
सामना ऑनलाईन,मेहकर
आत्महत्या करणे हे कोणत्याही समस्येवरचे उत्तर नाही. परिस्थिती अतिशय गंभीर आहे. दुष्काळाचा रावण समोर उभा आहे. पण हिंमत ठेवा. शिवसेना तुमच्या सोबत आहे. अर्ध्या रात्री आवाज द्या, शिवसैनिक तुमच्या मदतीला धावून येईल अशी ग्वाही शिवसेना नेते तथा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी दिली.
मेहकर येथे शिवसेनेच्या वतीने 250 शेतकरी कुटुंबांना मदत देण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्रावर दुष्काळाचे मोठे संकट आले आहे. पाऊस नाही, चारा-पाणी संपले. शेतशिवारात शुकशुकाट आहे. अशा संकटकाळात आमचा युवासैनिक कर्तव्यभावनेने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहिला आहे असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. परिस्थिती गंभीर असली तरी आत्महत्या हा त्यावर उपाय नाही. आत्महत्या करू नका, तुमच्या भावना आमच्यापर्यंत पोहोचवा. शिवसैनिक मदतीसाठी तुमच्या दारात असेल, अशी ग्वाही यावेळी आदित्य ठाकरे यांनी दिली.
अच्छे दिनाची जुमलेबाजी किती दिवस?
शेतकऱ्यांना म्हणे कर्जमाफी देण्यात आली. कुणाकुणाला मिळाली कर्जमाफी, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी करताच उपस्थितांनी हात उंचावून ‘नाही’ असा आवाज दिला. अच्छे दिनाची जुमलेबाजी आता किती दिवस ऐकायची असा संतप्त सवालही त्यांनी केला. या कार्यक्रमाला जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, शांताराम दाणे, आमदार संजय रायमूलकर आदींची उपस्थिती होती.
अजान सुरू होताच भाषण थांबवले
शिवसेना कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही याची प्रचीती आज मेहकर येथील सभेत आली. खासदार प्रतापराव जाधव यांचे भाषण सुरू असतानाच जवळच्या मशिदीतून अजान सुरू झाली. अजान सुरू होताच आदित्य ठाकरे यांनी खासदार जाधव यांना भाषण थांबवण्याचा इशारा केला. अजान संपल्यानंतर पुन्हा खासदार जाधव यांचे भाषण सुरू झाले.





























































