
>> अर्चना मिरजकर
पंडिती परंपरेतील शेवटचे आणि सर्वात प्रसिद्ध कवी मोरोपंत यांची ‘श्लोककेकावली’ आज आपण पाहणार आहोत.
मोरोपंतांचा जन्म 1729 साली पन्हाळगडावर झाला. इथेच शिक्षण पूर्ण करून ते नंतर बारामतीला स्थायिक झाले. पेशव्यांचे जावई बाबूजी नाईक यांच्याकडे त्यांना पुराणिक म्हणून राजाश्रय मिळाला. तल्लख बुद्धी, वाचनाचा व्यासंग आणि संस्कृतवरचे पांडित्य यामुळे मोरोपंतांचे पुराणकथन अतिशय रंगत असे. संस्कृत काव्यांच्या काळापासून प्रचलित असलेले ‘आर्या’ वृत्त मोरोपंतांच्या अतिशय आवडीचे. या ‘आर्या’ वृत्तात त्यांनी ‘कृष्णविजय’, ‘प्रल्हादविजय’ हे ग्रंथ लिहिले. शिवाय मोरोपंतांनी वेगवेगळ्या प्रकारांनी 108 रामायणे लिहिली. प्रत्येक रामायणात त्यांनी एक वेगळा नियम पाळला. आयुष्याच्या शेवटी पंतांनी ‘पृथ्वी’ वृत्तात ‘श्लोककेकावली’ लिहिली. बऱयाच समीक्षकांच्या मते ही मोरोपंतांची सर्वात श्रेष्ठ रचना आहे. कारण यात भाषेच्या सौंदर्याबरोबरच त्यांच्या मनातील भाव उत्कटपणे व्यक्त झालेले आहेत.
स्वतःचा उद्धार करण्यासाठी देवाची केलेली आर्त विनवणी हा या काव्याचा विषय आहे. मोरोपंतांचा म्हणजेच मोराचा हा टाहो आहे. म्हणून त्यांना मोरोपंत ‘केका’ म्हणतात. अशा ‘केकांची आवली’ म्हणजे माळ म्हणून ‘केकावली’.
मोरोपंत अतिशय विश्वासाने आणि सलगीने यात देवाबरोबर संवाद साधतात. जणू देव त्यांचं बोलणं ऐकतो आहे, त्यांच्या समोर साक्षात उभा आहे आणि ते त्याला कधी विनवतात, कधी टोमणा मारतात, तर कधी त्याच्याशी भांडतातसुद्धा!
कितीतरी लोकांचा तू उद्धार केला आहेस, अशी ते देवाला आठवण करून देतात. मग मीच कसा काय अजून उद्धार झाल्याविना उरलो? असा ते देवालाच प्रश्न विचारतात.
तसाचि उरलो कसा? पतित मी नसे काय की?
कृपाच सरली? असेही न घडे जगन्नांयकी
नसेन दिसलो कसा? नयन सर्वसाक्षी रवी,
विषाद धारीला म्हणो? न सुरभि विषक्षीर वी
मग ते देवाची थोडी खुशामत करतात. एवढे द्रोणागिरी, मंदार पर्वत, गोवर्धन पर्वत उचलणारे तुम्ही, वराह अवतारात तर तुम्ही अख्खी पृथ्वीच उचलून धरली, तेव्हा माझा उद्धार करणे तुम्हाला काय कठीण आहे?
…आणि मग साम-दाम या उपायांनी देव काही बधत नाही असे पाहिल्यावर ते त्याला दंडही देतात.
न पावसि, म्हणोंनि मी म्हणतसे तुला आळशी;
वरी न असदुक्ति हे रविसखोत्थिता आळशी
पण पंतांचा देवावरचा राग फार काळ टिकत नाही. ते पुन्हा त्याला प्रेमळपणे साद घालतात.
अगा! प्रणतवत्सला! म्हणति त्या जना पावला;
म्हणोन तुमच्याच मी स्मरतसे सदा पावला
इथे यमकाबरोबरच ‘पावला’ या शब्दावर ते श्लेषही साधतात. देवाला त्यांनी असा जाब विचारला असला तरी आपण सर्वसाधारण पापी मनुष्य आहोत याची त्यांना जाणीव आहे. सर्व पातकांचा नाश करणारी गंगा नदीदेखील मी केलेली अक्षम्य पातके पाहून भिऊन गेली, असं वर्णन ते करतात.
मला निरखिता भवच्चरणकन्यका आपगा
म्हणे, ‘अगई! ऐकिलेहि न कधी असे पाप गा!
कृतांतकटकामलध्वजजरा दिसो लागली
पुरःसरगदांसवे झगडता तनू भागली
सहाय दुसरा नसे तुजविणे बळे आगळा
न हो जरि उताविळा, स्वरिपु कापितो हा गळा
ही मोरोपंतांची अत्यंत प्रसिद्ध ‘केका’ आहे. कृतांत म्हणजे यम. त्याच्या सैन्याचा जणू ध्वज असा हा पांढरा केस दिसू लागला आहे. आयुष्यात वारंवार येणाऱया संकटांशी झगडून माझं शरीर आता थकून गेलं आहे आणि तुझ्याशिवाय मला दुसऱया कुणाचा आधार आहे?
परमेश्वराला असे वेगवेगळ्या तऱहेने आळवून मोरोपंत परमेश्वराच्या कथेचे गुणगान करतात. त्याच्या कथेचे श्रवण देवालाच कसे प्रिय आहे याची आठवण करून देतात. भक्तांच्या जीवनाचा भार खांद्यावर घेणारा तू दयाळू पिता आहेस, असं ते देवाला म्हणतात.
पिता जरि विटे, विटो न जननी कुपुत्री विटे
दयामृतरसार्द्रधी न कुलकज्जले त्या किटे
प्रसादपट झांकिती परि परा गुरूचे थिटे
म्हणूनि म्हणती भले न रिण जन्मदेचे फिटे
ही त्यांची प्रसिद्ध ‘केका’ देवाला त्याच्या मातृभावाची आठवण तर करून देतेच, पण एक शाश्वत सत्य म्हणून जनमानसातही रुजते.
मोरोपंतांच्या अशा अनेक आर्या सुभाषितांसारख्या मराठी भाषेत प्रचलित झाल्या आहेत. एकेकाळी मोरोपंतांचं काव्य पाठ असणं हे सुसंस्कृतपणाचं लक्षण मानलं जायचं. ‘केकावली’च्या शेवटी मोरोपंतांनी केलेली प्रार्थना त्यांच्या सत्त्वशील वृत्तीची साक्ष देते आणि आजदेखील तितकीच आवश्यक वाटते…
सुसंगति सदा घडो; सुजनवाक्य कानी पडो
कलंक मतिचा झडो; विषय सर्वथा नावडो
सदंघ्रिकमळी दडो; मुरडिता हटाने अडो
वियोग घडता रडो मन, भवच्चरित्री जडो
जुन्या मराठीतील वृत्तांचा, अलंकारांचा आणि शब्दचमत्कृतींचा आनंद घेण्यासाठी अवश्य वाचा मोरोपंतांची ‘केकावली’.
ब्लर्ब
मोरोपंत शब्दांना आपल्या मनाप्रमाणे कसं खेळवतात हे प्रोफेसर अविनाश सांगोलेकर यांच्याकडून ऐकण्यासाठी पहा. www.youtube/@granthyatra/
भाग -10.
[email protected]































































