
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी नवी दिल्लीत पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना ‘आपल्या पक्षाचे खासदार एकत्र आहेत आणि एकत्रच राहतील’ असं ठणकावून सांगीतलं. ‘ऑपरेशन टायगर’च्या अफवा पसरवणाऱ्यांना त्यांनी यावेळी चांगलंच सुनावलं. तर फोडोफोडीचे राजकारण करणाऱ्या सत्ताधारी भाजपची पिसं काढली. ‘ऑपरेशन हे रुग्णालयात होत असतात. राजकीय लोक कधीपासून हातात कैची, सुऱ्या घेऊन ऑपरेशन करायला लागलेत. याला फोडोफोडी म्हणतात, खरेदी विक्री संघ म्हणतात. देशभरात गेल्या 12 वर्षात यापेक्षा वेगळ काही चाललेलं नाही. तृणमूल काँग्रेस पक्षातून 20 ते 22 खासदार बाहेर पडले आणि नॅशनलिस्ट सिटीझन्स पार्टीत त्यांनी प्रवेश केला. याला भाजपची भूक म्हणणार की हाव म्हणणार?, असं म्हणत शिवसेनेच्या बाबतीत ज्या बातम्या पसरवल्या जातात त्या चुकीच्या असल्याचं संजय राऊत यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं.
पुढे पत्रकारांसोबत बोलताना ते म्हणाले की, ‘शरद पवारांनंतर उद्धव ठाकरे यांच्या इतका लोकप्रतिनिधींना आणि कार्यक्रत्यांना भेटणारा नेता याक्षणी महाराष्ट्रात नाही. ‘मातोश्री’चे दरवाजे सगळ्यांसाठी उघडे असतात. ग्रामीण भागातले खासदार मुंबईत आले की ते उद्धव ठाकरे यांना भेटतात. विधीमंडळाच्या काळात आमदार येतात तेव्हा ते उद्धवजींना भेटतात. त्यामुळे उद्धवजी कोणाला भेटत नाही अशी माहिती पूर्णपणे चुकीची आहे’, असं त्यांनी सांगीतलं.
‘आमच्याकडे जर ईडी असती तर धाक कायम राहिला असता. सध्या मोदी किंवा अमित शहांचा धाक म्हणजे काय व्यक्तिगत धाक नाही. ईडी आणि सीबीआय त्यांच्या हातात आहे म्हणून हा धाक आहे. उद्या सत्तेवर नसले तर कोणता धाक? एका मंत्र्याला जर एक खासदार भेटला तर त्यात चुकीचं काय? उद्या जर मला माझ्या कामासाठी पंतप्रधान भेटले तर मीही त्यांना भेटेन. जर एखाद राष्ट्रहिताचं काम असेल तर मी नक्कीच पंतप्रधानांना भेटेन. ते कोणत्याही पक्षाचे नाहीत तर ते देशाचे आहेत. मुख्यमंत्री, मंत्री हे राज्याचे आहेत. महाराष्ट्रातील अनेक मंत्र्यांशी लोकांच्या कामासंदर्भात मी अनेकदा चर्चा करतो, असं म्हणत त्यांनी खासदारांच्या भेटीगाठी या प्रत्येकवेळी पक्षांतरासाठीच नसतात असं संजय राऊत म्हणाले.
ऑनलाईन काम करा असं सरकारने सांगितलेलं!
गृहखात्यांच्या बैठकांमध्ये अनेकदा अमित शहा आमच्या समोर बसलेले असतात. तेव्हाही आमच्यात संवाद होतो. आमचा एक खासदार मंत्र्याला भेटला यावरून जे चित्र रंगवलं जातय हे चुकीच आहे. खासदार ऑनलाईन बैठकीत सामिल झाले. ही सूचना सरकारचीच आहे, ऑनलाईन काम करा असं सरकारने सांगितलेल आहे. पेट्रोलचा प्रश्न किंवा अन्य जागतिक प्रश्नांमुळे सरकारने देशाला आवाहन केलंय की तुम्ही कामे ऑनलाईन पद्धतीने करा. जर एखादा खासदार फार लांब आहे, त्यांना येणं शक्य नसेल तर तो खासदार ऑनलाईन उपस्थित राहिला तर त्यात चुकीच काय? ज्यांना येणं शक्य नव्हत ते ऑनलाईन उपस्थित राहिले. त्यांनी संवाद साधला आणि आपल्या भूमिका मांडल्या यात त्यांच काय चुकलं?, असा सवाल त्यांनी केला.
लोकसभा अध्यक्षांच्या भेटी संदर्भात विचारले असताना , ‘मला कधी अशा लोकांना भेटताना पाहिलय का? मी गेली 24 वर्ष दिल्लीत आहे. मला तुम्ही मागच्या 12 वर्षात अशा प्रकराच्या लोकांना, भाजपच्या मंत्र्यांना कधी भेटताना पाहिलं का? जे लोक संविधानाचं, घटनेचं, नियमांचं पालन करत नाहीत, अशा कोणत्याही माणसाला मी भेटत नाही’, असा शब्दात त्यांनी आपली भूमिका मांडली.
खासदारांच्या बैठकीवर विचारलेल्या प्रश्नांवर बोलताना बैठकीत काय झालं हे संजय राऊत यांनी स्पष्ट केलं. ‘खासदारांच्या बैठकीत पूर्ण वेळ मी उपस्थित होतो. अशा प्रकारच कोणतंही वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलेलं नाही. जायचं असेल त्यांनी जा हे वाक्य त्यांच्या तोंडी घातलेलं आहे. माझ्या समोर, मी तिथे असेपर्यंत ते असे बोलले नाहीत. आणि बोलणारही नाहीत. यावेळी त्यांनी असं कोणतेही विधान केलेलं नाही. याउलट खासदाराच्या बैठकीत ते स्वत: प्रत्येक खासदारासोबत संवाद साधत होते. त्यांच्या अडचणी समजून घेत होते. कोणीतरी अशा अफवा पसरवत असेल तर ते चुकीचं आहे. भाजपच्या आणि मिंधे गटाच्या लोकांना काय काम उरलेलं नाही. या सगळ्याचा परिणाम देशाच्या राजकीय प्रकृतीवर होणार’, असं त्यांनी सांगीतलं.
भाजपची विश्वासार्हता राहिली का?
देशातील राजकारणात विरोधी पक्ष फोडाफोडीचे प्रकार गेल्या काही वर्षांपासून सुरू आहेत. भाजपच्या देशभरातील कार्यपद्धतीला लक्ष्य करताना ‘भाजपची विश्वासार्हता राहिली का? नरेंद्र मोदी, अमित शहा, सुवेंदू अधिकारी, देवेंद्र फडणवीस आणि त्यांचा पक्ष हे विश्वास पात्र उरलेत का? कालांतराने पैसै देऊन जे पक्ष फोडतात त्यांना लोक जोड्याने मारतील. आता लोक दबलेले आहेत. लोकशाहीत यांना जोड्याने मारण्याचीच लायकी आहे. न्यायालयात, निवडणूक आयोगात न्याय मिळत नाहीये. 12 वर्षांपासून सगळे घरगड्यासारखे काम करताहेत. कुठे आहे लोकशाही? कुठे आहे संविधान? हे प्रश्न भाजपच्या मंत्र्याना विचारायला हवे. देशाच्या प्रधानमंत्र्यांनी पत्रकार परिषद घ्यावी आणि त्यात हे प्रश्न त्यांना विचारायला हवे’, असंही ते म्हणाले.
खासदारांनी आई भवानीची शपथ घेतली आहे…!
’19 तारखेला वर्धापन दिनाच्या दिवशी वेगळे घडेल. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी निमित्त त्यांनी पाठीत खंजीर खुपसण्याचे सुरे तयार करून ठेवले असतील. यापेक्षा वेगळं ते काहीच करू शकत नाही. या सगळ्यांनी हिंदुहृदसम्राट बाळासाहेबांच्या विचारांच्या पाठीत खंजीर खुपसलेला आहे. हे दिल्लीचे घरगडी झालेले आहेत. जे खासदार बैठकीत सहभागी झाले त्यांनी आई भवानीची शपथ घेतलेली आहे. साहेब आम्ही तुमच्या बरोबरच आहोत. कुणी मुलांची तर कुणी आईची शपथ घेतली, कोणी तुळजा भवनीची, साईबाबांची शपथ घेतली. ते सगळे खासदार हिंदुत्ववादी असल्यामुळे ते हिंदुत्वाचं पालन करतील याची खात्री आहे’, असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.



























































