लेख – मोबाईलचा शिक्षणाला ठेंगा?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> अजित कवटकर ([email protected])

एक उपकरण म्हणून मोबाईलची उपयुक्तता, उपयोगिता अनन्यसाधारण आहे, परंतु शालेय वयोगटातील बहुतांश विद्यार्थ्यांसाठी त्याचे व्यसन हे ‘स्लो पॉयझन’ ठरत आहे. ‘मोबाईलशिवाय राहूच शकत नाही’, अशी आपल्या पाल्याविषयीची तक्रार आज घराघराची डोकेदुखी झाली आहे.

इंटरनेटमुळे ज्ञानक्रांती घडली. माहितीचा प्रसार झाला. या आधुनिक माध्यमामुळे शिक्षणाच्या कक्षा विस्तारल्या, जिज्ञासेची व्याप्ती वाढली. जगाचे ज्ञान हे आता चार भिंतींमध्ये पूर्वीप्रमाणे बंदिस्त राहिलेले नाही आणि त्यावर कुणाची मक्तेदारीदेखील उरलेली नाही. कारण ज्याला जेव्हा जे जेवढं पाहिजे, त्याला ते तेव्हा सारं या माध्यमावर शोधून मिळते, उपयोगात आणता येते. या माध्यमाने ज्ञानसाधनेतील अन्यायी विषमता दूर करण्यास मोठी मदत केली. ज्ञानप्राप्तीकरिता आता कुणाची लाचारी पत्करण्याची आवश्यकता नाही की पैशांअभावी ज्ञानार्जनापासून वंचित राहण्याचे कारण नाही. विद्वत्तेला पोषक व समृद्ध करणारे हे माध्यम त्यामुळे विद्यार्थ्याच्या ज्ञानसंपन्नतेच्या दृष्टीने एक वरदान ठरले आहे. आज प्रत्येकाजवळ हमखास असणाऱ्या मोबाईल या उपकरणाच्या सहाय्याने ही शक्ती घराघरातील प्रत्येकापर्यंत पोहोचली आहे. विद्यार्थ्यांसाठी तर हे वरदानच होय. ‘लॉकडाऊन’मध्येदेखील यामुळेच अध्ययन व अध्यापन ऑनलाइन पद्धतीने अविरत व निर्विघ्न सुरू राहिले.

मात्र आज मुले मोबाईलसाठी वेडीपिशी झाली आहेत. ज्या अभ्यासासाठी त्यांच्या हातात मोबाईल आला तोच सोडून आता बाकी इतर सारे त्यावर केले जाते. ‘टाईमपास’च्या सर्व प्रकारांचे संशोधन व वापर त्यावर अविरत सुरू आहे. मोबाईल आता त्यांना आपल्या जगण्याचा एक अविभाज्य घटक वाटू लागला आहे. इतका की, ही आसक्ती आता विकृती होत, विकार होऊ पाहत आहे. यामुळे अभ्यासाची, संस्कारांची, आरोग्याची, भवितव्याची अक्षरशः वाताहत होण्यापर्यंतची मजल गाठली जाण्याची भीती आहे. प्रत्येक पालक याला दुजोरा देतील एवढी ही वास्तविकता भयावह, पण सत्य आणि सर्वव्यापी झाली आहे. उपायच अपाय ठरतो याचे हे एक जिवंत उदाहरण, जे आज ‘घर घर की कहानी’ आहे. मोबाईलचा हा नाद अनेक अपायकारक व्यसनं रुजविण्यास कारणीभूत ठरतो. मुलांना याच्या अतिरिक्त वापरापासून परावृत्त करण्याचा केला जाणारा प्रयत्न मग विद्रोहाच्या, आकांडतांडवाच्या रूपात पालकांना अनुभवास येत आहे. मोबाईलसाठी मुले पालकांना वेठीस धरत आहेत. ‘इमोशनल ब्लॅकमेल’ करून आपल्याला इच्छित असलेले साध्य करून घेण्याचे कौशल्य या पिढीला अधिक अवगत झाले आहे आणि हे संस्कारदेखील मोबाईलचेच कृपाशीर्वाद होय.

घरातील लहान मूल जर रडून रडून आपल्या कामांत अडथळे आणत असेल तर त्याला गप्प करण्यासाठी किंवा त्याला काही वेळ स्वतःमध्येच गुंतवून ठेवण्याकरिता घरातलेच मग एखादा यूटय़ूब व्हिडीओ लावून त्या लहानग्याच्या हातात मोबाईल देऊन त्याला त्यात रमवतात. हळूहळू हा रंगीबेरंगी दृकश्राव्य विरंगुळा त्याला आवडू लागतो, किंबहूना तो त्याच्या आहारी जातो. पुढे तो अधिक वेळ मोबाईलमध्येच घालवू लागल्याने त्याच्या परिवारापेक्षा त्यावर तो मोबाईलच अधिक संस्कार करतो, त्याचे व्यक्तिमत्त्व घडवतो, त्याचा दृष्टिकोन, समज तयार करतो. मोठय़ा मुलांच्या बाबतीत ते वेगळय़ा प्रकारे घडते. मुलाने बाहेर जाऊन उनाडक्या करण्यापेक्षा त्याने घरात पूर्ण दिवस मोबाईलवर बसणे हे पालकांना अधिक सोयीचे वाटते. म्हणजेच बाहेरच्यांची संगत सोडविण्यासाठी मोबाईलची संगत घातली जाते. मुलाला अभ्यास जमत नसला तरी त्याला मोबाईलवरील सगळे फिचर्स किती चांगल्या प्रकारे लिलया हाताळता येतात याचे पालकांना अप्रूप वाटते आणि त्याचे कौतुक ते सर्वत्र करतात, जे त्या मुलासाठी धोकादायक ठरते. शिवाय जर घरातलेच जर अर्ध्याहून अधिक वेळ मोबाईलवर कार्यरत असतील तर मग कुणी कोणास काय समजवावे?

एक उपकरण म्हणून मोबाईलची उपयुक्तता, उपयोगिता अनन्यसाधारण आहे, परंतु शालेय वयोगटातील बहुतांश विद्यार्थ्यांसाठी त्याचे व्यसन हे ‘स्लो पॉयझन’ ठरत आहे. ‘मोबाईलशिवाय राहूच शकत नाही’, अशी आपल्या पाल्याविषयीची तक्रार आज घराघराची डोकेदुखी झाली आहे. दोन वर्षांच्या कोरोना काळात वाचन-लिखाण यांपासून दुरावलेल्या विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता, आकलनशक्ती, अभ्यासाची आवड या मोबाईलमुळे अधिक देशोधडीला लागल्याचे पाहायला मिळते. सततच्या मोबाईलमुळे उद्भवणाऱ्या अनेकाविध शारीरिक व्याधींमध्ये झालेली लक्षणीय वाढ हे याची अपायकारकता स्पष्ट करतेच, परंतु मोबाईलच्या अतिरेकामुळे होणारे मानसिक आजारदेखील तितकेच नुकसानकारक ठरत आहेत. ऑनलाइन म्हणजेच व्हर्च्युअल जगात सोशलाइज करणारा वास्तविकतेमध्ये मात्र अबोला, एकलकोंडेपणा, अलिप्ततेला कवटाळून राहत असल्याचे सर्रास आढळते. विद्यार्थीदशेत मुलांमध्ये होणाऱ्या सर्वांगीण विकासाला ही वृत्ती नकारात्मक वळण देऊ शकते आणि आज त्या दिशाहीन प्रवाहात असंख्य वाहत असल्याचे स्पष्ट दिसते. या अशातून एखादा केव्हा पोगो ते पॉर्नचा पल्ला गाठतो ते कळत नाही. आणि मग सुरू होते वाताहत ः रिलेशनशीप, करीयरची, आयुष्याची. जडणघडणीच्या या शालेय वयात म्हणूनच मुलांना शक्यतो तितके मोबाईलपासून लांब ठेवणे अनिवार्य आहे, परंतु त्यांना तो देणे आवश्यकच असल्यास मग पालकांनी त्यावर नियंत्रण, मर्यादा ठेवणे अत्यावश्यक होय.

साखर व मीठ यांचे प्रमाणात सेवन केल्यास जेवणाची लज्जत वाढते, आरोग्य निरोगी राहते, परंतु त्याच्या विपरीत झाल्यास मात्र दुनियाभरचे रोग पाठी लागून जगणे मुश्कील करतात. तसेच मोबाईलचा वापरदेखील मर्यादेत, आवश्यकतेनुसार, गरजेपुरताच झाला तर हे तंत्रज्ञान जीवन अधिक सुखकारक करते, परंतु ट्रेन येण्यासाठी अर्धा मिनिट उरला असेल आणि तरी ते तीस सेकंद घालविण्यासाठी जर मोबाईल काढला जाणार असेल तर मग ही सवय नव्हे तर रोग आहे हे समजावे. या विकृतीतून एखादा प्रौढ एखाद वेळेस स्वतःला सावरू शकेल, परंतु जर एखाद्या विद्यार्थ्याला या मोबाईलनेच घडवलेला असेल, प्रगल्भ केला असेल तर त्यास कोणी व कसे सुधारावे ? संपर्कासाठी, सुरक्षिततेसाठी मुलांना मोबाईल देणे ठीक, पण त्यापलीकडे जर त्याचा हस्तक्षेप अतिरेक करत शिक्षणालाच ठेंगा दाखवत असेल तर त्याला आवरणे हीच साक्षरतेसाठीची प्राथमिकता ठरेल.