
कोरोना व न्यूमोनियाची मोठ्या माणसांमध्ये आढळून येणारी लक्षणं पुण्यातील चार वर्षाच्या प्रेममध्ये दिसल्यानंतर डॉक्टरही हादरले. त्याच्या शरीरातील ऑक्सिजनची लेव्हलही मोठ्या प्रमाणात घसरली होती. त्यामुळे त्याला व्हेंटिलेटरवर ठेवावे लागले. 45 दिवस व्हेंटिलेटरवर ठेवल्यावर कोविडच्या घातक ARDS या सिंड्रोमशी लढा देऊन प्रेम नुकताच बरा झाला आहे. मेकॅनिकल व्हेंटिलेटरवर इतके दिवस एखाद्या बाळावर उपचार होण्याची ही जगातली पहिलीच घटना असल्याचा दावा ड़ॉक्टरांनी केला आहे.
11 नोव्हेंबर 2021 ला प्रेमला ताप आला म्हणून मोशी येथील एका रुग्णालयात दाखवल करण्यात आले होते. तेथे त्याला एका कोरोना रुग्णाच्या शेजारच्या बेड देण्यात आला होता. पाच दिवसानंतर प्रेमची प्रकृती ढासळली. त्याच्या शरीरातील ऑक्सिजनची लेव्हल 42 टक्क्यांपर्यंत खाली आली होती. त्यामुळे त्याला श्वास घ्यायला त्रास होत होता. त्या रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याला व्हेंटिलेटर असेलल्या रुग्णालयात हलविण्यास सांगितले. त्यामुळे त्याला जहांगिर रुग्णालयात दाखल करण्यात आले.
‘प्रेम जेव्हा रुग्णालयात आला तेव्हा त्याची प्रकृती गंभीर होती. त्याच्या छातीचा आम्ही टोमोग्राफी रिपोर्ट 21 आला. त्याला एखाद्या मोठ्या व्यक्तीमध्ये आढळतात तशा प्रकारच्या कोरोना व न्यूमोनियाची लागण झाली होती. हा प्रकार बालकांमध्ये फार कमी दिसून येतो. आम्ही त्याला तत्काळ व्हेंटिलेटरवर ठेवले होते. पण त्याच्या प्रकृतीत फरक जाणवत नव्हता. त्यामुळे त्याला हाय फ्रिक्वेन्सी इनवॅसिव्ह व्हेंटिलेटर या विशेष व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आले. औषधं, स्टेरॉईड, अँटीव्हायरल रेमडेसिविर हे सगळं त्याला दिलं जात होतं, असे त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉ. सागर लाड यांनी सांगितले.






























































