
हवाई वाहतूक क्षेत्रातील काही कंपन्यांना तोट्याची झळ बसली आहे. याच पार्श्वभूमीवर तोट्याच्या संकटातून बाहेर पडण्यासाठी एअर इंडिया एक्सप्रेसचे एअर इंडिया कंपनीत विलीनीकरण करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यासंदर्भातील प्रस्ताव सध्या प्राथमिक टप्प्यात विचाराधीन आहे. प्रस्ताव पुढे मार्गी लागण्यासाठी संचालक मंडळाची मंजुरी आवश्यक आहे. एअर इंडिया एक्सप्रेसचे एअर इंडिया कंपनीत विलीनीकरण केले तरी कंपनीची ओळख ‘एअर इंडिया एक्सप्रेस’ याच नावाने कायम राहील, अशी माहिती कंपनीशी संबंधित वरिष्ठ अधिकाऱयांनी दिली. कर्जाच्या बोजाखाली दबलेल्या एअर इंडियाला जवळपास 22 हजार कोटी रुपयांच्या तोट्याचा फटका बसला आहे. हा तोटा कमी करण्यासाठी एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेस या दोन कंपन्या एकत्र करण्याचा प्रस्ताव विचारात घेण्यात आला आहे.

























































