
आघाडीसाठी यापूर्वीही आम्ही आंबेडकरी चळवळीतील रामदास आठवले, जोगेंद्र कवाडे, गवई यांच्याशी चर्चा केली होती. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्याशीही चर्चा करण्यास आम्ही तयार आहोत, असे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज सांगितले.
अजित पवार यांनी विधान भवनात आज पत्रकार परिषद घेऊन राज्यातील शिंदे -फडणवीस सरकारचा समाचार घेतला. त्यावेळी प्रकाश आंबेडकर आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या युतीबाबत पत्रकारांनी त्यांना विचारले. त्यावर अजित पवार म्हणाले की, ‘भाजपाचा पराभव व्हावा, मतांची विभागणी होऊ नये म्हणून समविचारी लोक एकत्र येऊन तयारी करत आहेत; परंतु तयारी एका बाजूने चालत नाही, तर दोन्ही बाजूंची तयारी हवी.’
शेतकऱयांवर जलसमाधी घेण्याची वेळ आणू नका
‘अतिवृष्टीग्रस्त शेतकऱयांना सरकारकडून मदत मिळालेली नाही. सरकारबद्दल शेतकऱयांच्या मनात फार मोठी नाराजी आहे. या सरकारने जलसमाधी घेण्याची वेळ शेतकऱयांवर येऊ देता कामा नये’ असे अजित पवार म्हणाले. आम्ही सरकारमध्ये असताना आंदोलनाची भूमिका कुणी मांडली तर त्यांच्याशी चर्चा करत होतो; मात्र आताच्या सरकारला शेतकऱयांसोबत चर्चाच करायची नाही. ही भूमिका चुकीची आहे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.




























































