मुलीला रेपच्या धमक्या, डिप्रेशन अन् हृदय विकाराचा झटका, ‘सेक्रेड गेम्स’च्या दिग्दर्शकाने शेअर केला भयानक अनुभव

चित्रपटसृष्टी, सामाजिक आणि राजकीय घडामोडींवर रोखठोक भूमिका मांडणारा दिग्दर्शक अशी अनुराग कश्यप याची ओळख आहे. ‘गँग्स ऑफ वासेपूर’, ‘देव डी’, ‘अगली’ यासारखे हिट चित्रपट आणि ‘सेक्रेड गेम्स’सारख्या प्रसिद्ध वेब सीरिजचे दिग्दर्शन केलेल्या अनुराग कश्यप याने नुकत्याच एका मुलाखतीमध्ये नैराश्य अर्थात डिप्रेशनबाबत खुलासा केला आहे. मुलीला मिळणाऱ्या बलात्काराच्या धमक्यांमुळे आपण हादरून गेलो होतो. डिप्रेशनमुळे तीन वेळा रिहॅबमध्ये जावे लागल्याचेही त्याने सांगितले.

‘इंडियन एक्सप्रेस’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये अनुराग कश्यप याने आपण नैराश्याचा सामना केल्याचे सांगितले. कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन लागला आणि यामुळे अनुराग कश्यप याच्या ‘ऑलमोस्ट प्यार विद डीजे मोहब्बत’ या चित्रपटाचे चित्रिकरण रेंगाळले होते. तसेच ‘तांडव’ ही वेब सीरिजही वादात अडकली होती. हा काळ अनुराग कश्यपसाठी डार्क फेज ठरला. या काळात आपण डिप्रेशनमध्ये गेलो होते आणि तीन वेळा रिहॅब सेंटरमध्येही जावे लागले. तसेच हृदय विकाराचा झटकाही आल्याचे त्याने सांगितले.

मुलगी आलिया कश्यपला येणाऱ्या बलात्काराच्या धमक्यांमुळे तिलासुद्धा वारंवार एंग्झायटी अटॅक्स येत होते, असा खुलासाही त्याने केला. याचा सामना कसा करावा हे मला कळत नव्हते. परंतु नैराश्याचा सामना करत असताना आणि आयुष्याच्या अत्यंत वाईट काळातून जात असतानाही मी काम करणे सोडले नाही, असे त्याने सांगितले. तसेच मी माझे आयुष्य पुन्हा सुरू केले, कारण बसून वाट पहावी असे दुसऱ्यांसारखे माझे आयुष्य लक्झरी नसल्याचेही त्याने सांगितले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Anurag Kashyap (@anuragkashyap10)

दरम्यान, 2019 मध्ये अनुराग कश्यप याची मुलगी आलिया हिला ट्रोलर्सचा सामना करावा लागला होता. तिला बलात्काराच्या धमक्या मिळत होत्या. यामुळे तिला एंग्झायटी अटॅक्स येत होते, असा खुलासा अनुरागने केला. यामुळेच आपण ट्विटरला रामराम केल्याचे त्याने सांगितले.