अमरावती – सासू आणि बायकोवर कुऱ्हाडीने हल्ला, फरार तरूण पुण्यात सापडला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमरावती जिल्ह्यातील आसेगाव पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या टाकरखेडा पूर्णा येथे एका जावयाने सासूचा खून केला तर पत्नीला गंभीर जखमी केले. या जावयाचं नाव दिनेश बोरखळे असं असून त्याच्या पत्नीचं नाव स्नेहलता तर सासूचं नाव रुख्माबाई इंगळे असं आहे. हल्ल्यानंतर दिनेश फरार झाला होता. पण, आसेगाव पोलिसांनी त्याचा शोध घेऊन दिनेशला 29 जानेवारीला पुण्यातून अटक केली.

आसेगाव पूर्णाचे ठाणेदार किशोर तावडे यांनी सांगितले की, आरोपी दिनेशला घेऊन पोलिसांचे पथक अमरावतीकरिता रवाना झाले आहे. रात्री आसेगांव पूर्णा पोलीस ठाण्यात आरोपीला आणण्यात आले. रुख्माबाई इंगळे, (50, टाकरखेडा, पूर्णा) असे जावयाकडून कुऱ्हाडीने केलेल्या हल्ल्यात मृत झालेल्या सासूचे नाव आहे. स्नेहलता दिनेश बोरखडे (25, दर्यापुर पेठ, इतबाारपुरा) असे पतीने केलेल्या हल्ल्यात जखमी झालेल्या पत्नीचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, स्नेहलताची आई रुख्माबाईची तब्येत खराब झाल्याने ती 18 जानेवारीला आपल्या आईच्या घरी आली होती. दिनेश तिला घेण्याकरिता सासरवाडीकडे आला होता. परंतु स्नेहलताने सांगितले की, आईची तब्येत ठीक नसल्याने ती नंतर येईल, आज सोबत येऊ शकणार नाही. या कारणावरून दोघा पती-पत्नीमध्ये भांडण झाले. रागाच्या भरात दिनेश व सासू व पत्नीवर कुऱ्हाडीने हल्ला केला. दिनेश पत्नी स्नेहलतावर हल्ला करणार, हे पाहून स्नेहलतांची आई रुख्माबाई बचावाकरिता मध्ये आली असता कुऱ्हाडीचा हल्ला रुख्माबाईच्या डोक्यावर पडल्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला. तर गंभीर जखमी झालेल्या स्नेहलताला तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. दिनेश बोरखडे घटना घडल्यानंतर फरार झाला.

शेवटी पोलिसांनी जलद गतीने तपास करून पुणे पोलिसांच्या मदतीने आरोपी दिनेश बोरखंडेला अटक करण्यांत यश मिळवले. आसेगावचे ठाणेदार किशोर तावडे यांनी सांगितले की, मारेकरी दिनेशला पुण्यात अटक करण्यांत आली आहे. पुण्यात दिनेशचे कोणीही नातेवाईक नाही.परंतु त्याला दर्यापूरांत पकडले जाण्याची भीती होती, त्याकरिता कामाधंद्याकरिता तो पुण्याला पळाला. अटक झाल्यानंतर त्याने सदरची कबुली पोलिसांना दिली असल्याचे पोलिसांनी सांगितले.