
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी ईडी सरकारवर सडकून टीका केली आहे. मंत्रिमंडळाची आज होणारी बैठक रद्द करण्यात आली आहे. गुजरातमध्ये प्रचार करण्यासाठी मंत्र्यांना जाता यावे यासाठी ही बैठक रद्द करण्यात आल्याची कुजबूज सुरू आहे. याबाबत प्रश्न विचारला असता आदित्य ठाकरे म्हणाले की, “आज सकाळीच माझ्या कानावर एक बातमी आली की मंत्रिमंडळाची बैठक रद्द झाली आहे. दुसऱ्या राज्यात निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी ही बैठक रद्द केल्याचे ऐकण्यात आले आहे. राज्यात ओला दुष्काळ, बेरोजगारी, कायदा सुव्यवस्था असे अनेक प्रश्न उभे आहेत. मात्र खोके सरकारला या प्रश्नासाठी 1 तास बैठक देखील घेता येत नाही. याउलट ते गुजरात निवडणुकीचा प्रचार करत आहेत, हे अत्यंत दुर्देवी आहे.” आदित्य ठाकरे हे आज बिहार दौऱ्यावर असून या दौऱ्याला निघण्यापूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
आदित्य ठाकरे यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना म्हटले की, पक्षाचा प्रचार करण्यात काहीच गैर नाही मात्र मंत्री मंडळ बैठक ही झालीच पाहिजे. यावेळी भाजपवर निशाणा साधत ते म्हणाले की ज्यांनी पीडीपी सोबत युती केली होती त्यांनी आमच्यावर बोलू नये. तसेच जत तालुक्यातील 40 गावांवर कर्नाटक सरकारने सांगितलेल्या दाव्याप्रकरणी ते म्हणाले की, जे राज्यपाल महाराष्ट्राचा सतत अपमान करतात, त्या सरकारकडून अजून काय अपेक्षा ठेवणार. या विषयावर उपमुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका स्पष्ट करायला हवी.
बिहार दौऱ्याबाबत बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की ते पाटणा येथे बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची भेट घेणार आहेत. तेजस्वी यांनी उपमुख्यमंत्री म्हणून चांगली छाप पाडली असल्याचे ते म्हणाले. तेजस्वी यांच्यासोबत अनेक विषयांवर चर्चा होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. हा दौरा राजकीय दौरा नसल्याने त्याबाबत अधिक विश्लेषणाची गरज नाही असे आदित्य यांनी म्हटले आहे. या भेटीत पर्यावरण, वातावरणातील बदल व उद्योग अशा महत्वाच्या विषयांवर चर्चा होणार असल्याचे आदित्य यांनी सांगितले. यावेळी दिशा सालियनचा मृत्यू हा अपघातच होता असे सीबीआयने न्यायालयात सांगितले आहे. याबाबत प्रश्न विचारला असता आदित्य म्हणाले की, दिशा सालियन प्रकरणी केलेल्या घाणेरड्या राजकारणात मला पडण्याची इच्छा नाही. याबद्दल जे माझ्यावर आरोप करत होते त्यांना आज उत्तर मिळालं आहे.






























































