दोनजणांनी एकाचवेळी घेतली राष्ट्रपतीपदाची शपथ!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अफगाणिस्तानमध्ये आता नवीनच राजकीय पेच उपस्थित झाला आहे. अफगाणिस्तानच्या राष्ट्रपती पदाची अशरफ गनी यांनी दुसऱ्यांदा शपथ घेतली. अशरफ गनी यांना राष्ट्रपती मानण्यास नकार देत त्यांचा शपथविधी योग्य पद्धतीने होत नसल्याचा आरोप करत त्यांचे विरोधक अब्दुला अब्दुल्ला यांनीही त्याचवेळी राष्ट्रपतीपदाची शपथ घेतली. त्यामुळे अफगाणिस्तानात एकाचवेळी दोनजणांनी राष्ट्रपतीपदाची शपथ घेतल्याने नवा राजकीय पेच उभा ठाकला आहे. अमेरिकेच्या हस्तक्षेपानंतरही अफगाणिस्तानमधील राजकीय अस्थिरता कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे.

अफगाणिस्तानच्या राष्ट्रपतीपदी निवडून आलेले अशरफ गनी यांची निवड योग्य नसल्याचा आरोप त्यांच्या विरोधकांनी केला आहे. आपणच निवडणूक जिंकलो असल्याचा दावा अब्दुला यांनी केला आहे. त्यामुळे राष्ट्रपतीपदी आपलाच शपथविधी झाला पाहिजे अशी मागणी त्यांनी केली होती. अमेरिकेचे राजदूत जालमय खालिजाद यांनी गनी आणि अब्दुला यांची रविवारी बैठक आयोजित केली होती. मात्र, त्यात काही निष्पन्न झाले नाही. अखेर काबूल येथील राष्ट्रपती भवनात अशरफ गनी यांचा शपथविधी पार पडला. यावेळी अमेरिकेचे राजदूत जालमे खालिजाद, अमेरिका-नाटो सैन्याचे कमांडर जनरल स्कॉट आदींसह इतर आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी उपस्थित होते. अशरफ गनी यांच्या शपथविधीनंतर सभा झाली. त्यावेळी स्फोट झाल्याने गोंधळ उडाला. हे स्फोट सुरू असतानादेखील गनी यांनी आपले भाषण सुरूच ठेवले होते. त्याचवेळी गनी यांना राष्ट्रपती मानण्यास नकार देत अबुल्ला यांनीही राष्ट्रपतीपदाची शपथ घेतली. राजकीय अस्थिरतेच्या वातावरणाचा परिणाम तालिबानसोबत सुरू होणाऱ्या शांतता चर्चेवर होण्याची शक्यता आहे.