200 कोटींच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला जामीन मंजूर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

200 कोटींच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस हिला जामीन मंजूर झाला आहे. दिल्लीच्या पतियाळा हाऊस न्यायालयाने तिला जामीन मंजूर केला आहे. यापूर्वी दिल्ली न्यायालयात 11 नोव्हेंबर 2022 रोजी सुनावणी झाली होती. त्या सुनावणीनंतर न्यायालयाने निर्णय सुरक्षित ठेवला होता आणि 15 नोव्हेंबर रोजी निर्णय जाहीर करण्यात येणार असल्याचं म्हटलं होतं.

न्यायालयाने दोन लाख रुपयांच्या वैयक्तिक मुचलक्यावर तिचा जामीन मंजूर केला आहे. 10 नोव्हेंबर रोजी तिच्या जामिनाची मुदत संपली होती. त्यानंतर पुन्हा तिच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली होती. ईडीने यावेळी जामिनाला विरोध करत जॅकलिनने तपासात सहकार्य न केल्याचा तसेच पुराव्यांशी छेडछाड केल्याचा आरोप केला होता. तिला जामीन दिल्यास ती परदेशात पळून जाऊ शकते, त्यामुळे तिला जामीन देऊ नये असा युक्तिवाद ईडीतर्फे करण्यात आला होता.

जॅकलिनच्या वकिलांनी ईडीचे आरोप खोडून काढत जॅकलिनने नेहमी तपासात सहकार्य केलं असून ईडीनेच तिला त्रास दिला आणि खोटे आरोप लावल्याचा युक्तिवाद केला होता. अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसवर अनेक गंभीर आरोप आहेत. या प्रकरणातील मुख्य आरोपी सुकेश चंद्रशेखर याच्या सर्व गैरव्यवहारांची तिला माहिती होती आणि तरीही ती त्याच्याकडून महागड्या भेटवस्तू स्वीकारत होती, असं तपासात उघड झालं होतं.