आणखी एक अधिकारी ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकला? एटीएसकडून जबाब, हवाई दलाकडूनही चौकशी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशाच्या सुरक्षे संदर्भातील संवेदनशील माहिती पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांना दिल्याप्रकरणी एटीएसचा तपास सुरू आहे. या तपासात एक मोठी माहिती समोर आली आहे. डॉ. प्रदीप कुरुलकर यांच्यासह हिंदुस्थानच्या हवाई दलाचा एक अधिकारीदेखील पाकिस्तानी गुप्तचर संस्थेच्या संपर्कात असल्याचे समोर आले आहे. निखील शेंडे असे या अधिकाऱ्याचे नाव असल्याचं वृत्त मराठी वृत्तपत्रांच्या संकेतस्थळावरून देण्यात आले आहे. निखील शेंडे हे बंगळुरूमध्ये कार्यरत असल्याचंही सांगण्यात येत आहे.

आरोपी डॉ. प्रदीप कुरुलकर यांना सोमवारी एटीएस कोठडी संपल्यानं न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. कुरुलकरांना मंगळवारपर्यंत एटीएस कोठडी सुनावण्यात आली आहे. डॉ. प्रदीप कुरुलकर यांच्यासह निखिल शेंडे हे या वायुदलातील अधिकाऱ्याचीही चौकशी सुरू करण्यात आली आहे. ते देखील पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेच्या संपर्कात असल्याच एटीएसच्या तपासात निष्पन्न झालं आहे. पाकिस्तानातील ज्या आयपी अॅड्रेसवरुन डीआरडीओचे संचालक प्रदीप कुरुलकर यांच्याशी संपर्क साधण्यात आला होता, त्याच आयपी अॅड्रेसचा उपयोग निखिल शेंडे यांच्याशी संपर्क साधण्यासाठी वापरण्यात येत होता अशी माहिती एटीएसच्या तपासात समोर आल्याचं कळतं आहे.

निखिल शेंडे यांचा जबाब एटीएसनं नोंदवला आहे. हवाई दलाकडून देखील चौकशी करण्यात आली आहे. त्यामुळे पाकिस्तानी यंत्रणा कुरुलकरच्या माध्यमातून इतर अधिकाऱ्यांनादेखील ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकवण्यासाठी प्रयत्न झाले का हे देखील तपासण्यात येत आहे.