अलिबागच्या उमटे धरणाचे तिवरे होण्याचा धोका

50

सामना ऑनलाईन | अलिबाग

चिपळूणमधील तिवरे धरण फुटून  19 जणांचा बळी गेला. शेकडो संसार पाण्यात वाहून गेले. ही घटना ताजी असतानाच अलिबाग तालुक्यातील उमटे धरण धोकादायक बनले असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.  धरणाच्या सांडक्याच्या भिंतीला भगदाड पडले आहे. त्याचे दगड निखळून पडले असून अनेक ठिकाणी गळतीही लागल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे अलिबागमध्ये तिवरेची पुनरावृत्ती होणार काय, या भीतीने धरण परिसरातील महान, उमटे, रामराज, बोरघर आदी 12 गावांतील रहिवाशांची झोप उडाली आहे.

धरणाच्या सांडक्याची दुरुस्ती व्हावी यासाठी आम्ही सातत्याने जिल्हा परिषदेकडे पाठपुरावा केला, परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे जिल्हा परिषदेचे प्रशासन इथे तिवरेसारखी दुर्घटना होण्याची वाट पाहतेय का, असा प्रश्न आम्हाला पडला आहे. हे प्रकरण जिल्हा परिषद प्रशासनाने गांभीर्याने घ्यावे, अशी आमची कळकळीची विनंती आहे.

– कौस्तुभ पुनकर, सदस्य, बोरघर ग्रामपंचायत.

अलिबाग तालुक्यातील 62 गावे, काडय़ांना उमटे धरणातून पाणीपुरवठा केला जातो. हे धरण 1980 साली बांधण्यात आले आहे. त्यामुळे अलिबाग तालुक्यातील पाणीप्रश्न बऱयाच अंशी सुटला आहे. जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत असलेल्या या धरणाची योग्यरित्या देखभाल दुरुस्ती केली जात नाही. त्यामुळे या धरणामुळे धोका निर्माण होऊ शकतो. सांडक्याची जी संरक्षक भिंत आहे या भिंतीचे दगड पडून गेले आहेत त्यामुळे भगदाड पडल्यासारखी स्थिती आहे. धरणाच्या सांडक्याची दुरुस्ती करावी अशी मागणी ग्रामस्थांनी अनेकदा केली. याबाबत रायगड जिल्हा परिषदेकडे पाठपुरावाही करण्यात आला. स्थानिक तरुणांनी पत्रव्यवहारदेखील केला, परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत.

 सांडक्याच्या खालील बाजूस तात्पुरती मलमपट्टी करण्यात आल्याचे दिसून येते. रेती आणि सिमेंट कापरून खालील बाजूस दगड लावण्यात आले आहेत, परंतु मुख्य सांडक्याच्या भिंतीला पडलेले भगदाड तसेच आहे.

 दोन दिवसांपूर्वीच जिल्हा परिषदेच्या अधिकाऱयांनी या धरणाला भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर आज ‘या धरणाचे पाणी पिण्यासाठी वापरले जात असल्याने येथे पर्यटकांना येण्यास मज्जाव आहे’ अशा आशयाचे फलक या ठिकाणी लावण्यात आले आहेत.

 

आपली प्रतिक्रिया द्या