
मध्य रेल्वे मार्गावरील वाढत्या प्रवासी संख्येमुळे जाहिरात स्थळांना चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. त्यामुळे प्रशासनाला जाहिरातींतून मोठे उत्पन्न मिळाले असून ऑगस्टपर्यंत भाडेव्यतिरिक्त उत्पन्न 58.15 कोटींवर गेले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या उत्पन्नात 13.67 टक्क्यांची मोठी वाढ झाली आहे. तसेच ऑगस्टमध्ये ई-लिलावाद्वारे 36 कंत्राटे देण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
रेल्वेच्या मालमत्तांचा नावीन्यपूर्ण वापर, जाहिरातींच्या संधी, प्रवाशाभिमुख सेवा आणि इतर उपक्रमांच्या माध्यमातून मध्य रेल्वेने भाडेव्यतिरिक्त उत्पन्न वाढवण्यात यश मिळवले आहे. ऑगस्ट महिन्यात ई-लिलावाद्वारे 36 कंत्राटे देण्यात आली. त्यातून रेल्वेला एकूण 324.03 लाख रुपयांचे वार्षिक परवाना शुल्क प्राप्त झाले. मुंबई विभागाने विविध जाहिरात आणि प्रवाशाभिमुख उपक्रमांद्वारे कमाईचे उद्दिष्ट साध्य केले. कामण रोड आणि जुचंद्रदरम्यान ‘आऊट ऑफ होम’ जाहिरात स्थळे, चिंचपोकळी, नेरळ, ठाकुर्ली, आटगाव, मस्जिद आणि डॉकयार्ड रोड स्थानकांवरील जाहिरातींचे अधिकार आणि पनवेल येथील ‘पोर्टर ऑन कॉल’ सेवा या माध्यमातून उत्पन्नात वाढ नोंद झाली आहे. कल्याण-कर्जत/खोपोली आणि कल्याण-कसारा विभागांमधील लोकल ट्रेनसाठी खाद्यपदार्थ विक्रीचे कंत्राट प्रतिवर्ष 40.11 लाख रुपयांना देण्यात आले.
राज्यभरातील अन्य विभागांची आघाडी
भुसावळ विभागाने 13 मेमू रेक्समधील ऑडिओ प्रणालीद्वारे जाहिरात, अकोला येथे दुचाकी पार्ंकग, प्रवासी डॉर्मिटरी व रिटायरिंग रूम सुविधा, किराणा मालाचे दुकान आणि डिजी लॉकर सेवा यांसारख्या विविध कामांचे कंत्राट दिले. पुणे विभागाने जुना बाजार चौक येथे ‘आऊट ऑफ होम’ जाहिरातीचे कंत्राट प्रतिवर्ष 36 लाख रुपयांना दिले. सोलापूर विभागानेही अनेक महत्त्वपूर्ण उपक्रम राबवले. यात सोलापूर व पंढरपूर स्थानकावर विविध डिजिटल जाहिराती, किओस्क, डिजी लॉकर आणि मोबाईल चार्ंजग सुविधांचा समावेश आहे. नागपूर विभागाने मोबाईल फूड व्हॅन्स, गाडय़ांमधील विविध प्रकारची विक्री, डिजी लॉकर सुविधा आणि कर्मचारी कॅन्टीन सेवांच्या कंत्राटांद्वारे भाडेव्यतिरिक्त उत्पन्न मिळवले.



























































