
सत्तर वर्षीय वृद्धेला वाचवण्यासाठी एका पोलिस हवालदाराने आपल्या जीवाची पर्वा न करता विहिरीत उडी घेतल्याची घटना समोर आली आहे. आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यातील गुदूर गावात बुधवारी ही घटना घडली.
‘द इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्तानुसार, हवालदार ए शिवकुमार हे रात्री 11.50 वाजता ड्युटीवर असताना त्यांना 100 नंबरद्वारे सूचना मिळाली की, एक वृद्ध महिला आपल्या घरातील विहित पडली आहे. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी जमली होती. मात्र अंधार असल्याने कोणीही वृद्धेला वाचवण्यासाठी विहिरीत उतरायला तयार नव्हते.
जीवाची पर्वा न करता विहिरीत घेतली उडी
या घटनेची सूचना मिळताच हवालदार ए शिवकुमार काही मिनिटातच घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी वृद्ध महिला बुडत असल्याचे त्यांनी पाहिलं. ते घटनास्थळी शिडी किंवा दोरी शोधात होते, मात्र काही न मिळाल्याने त्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता विहिरीत उडी घेतली. त्यांनी वृद्ध महिलेला वाचवण्याचे प्रयत्न सुरु केले असता स्थानिकांनी दोरीचा बंदोबस्त करून ती विहिरीत सोडली. 10 मिनिटाच्या आतच स्थानिकांच्या मदतीने शिवकुमार यांना वृद्ध महिलेचे प्राण वाचवण्यात यश आलं.
या घटनेबाबत बोलताना हवालदार शिवकुमार म्हणाले की, ‘त्यावेळी वृद्ध आजीला वाचवणे हे एकमेव उद्दीष्ट माझं होतं.’ दरम्यान, वृद्धेला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.




























































