
रात्री-बेरात्री कामावरून घरी जाणाऱ्यांच्या आणि लहान मुलांवर भटक्या कुत्र्यांचे हल्ले होण्याचे प्रमाण गेल्या काही वर्षांत वाढले आहे. त्याचे पडसाद आज विधानसभेत उमटले. त्यातून संपूर्ण राज्यात 14 लाख 80 हजार आणि मुंबईत 94 हजार भटके कुत्रे असल्याची सरकारी आकडेवारी आज विधानसभेतील चर्चेतून पुढे आली आहे. भटक्या कुत्र्यांना खायला देणाऱ्या श्वानप्रेमींना रोखण्याची मागणी यावेळी सर्वपक्षीय आमदारांनी केली.
राज्यात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढत असल्याबाबत आमदार मुरजी पटेल यांनी विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नावर सर्वपक्षीय सदस्यांनी सरकारला धारेवर धरत भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रित करणे, त्यांचे निर्बीजीकरण व रेबीज लसीकरण प्रभावीपणे राबविण्यात सरकार अपयशी ठरत असल्याचा आरोप केला.
राज्यभरात 14 लाख 80 हजार श्वान असून त्यापैकी 94 हजार श्वान एकटय़ा मुंबईत आहेत. आतापर्यंत 1 लाख 82 हजार 413 श्वानांचे निर्बीजीकरण करण्यात आले आहे, तर 2 लाख 97 हजार 389 श्वानांचे लसीकरण करण्यात आले असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी चर्चेच्या उत्तरात या वेळी दिली.
भटक्या श्वानांचा वावर कमी करण्यासाठी कुपर रुग्णालयात आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या असून तिथे श्वानांचे निर्बीजीकरण व रेबीज लसीकरण होत असल्याचे उदय सामंत यांनी सांगितले. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश असल्याने पालिका स्तरावर हे काम केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
माणसांच्या सुरक्षेला प्राधान्य
उदय सामंत यांच्या मंत्र्यांच्या उत्तरात हस्तक्षेप करीत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले की, मंत्र्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या यासंदर्भातील निकालाचे वाचन करावे. श्वान दंशासंदर्भात निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने नागरिकांच्या जीविताला प्राधान्य द्यावे, असा निकाल दिला आहे. त्याचे पालन करा.




























































