
नगर जिल्हा रूग्णालयातील अतिदक्षता विभागाला लागलेल्या आगीत जखमी झालेल्या एका रूग्णाचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे आग प्रकरणातील मृतांची संख्या आता 12 झाली आहे. लक्ष्मण आसराजी सावळकर (वय 60, रा.बोधेगाव, ता.शेवगाव) असे मयत झालेल्या रूग्णाचे नाव आहे.
6 नोव्हेंबर रोजी जिल्हा रूग्णालयातील कोरोना अतिदक्षता विभागाला आग लागली होती. या घटनेत 11 कोरोना रूग्णांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केलेली आहे. जिल्हा रूग्णालय आग प्रकरणात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांच्यासह वैद्यकिय अधिकारी, स्टाफ नर्स यांना निलंबित करण्यात आले आहे. तर, दोन स्टाफ नर्स यांची सेवा समाप्त करण्यात आली आहे. राज्य शासनाने या घटनेच्या चौकशीसाठी नाशिक विभागीय आयुक्तांची चौकशी समिती गठीत केलेली आहे. या समितीमार्फत चौकशी सुरू आहे.
पोलिसांकडूनही स्वतंत्रपणे चौकशी करण्यात येत आहे. दरम्यान, जिल्हा रूग्णालयातील करोना अतिदक्षता विभागात 17 रूग्ण उपचार घेत होते. कोरोनावर उपचार घेणार्या 11 रूग्णांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. त्यात 6 महिला व 5 पुरूषांचा समावेश होता. 6 रूग्ण जखमी झाले असून त्यांच्यावर एका खासगी रूग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. लक्ष्मण सावळकर यांचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे या घटनेतील एकूण मृतांची संख्या आता 12 झाली आहे. जिल्हा रूग्णालयातील आगीच्या घटनेप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या प्रकरणात पोलीस स्वत: फिर्यादी आहेत. पोलिसांनी जिल्हा रूग्णालयाच्या वैद्यकिय अधिकारी विशाखा शिंदे, परिचारिका सपना पठारे, आस्मा शेख व चन्ना या चार जणांना अटक केलेली आहे.
चौकशी अहवालाची प्रतीक्षा!
जिल्हा रूग्णालय आग प्रकरणाच्या चौकशीसाठी नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखालील समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीत एकूण दहा अधिकार्यांचा समावेश आहे. मागील आठवड्यात या समितीने नगरला येऊन जिल्हाधिकारी कार्यालयात काही जणांची चौकशी केली. चौकशी समितीची मंगळवारी (दि.16) नाशिकलाही बैठक झाली.आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. समिती चौकशी अहवाल शासनाला कधी सादर करते, याकडे लक्ष लागले आहे.































































