सभागृहात नौटंकी कशाला करताय? अजितदादांचा सत्ताधाऱ्यांवर आसूड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिशा सालियन प्रकरण झाले त्यावेळी आम्ही सरकारमध्ये होतो. त्यामुळे हे प्रकरण सीबीआयकडे नेले. सीबीआयने तपास केला आणि तिने आत्महत्या केली असे त्या ठिकाणी सांगितले. त्यामध्ये कुणाचाही संबंध नाही असे सीबीआयने स्पष्ट केले. हे प्रकरण संपले आहे. तरी पुन्हा खुसपट काढून सभागृहाचा वेळ वाया घालवला जात आहे. आम्हाला या विषयी बोलायला दिले जात नाही. यांचा सीबीआयवर विश्वास नाही का, असा सवाल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधान भवनाच्या आवारात माध्यमांशी बोलताना उपस्थित केला.

मुख्यमंत्र्यांच्या विरोधात विरोधक मुद्दा काढतील. प्रतिज्ञापत्र आल्यामुळे त्यांना उत्तर द्यायला जागा राहणार नाही. त्यामुळे ही नौटंकी चालली आहे, असा आरोपही अजित पवार यांनी सत्ताधाऱयांवर केला.

पूजा चव्हाण प्रकरणाचीही चौकशी करा

ही चौकशी करायची झाली तर मग सर्वांचीच चौकशी करावी लागेल. पूजा चव्हाणच्या संदर्भातील चौकशीही करा. चौकशी बंद झाली असली तरी ‘रिओपन’ करता येते. तेव्हा मी उपमुख्यमंत्री होतो आम्हालाही अधिकार होता. तेव्हा आम्हीही सांगत होतो की याची चौकशी झाली पाहिजे, असे अजित पवार म्हणाले.

अजित पवार यांनी सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांना भावनिक आवाहन केले. यावेळी त्यांनी दिशा सालियन मृत्यू प्रकरणात सीबीआयने काढलेल्या निष्कर्षाचा दाखला दिला. सुशांतसिंह राजपूतची मॅनेजर दिशा सालियन हिच्या मृत्यूप्रकरणी सीबीआयने नोव्हेबर 2022मध्ये केलेल्या खुलाशानुसार चौदाव्या मजल्यावरून तोल जाऊन खाली पडली असा निष्कर्ष काढला आहे. त्या संदर्भात अहवाल सादर करून अपघाती मृत्यू असल्याचेही सांगितले असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.