
हिंदुस्थानी नेमबाजांनी पहिल्या दिवसापासून आशियाई क्रीडा स्पर्धा गाजविली, पण त्यांना सुवर्णपदकाने अद्याप हुलकावणी दिली आहे. सोमवारी नेमबाजांनी तीन पदकांची भर घालत हिंदुस्थानची पदकसंख्या सहावर नेली. यापैकी तब्बल पाच पदके नेमबाजांनी मिळवली आहेत, तर एक पदक मिश्र मार्शल आर्ट्समध्ये आले आहे.
पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल वैयक्तिक प्रकारात हिमांशू ढिल्लोने 252.4 गुणांसह रौप्यपदक, तर माजी विश्वविजेता रुद्रांक्ष पाटीलने 230.9 गुणांसह कांस्यपदक पटकावले. चीनच्या शेंग लिहाओने 254.2 गुणांसह सुवर्णपदकावर निशाणा साधला.
याच प्रकारच्या सांघिक स्पर्धेतही हिंदुस्थानी त्रिपुटाने दमदार कामगिरी केली. पार्थ माने, रुद्रांक्ष पाटील आणि हिमांशू ढिल्लो यांच्या संघाने 1890.1 गुणांची कमाई करत रौप्यपदकावर नाव कोरले. चीनने 1899.9 गुणांसह सुवर्ण, तर दक्षिण कोरियाने 1884.2 गुणांसह कांस्यपदक मिळवले.
हिंदुस्थानच्या खात्यात आता चार रौप्य आणि दोन कांस्य अशी सहा पदके जमा झाली आहेत. त्यामुळे हिंदुस्थान पदक तक्त्यामध्ये दहाव्या स्थानावर आहे. चीन 18 सुवर्णांसह एपूण 32 पदकांची कमाई करून अव्वल स्थानी आहे. जपान आठ सुवर्णांसह 28 पदकांवर दुसऱया, तर दक्षिण कोरिया पाच सुवर्णांसह 21 पदकांवर तिसऱया स्थानावर आहे.

























































