जरा हटके : इतिहासकालीन नाणी

142

अनिकेत आपटे, दादर

छंद म्हणजे आपण जोपासलेली आवड. त्यामुळे आपला निवांत वेळ सत्कारणी लागतो आणि मन ताजेतवाने होते. मला आठकीत असल्यापासून नाणी, चलनी नोटा जमा करण्याचा छंद निर्माण झाला. खरं तर त्यावेळी शाळेत ‘नाण्यांचा इतिहास’ हा धडा होता, त्यातून नाणी जमा करण्याचा विचार मनात आला आणि त्याचे छंदात रूपांतर झाले. तेव्हापासून नाणी आणि नोटा यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला.

सर्वात आधी घरातून वेगवेगळी नाणी जमा केली. त्यानंतर ब्रिटिश काळातील नाणी त्यानंतर हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरची नाणी, काही विशिष्ट कारणांनी हिंदुस्थान सरकारने काढलेली नाणी, चांदीची नाणी तसेच एक, दोन, पाच, दहा यांची वेगवेगळी मागे छाप असलेली नाणी सध्या माझ्या संग्रहात आहेत. तसेच चलनी नोटादेखील आहेत. त्याचबरोबर एक रुपयाच्या नोटांमधील झालेला बदल तसेच दोन रुपयांच्या नोटा, पाच रुपयांच्या नोटा, दहा रुपयांच्या नोटांच्या विविध रंगछटा असलेल्या नोटा संग्रहात आहेत. वीस, पन्नास, शंभर, पाचशे या नोटा संग्रहात आहेत. त्याचबरोबर जुन्या काळातील एक रुपयाचा पाव भाग असलेलं नाणे संग्रहात आहेत. एक रुपया, दहा रुपये, ब्रिटिश काळातील एक रुपयाचे अशी चांदीची नाणी संग्रहात आहेत. विविध परदेशातील नाणी व चलनी नोटा यांचादेखील संग्रह मी सध्या करतोय. आज सांगताना आनंद होतोय की, एका नाण्यापासून सुरू झालेला छंद आज जवळजवळ दीडशे ते दोनशेच्या घरात पोहोचलाय.

माझा हा छंद पाहून अनेकांकडून प्रोत्साहन मिळाले. काहीजणांनी मुद्दाम जुनी नाणी दिली. आमच्या शेजारील ताई ऑस्ट्रेलियाला असते. तिनेदेखील मला त्या देशाचे नाणे दिले. ते माझे आंतरराष्ट्रीय पहिलं नाणं आणि ते बघितल्यावर जो आनंद झाला तो शब्दांत नाही सांगता येणार. घरच्यांकडून मला पाठिंबा मिळत होता. त्यांच्याकडे कोणतंही वेगळं नाणं किंवा नोट आली की, माझ्यासाठी वेगळी बाजूला काढून ठेवतात आणि नोटाबंदीनंतर माझ्या संग्रहात ५०० रुपयांची नोट आहे. आता आंतरराष्ट्रीय नाणी आणि नोटा यांची संख्यादेखील वाढली आहे. या नाण्यांच्या संग्रहातून मला स्वत:ला आनंद मिळतो. मला नाणकशास्त्रात प्रचंड रुची आहे. त्याचबरोबर नाण्यांची काळजीही घेतो. नाणी आणि नोटा यांना मी खूप जपतो. ती गंजू नयेत म्हणून त्यांची योग्य ती काळजी घेतो.

आपली प्रतिक्रिया द्या