एमआयडीसीतुन पारनेरला पाणीपुरवठा; आमदार औटी यांचा आदेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । पारनेर 

सुपा औद्योगिक वसाहतीतून पारनेर शहराला प्रतिदिवस 5 लाख लिटरचा मुबलक पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. विधानसभेचे उपाध्यक्ष विजय औटी यांनी राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकार्‍यांना गुरुवारी त्यांच्या मुंबईतील दालनात पाचारण करून  शहराला प्रतिदिन पाच लाख लिटर पाणी देण्याचे आदेश निर्गमीत केले.

गेल्या काही दिवसांपासून पारनेर शहरात पाणीटंचाईचा प्रश्न बिकट झाला होता. हंगा तलावातील पाणीसाठा संपल्याने शहरात तीव्र पाणी टंचाई निर्माण झालेली आहे. याबाबत पारनेर नगरपंचायतीतील सत्ताधार्‍यांनी सुपा औद्यागिक वसाहतीतून पाणी मिळण्यासाठी आंदोलने केली. मात्र त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. पाणी टंचाईबाबत नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत होता. याबाबत औटी यांनी मुंबईतील राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकार्‍यांना गुरुवारी मुंबईतील दालनात पाचारण केले. त्यांच्या निर्देशानुसार शहराला औद्योगिक वसाहतीतून 5 लाख लिटर पाणी मिळणार आहे.

औटी यांच्या दालनात आदेशाचे पत्र शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर, जि.प.सदस्य काशिनाथ दाते यांच्या उपस्थितीत नगरसेवक अनिकेत औटी, किसन गंधाडे, मुदस्सीर सय्यद, गणपतराव अंबुले यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. पारनेरच्या पाण्याचा ज्वलंत प्रश्न तातडीने सोडविल्याबद्दल पदाधिकाऱ्यांनी औटी यांचे आभार मानले.