
सिनेट निवडणूक कार्यक्रम जाहीर न करता नव्याने मतदार नोंदणी सुरू करणाऱ्या मुंबई विद्यापीठाने कोर्टाच्या आदेशाचा अवमान केला आहे. मिंधे सरकारच्या तालावर नाचणाऱ्या विद्यापीठाच्या रजिस्ट्रारविरुद्ध अवमान कारवाई करण्याचे तसेच सिनेट निवडणूक कार्यक्रम तातडीने जाहीर करण्याचे निर्देश द्या, अशी मागणी करीत अॅड. सागर देवरे यांनी गुरुवारी उच्च न्यायालयात अंतरिम अर्ज दाखल केला. त्यावर शुक्रवारी होणाऱ्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राजकीय हस्तक्षेपामुळे सिनेट निवडणूक वर्षभर खोळंबली. निवडणुकीला दिलेली स्थगिती बेकायदा आहे, असा दावा करणारी अॅड. देवरे यांची याचिका उच्च न्यायालयाने 9 ऑक्टोबरला निकाली काढली. त्यावेळी मतदार यादी छाननीसंबंधी समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर लगेचच सिनेट निवडणूक जाहीर करण्याचे आदेश न्यायालयाने विद्यापीठाला दिले होते. त्या आदेशाला अनुसरून निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याऐवजी विद्यापीठाने नव्याने मतदार नोंदणी सुरू केली आहे. या प्रक्रियेला अॅड. देवरे यांनी गुरुवारी आव्हान दिले. विद्यापीठाने 17 ऑगस्टला थांबवलेली प्रक्रिया पुढे सुरू ठेवणे आवश्यक आहे. तसे न करता नव्याने मतदार नोंदणी सुरू करून विद्यापीठाचे रजिस्ट्रार सुनील भिरूड यांनी न्यायालयीन आदेशाचा अवमान केला आहे. त्यांच्याविरुद्ध अवमान कारवाईचे आदेश द्या, 9 ऑक्टोबरला निकाली काढलेल्या याचिकेवर पुन्हा गुणवत्तेच्या आधारे सुनावणी घ्या आणि तातडीने निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याचे निर्देश विद्यापीठाला द्या, अशा मागण्या अंतरिम अर्जाद्वारे केल्या आहेत. या अर्जावर शुक्रवारी न्यायमूर्ती नितीन जामदार आणि न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठापुढे सुनावणी होणार आहे.
150 वर्षांच्या गौरवशाली परंपरेची बदनामी होतेय!
राजकीय स्वार्थ साधण्यासाठी खोटे, तथ्यहीन आरोप करून मुंबई विद्यापीठाच्या 150 वर्षांच्या गौरवशाली परंपरेची बदनामी केली जातेय. मुंबई विद्यापीठ राज्य सरकारच्या दबावाखाली वावरतेय हे सरळसरळ स्पष्ट होते. हा राजकीय हस्तक्षेप न्यायालयाने रोखावा, अशीही विनंती याचिकाकर्ते देवरे यांनी केली आहे.
आशीष शेलारांविरुद्ध पोलीस आयुक्तांकडे तक्रार
सिनेट निवडणूक मतदार नोंदणीसंबंधी अत्यंत संवेदनशील व गोपनीय माहिती सोशल मीडियात प्रसिद्ध करणे आणि मतदारांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण करणे याची सखोल चौकशी व्हावी, याप्रकरणी भाजप आमदार आशीष शेलार व इतर जबाबदार लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करीत अॅड. सागर देवरे यांनी गुरुवारी मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली.
























































