांधी कुटुंबाने लढावे; काँग्रेस कार्यकर्त्यांकडून प्रियांका-राहुल गांधी यांना गळ

उत्तर प्रदेशातील रायबरेली आणि अमेठी या दोन्ही काँग्रेसच्या परंपरागत लोकसभा मतदारसंघातून गांधी कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी द्यावी, अशी आग्रही मागणी कार्यकर्त्यांकडून होत आहे. उत्तर प्रदेशातील ‘इंडिया’ आघाडीत काँग्रेसला 17 लोकसभा मतदारसंघ मिळाले आहेत. यापैकी 13 मतदारसंघांतील उमेदवारांची घोषणा काँग्रेसने केली आहे, परंतु 4 मतदारसंघांत अद्याप उमेदवारांची घोषणा केलेली नाही. यात रायबरेली, अमेठी, मथुरा आणि अलाहाबाद (प्रयागराज) या मतदारसंघांचा समावेश आहे.

रायबरेलीतून सोनिया गांधी निवडणूक लढणार नसल्याने या मतदारसंघात कोण उमेदवार देणार हे स्पष्ट झालेले नाही. रायबरेली आणि अमेठी हे गांधी कुटुंबीयांचे पारंपरिक मतदारसंघ आहेत. समाजवादी पक्षाशी चर्चा करताना माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी हे दोन्ही मतदारसंघ केवळ गांधी कुटुंबीयांसाठी सोडू, काँग्रेसचा इतर उमेदवार येथे चालणार नाही असे स्पष्ट केले आहे.

n प्रियांका गांधी या रायबरेली आणि अमेठीतून राहुल गांधी लढणार की नाही, अशी विचारणा पत्रकारांनी केल्यानंतर प्रभारी अविनाश पांडे यांनी बोलताना ही शक्यता नाकारली नाही. या मतदारसंघातील निवडणुकीला अजूनही वेळ असल्याने
याबाबत काँग्रेस योग्यवेळी निर्णय घेईल, असेही पांडे यांनी सांगितले.

रॉबर्ट वाड्रांची अमेठीतून लढण्याची इच्छा

प्रियंका गांधी-वाड्रा यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांनी, मी अमेठीतून लढावे अशी येथील लोकांची इच्छा असल्याचे म्हटले आहे.