आदित्य ठाकरे यांचा अयोध्या दौरा, घेणार रामलल्लाचे दर्शन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना नेते पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे बुधवार 15 जून रोजी अयोध्या दौऱयावर येत आहेत. या दौऱयात ते रामलल्लांचे दर्शन घेणार आहेत. शरयू नदीच्या काठावर होणाऱया आरतीतदेखील ते सहभागी होणार असल्याची माहिती शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी दिली.

आदित्य ठाकरे यांच्या दौऱयासाठी रामनगरी अयोध्या सज्ज झाली आहे. हा दौरा राजकीय नाही. प्रभू रामाच्या दर्शनासाठी ते या ठिकाणी येत आहेत. महाराष्ट्रातून हजारो शिवसैनिक या दौऱयात सहभागी होणार आहेत. ठाणे, पुणे, नाशिक आदी ठिकाणांहून मोठय़ा संख्येने शिवसैनिक अयोध्येला निघाले आहेत, अशी माहिती संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

अयोध्या नगरी स्वागतासाठी सज्ज

शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱयाच्या पार्श्वभूमीवर अयोध्या नगरी स्वागतासाठी सज्ज झाली आहे. लखनौ व अयोध्येकडे जाणाऱया मार्गावर आदित्य ठाकरे यांच्या स्वागतासाठी कमानी उभारण्यात आल्या असून ठिकठिकाणी त्यांच्या स्वागताचे पोस्टर्स लावण्यात आले आहेत.

वाजतगाजत शिवसैनिक अयोध्येकडे

महाराष्ट्रातील विविध भागांतून वाजतगाजत शिवसैनिक अयोध्येकडे निघाले आहेत. ढोलताशा आणि जय श्रीरामच्या जयघोषात सोमवारी ठाणे रेल्वे स्थानकातून विशेष एक्स्प्रेसने 1200 युवासैनिक अयोध्येकडे निघाले आहेत. नाशिकमधून दीड हजारहून अधिक शिवसैनिक रवाना होणार आहेत. नाशिक रोड रेल्वे स्थानकावरून विशेष ट्रेनची व्यवस्था केली आहे.

ठाण्यात शिवसेनेचे चलो अयोध्या

युवासेना प्रमुख, शिवसेना नेते, राज्याचे पर्यावरण आणि पयर्टनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रभू रामचंद्रांचे दर्शन घेण्यासाठी आणि शरयू नदीच्या काठी महाआरती करण्यासाठी हजारो शिवसैनिक आज ठाणे रेल्वे स्थानकातून आयोध्येच्या दिशेने रवाना झाले. ठाणे शहरासह मीरा रोड, भाईंदर, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ-बदलापूर येथील शिवसैनिकांनी आपला रेल्वे प्रवास ठाणे रेल्वे स्थानकातून सुरू केला. शिवसैनिकांच्या गर्दीमुळे संपूर्ण स्थानक भगवेमय झाले होते. गाडी आयोध्येच्या दिशेने निघाल्यानंतर शिवसैनिकांनी प्रभू रामचंद्र की जय, जय भवानी जय शिवाजी, अशा गगनभेदी घोषणा दिल्या. त्यामुळे सर्व परिसर दणाणून गेला.