
सामना ऑनलाईन । मुंबई
अमूल आठवडाभरात सांडणीचे दूध बाजारात आणणार आहे. आयुर्वेदिकदृष्टय़ा गुणकारी असल्याने सांडणीच्या दुधाला बाजारात चांगली मागणी आहे. त्याची दखल घेऊन डेअरीने आता देशभरात सांडणीच्या दुधाची विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. दररोज 10 हजार लिटर दुधाची विक्री अपेक्षित आहे.
अमूल डेअरी सध्या देशभरात गाईचे आणि म्हशीच्या दुधाच्या विक्रीत आघाडीवर आहे. जानेवारीमध्ये अमूलने अहमदाबादमध्ये प्रायोगिक तत्त्वावर सांडणीच्या दुधाची विक्री सुरू केली होती. ग्राहकांचा त्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याने त्यांनी देशभर विक्री करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती डेअरीचे एमडी आर. सी. सोढी यांनी दिली. सांडणीचे दूध सध्या चार दिवस टिकून राहते, मात्र या दुधाचे कच्छमधून देशभरात वितरण करावे लागणार असल्याने हे दूध टेट्रापॅकमध्येच उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे ते 80 दिवसांपर्यंत सहजपणे टिकून राहू शकणार आहे.
डायबेटीसवर गुणकारी
सांडणीच्या दुधामध्ये इतर दुधाच्या तुलनेत मोठय़ा प्रमाणात आयुर्वेदिक घटक आहेत. या दुधात इन्सुलीन प्रोटीन जास्त असल्याने डायबेटीसच्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरणार आहे.



























































