कापूस उत्पादकांनी ‘फरदड’चा मोह टाळावा! कृषी विभागाचे आवाहन

23

सामना ऑनलाईन । येवला

कापूस पिकावरील शेंदरी बोंडअळी नियंत्रणासाठी सर्व कापूस उत्पादक शेतकऱयांनी फरदड घेऊ नये. तसेच शेतातून प्रहाटी काढून टाकावी व योग्य ती विल्हेवाट लावावी, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी अभय फलके यांनी केले आहे.

तालुक्यात कपाशीचे पीक सुमारे 11 हजार हेक्टरवर घेतले जाते. येथील अनेक शेतकरी कापूस उत्पादक आहेत. मागील वर्षीचा अनुभव पाहता या वर्षी खरिपात घेतलेल्या काळजीमुळे व केलेल्या उपाययोजनेमुळे बोंडअळीचा प्रादुर्भाव कमी झालेला दिसून आला आहे. आता कापूस वेचणी पूर्ण झालेली असून शेंदरी बोंडअळी या कालावधीत सुप्त अवस्थेत असते. जर फरदड खोडवा कापूस घेतला तर तिचा जीवनक्रम सुरू राहतो. त्यामुळे शेतकऱयांनी कापूस फरदड घेऊ नये, कापूस श्रेडरचा वापर करून प्रहाटीचा भुगा करून शेतातच गाडावा किंवा रोटारेटरचा वापर करून प्रहाटी शेतातच गाडावी. यामुळे जमिनीची सुपिकता वाढविता येते तसेच कापसाचे सर्व अवशेष चुरा होऊन गाडले गेल्याने शेंदरी बोंड अळीचा जीवनक्रम खंडित होतो व पुढील हंगामात त्याचा प्रादुर्भाव टाळता येतो.

शेत उन्हात तापवा…
जे शेतकरी प्रहाटी उपटून टाकतात त्यांनी गोळा करून जाळून टाकणे उचित होईल. प्रहाटीची विल्हेवाट लावल्यानंतर शेताची खोल नांगरट करून शेत उन्हात तापण्यासाठी ठेवावे. यामुळे बोंडअळीचा प्रादुर्भाव कमी होतो तसेच पुढील हंगामात शेतातील पिकाची शक्यतो फेरपालट करावी.

आपली प्रतिक्रिया द्या