दत्त देवस्थान ट्रस्टवर प्रशासक, पुणे येथील सहधर्मादाय आयुक्तांचा निर्णय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रामकृष्ण क्षीरसागर महाराज स्थापित सावेडी येथील श्री दत्त देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्तांचे चेंज रिपोर्ट फेटाळण्याचा आदेश अपिलामध्ये कायम ठेवून पुणे येथील सहधर्मादाय आयुक्त सुनीता तरार यांनी ट्रस्टचे आर्थिक कामकाज पाहण्यास प्रशासक नेमला आहे. महाराजांचे पुतणे व कुटुंब प्रतिनिधी असलेले कायम विश्वस्त मिलिंद क्षीरसागर यांनी 15 वर्षे याप्रकरणी पाठपुरावा करून संजय क्षीरसागर यांची सत्ता संपविली.

रामकृष्ण क्षीरसागर महाराज यांचे 8 सप्टेंबर 1999 रोजी महानिर्वाण झाले. त्यानंतर कायदेशीर कामांमुळे महाराजांच्याशी संपर्क असलेले संजय क्षीरसागर यांनी आडनाव साधर्म्याचा फायदा घेत ट्रस्टवर 2006 साली विश्वस्त म्हणून नियुक्ती करून घेतली. त्यानंतर आपल्या मर्जीतील लोकांना विश्वस्त म्हणून नेमल्याचे दर्शवीत मिलिंद क्षीरसागर यांनाही विश्वस्तपदावरून बेदखल केले. त्यामुळे नगर येथील सहायक धर्मादाय आयुक्तांनी कायम विश्वस्त मिलिंद क्षीरसागर यांना काढल्याचा चेंज रिपोर्ट फेटाळून त्यांची उपस्थिती विश्वस्त सभांना अनिर्वाय असल्याचा निर्णय दिला.

यानंतरही संजय क्षीरसागर यांनी मिलिंद क्षीरसागर यांना विश्वस्त सभेस न बोलाविता मर्जीतील विश्वस्त नेमल्याचे दर्शवीत 2006पासून सुमारे 37 चेंज रिपोर्ट नगर येथील सहायक धर्मादाय आयुक्त कार्यालयात विनासुनावणी प्रलंबित ठेवले. अखेर मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठाने यापैकी काही चेंज रिपोर्ट तातडीने सुनावणीस घेऊन कालबद्ध मर्यादेत निर्णीत करण्याचा आदेश दिला. त्यानुसार नगर येथील सहायक धर्मादाय आयुक्त गीता बनकर यांनी सुनावणी घेतल्याने 1 डिसेंबर 2020 रोजी सुमारे 15 वर्षांनंतर संजय क्षीरसागर व त्यांनी नेमलेल्या विश्वस्तांचे चेंज रिपोर्ट अखेरीस बेकायदेशीर ठरवून फेटाळले.

या सर्व चेंज रिपोर्टच्या आदेशांवर संजय क्षीरसागर व इतरांच्या वतीने पुण्यातील सहधर्मादाय आयुक्तांकडे अपिले दाखल केली होती. मात्र, क्रमवारीनुसार अपील सुनावणीस न घेता स्वतःची पुनर्नियुक्ती करणारा चेंज रिपोर्ट क्रमांक 1/2021मधील स्थगिती आदेशांचे अर्ज प्राधान्याने सुनावणीस घेण्याचा आग्रह संजय क्षीरसागर यांनी धरला. दीड वर्षाच्या सुनावणीनंतर पुणे येथील सहधर्मादाय आयुक्त सुनीता तरार यांनी स्थगिती आदेशांचे अर्ज फेटाळले. अनेक अपिले प्रलंबित असल्याने दरम्यानच्या कालावधीसाठी ट्रस्टच्या आर्थिक व्यवहारांवर अपिलाचा अंतिम निर्णय होईपर्यंत नगर धर्मादाय कार्यालयातील निरीक्षक गेजगे यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली आहे.

याकामी अपीलकर्त्याकडून ऍड. मनोज वाडेकर व ऍड. भावना पानपाटील, तर मूळ हरकतदार व कायम विश्वस्त मिलिंद क्षीरसागर यांच्या वतीने ऍड. शिवराज कदम-जहागीरदार, ऍड. अमित टकले यांनी काम पाहिले.

या निकालाने न्यायिक प्रकरणे प्रलंबित ठेवून धार्मिक स्थळांची सत्ता हातात ठेवण्याच्या प्रयत्नांना चपराक बसली आहे. प्रशासक नेमणुकीमुळे ट्रस्टचे आर्थिक व्यवहार मर्यादेत राहून पारदर्शक होतील.

– ऍड. शिवराज कदम जहागीरदार