
सामना प्रतिनिधी । श्रीगोंदा
श्रीगोंदा तालुक्यातील भानगाव येथील भानेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक शेलार यांच्यासह दोन शिक्षकांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याने गावातील नागरिकांनी गाव आणि विद्यालय बंद ठेवत शाळेच्या समोर आंदोलन केले. मुख्याध्यापक शेलार आणि दोन शिक्षकांवर ठेवलेले खोटे गुन्हे मागे घेऊन शाळेच्या संस्थापकांचे शाळेतील राजकारण कायम स्वरुपी बंद करण्याची मागणी यावेळी ग्रामस्थांनी केली. यावेळी शिक्षणाधिकारी लक्ष्मण पोले यांनी शाळेतील या प्रकाराबाबत चौकशी समिती नेमण्यात येईल, असे आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले.
भानगाव येथील भानेश्वर विद्यालय येथे शाळेत सीसीटीव्ही बसवले आहेत. मात्र एका शिक्षकांने रुमालाने सीसीटीव्हीचा कॅमेरा बंद केला. त्यातून जाब विचारल्याने सुरू झालेल्या वादातून मुख्याध्यापक शेलार आणि इतर दोन शिक्षक यांच्या विरोधात एका महिला शिक्षकाने विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर या घटनेचा निषेध करीत गावातील ग्रामस्थांनी शाळा तसेच गाव बंद करत शाळेसमोर आंदोलन केले.
यावेळी सरपंच आबासाहेब शितोळे, सुरेश गोरे, मधुकर कण्हेरकर, प्रमोद जाधव, अरूण शितोले आदींची भाषणे झाली. रघुनाथ नवले बाबा कुदांडे, नाना आघाव, उत्तम शेलार, उत्तम कण्हेरकर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.






























































