व्हिएतनामचा थायलंडवर शानदार विजय, विश्वचषक प्रवेशाच्या आशा कायम राखल्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एएफसी वुमन्स आशिया कप हिंदुस्थान 2022 फुटबॉल स्पर्धेत गुरुवारी झालेल्या प्ले ऑफ लढतीत व्हिएतनामने थायलंडचे कडवे आव्हान 2-0 गोलने परतावले. या शानदार विजयासह व्हिएतनामने 2023 साली ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडमध्ये होणाऱया फिफा विश्वचषक स्पधेची पात्रता मिळवण्याच्या आशा कायम राखल्या आहेत. व्हिएतनामला पात्रता मिळवण्यात यश आले तर विश्वचषक स्पर्धेत पहिल्यांदाच त्यांचा सहभाग होईल.

डी. वाय. पाटील स्टेडियमच्या मैदानावर झालेल्या सामन्यात व्हिएतनामने नियोजनबद्ध खेळ करत बाजी मारली. रविवारी होणाऱया प्ले ऑफ लढतीत व्हिएतनामने चायनीज तैपेईला नमवले, तर फिफा विश्वचषक स्पर्धेतील दक्षिण आशियाई देशांचे स्थान स्पष्ट होईल. याआधीच चायना पीआर, जपान, कोरिया रिपब्य़िक, फिलिपाईन्स आणि सह-यजमान ऑस्ट्रेलिया यांनी विश्वचषक स्पर्धेतील आपले स्थान निश्चित केले आहे. त्याचवेळी थायलंडला विश्वचषक स्पर्धेत प्रवेश करण्याच्या आशा कायम राखण्यासाठी शुक्रवारी होणाऱया सामन्यात चायनीज तैपेईविरुद्ध विजय मिळवणे अनिवार्य असेल. जर थायलंड पराभूत झाले, तर त्यांना इंटर-कॉन्फेडरेशन प्ले ऑफ लढतीत खेळावे लागेल.

थायलंड आणि व्हिएतनाम यांना रविवारी झालेल्या आपापल्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे प्ले ऑफ लढतीतून चमकदार कामगिरी करत दोन्ही संघांना सकारात्मकरीत्या घरी परतण्याची संधी होती आणि यामध्ये सध्या व्हिएतनाम संघ वरचढ ठरला. व्हिएतनामने सामन्याच्या पहिल्याच सत्रात दोन गोल करत एकहाती वर्चस्व राखले.

अखेरच्या क्षणात रेडकार्ड नाटय़

सामन्याच्या अखेरच्या क्षणामध्ये रेडकार्डचे नाटय़ही रंगले. थायलंडच्या गोलक्षेत्रात जबरदस्त आक्रमण केलेल्या एनग्युयेन थी थान नाह हिला गोल करण्याची सुवर्णसंधी मिळाली होती, मात्र थायलंडच्या कांचनापोर्न साएनखुनने तिला खाली पाडल्याने तिला रेडकार्डला सामोरे जावे लागले. यावेर मिळालेल्या फ्री किकवर व्हिएतनामचा गोल चुकला, परंतु त्याचा सामन्याच्या निर्णयावर काहीच फरक पडला नाही. आता रविवारच्या लढतीत व्हिएतनाम चायनीज तैपेईच्या कडव्या आव्हानाला सामोरे जाईल.