
फ्रान्स माजी जगज्जेता असला तरी यंदाचा वर्ल्ड कप अर्जेंटिनानेच जिंकावा, अशी इच्छा अवघ्या जगाची आहे. त्यामुळे अवघ्या अर्जेंटाइन फुटबॉलप्रेमींसाठी देव असलेला लिओनल आपल्या संघाचा मसीहा बनतो की पुन्हा एकदा फ्रान्सच बाजी मारतो, याकडे अवघ्या जगाचे लक्ष लागले आहे. अर्जेंटिना आणि फ्रान्सने आतापर्यंत दोनवेळा जगज्जेतेपद पटकावले असून तिसऱयांदा कोण हा प्रश्नही उभा ठाकला आहे. रविवारी रात्री या प्रश्नाचे समाधानकारक पण थरारकरीत्या उत्तर मिळेल, थोडी प्रतीक्षा करावी लागेल.
ज्या क्षणाची अवघे विश्व वाट पाहात होते तो क्षण जवळ आलाय. फुटबॉल विश्वाला अपेक्षित असलेली युरोपियन विरुद्ध लॅटिन अमेरिकन अशी काँटे की टक्कर पाहायला मिळणार आहे. फुटबॉल वर्ल्ड कपच्या प्रारंभापासून युरोपियन आणि लॅटिन अमेरिकन संघ आलटून-पालटून अजिंक्यपद जिंकायचे, अपवाद फक्त दोन स्पर्धा होत्या. 1934 आणि 1938 साली इटलीने सलग जेतेपद संपादले होते, तर 1958 आणि 1962 साली ब्राझीलने सलग बाजी मारली होती. 2002 सालापर्यंत इतिहास तोच होता पण 2006 साली इतिहास बदलला. त्या वर्षी अंतिम फेरीत पोहोचणारे दोन्ही संघ युरोपियन होते आणि त्यात इटलीने करिश्मा केला. 2010 सालीसुद्धा असेच घडले आणि त्या वर्षीही युरोपियन संघ स्पेनने इतिहास घडवला. त्यामुळे दर आठ वर्षांनी जिंकणारा लॅटिन अमेरिकन संघ गेली 20 वर्षे जगज्जेतेपदापासून दूर आहे. इतकी दीर्घ प्रतीक्षा लॅटिन संघांनी आजवर कधीच केली नव्हती. त्यामुळे अर्जेंटिना ही प्रतीक्षा संपुष्टात आणेल, असेच चित्र सध्या उभे आहे.
मेस्सी लिहिणार सुवर्ण क्षण
2014 च्या वर्ल्ड कपमध्ये मेस्सी आपल्या सर्वोच्च स्थानावर होता. तेव्हा तो अर्जेंटिनाला जिंकून देणार असेच वाटत होते, पण त्याला आपल्या इतर सहकाऱयांची साथ लाभली नाही आणि अर्जेंटिनाचे जगज्जेतेपद थोडक्यात हुकले. आता पुन्हा तो क्षण मेस्सीच्या खेळामुळे अर्जेंटिनाला लाभला आहे. जवळजवळ सर्व स्पर्धा आणि सर्व पुरस्कार जिंकणाऱया मेस्सीला आपल्या सोनेरी कारकीर्दीला फिफा वर्ल्ड कप जिंकून निरोप द्यायचा आहे. जी भावना मेस्सी आहे, तीच भावना अवघ्या अर्जेंटाइन संघाची आहे. मेस्सी तुझ्यासाठी हा वर्ल्ड जिंकायचाय. त्यामुळे फ्रान्सच्या तुलनेत अर्जेंटिनाची प्रबळ इच्छा 36 वर्षांनंतर चमत्कार घडवू शकते.
लॅटिनपेक्षा युरोप आघाडीवर
वर्ल्ड कपमध्ये नेहमीच सर्वाधिक संघ युरोपचेच असतात. यंदाही युरोप 13 संघ खेळले तर लॅटिनचे केवळ चारच संघ. तरीही दोन्ही खंड अंतिम फेरीत पोहोचलेत. आजवर झालेल्या 20 स्पर्धांपैकी सर्वाधिक 11 वेळा युरोपियन संघ जगज्जेते ठरलेत तर 9 वेळा लॅटिन अमेरिकन. आजवर तीन जेतेपदं (ब्राझील, अर्जेंटिना, उरुग्वे) लॅटिन आहेत तर चार (जर्मनी, इटली, फ्रान्स, स्पेन) युरोपियन संघ आहेत.
तिसऱयांदा जगज्जेता कोण
फ्रान्स आपल्या सलग दुसऱया जगज्जेतेपदासह कारकीर्दीतील तिसऱया विश्वविजेतेपदासाठी सज्ज झालाय. तसाच तब्बल 36 वर्षांची प्रतीक्षा संपविण्यासाठी अर्जेंटिनाही मैदानात उतरला आहे. अर्जेंटिनाने आपले पहिले दोन वर्ल्ड कप 1978 आणि 1986 साली जिंकले होते, तर फ्रान्सने 1998 आणि 2018 साली. दोन्ही संघ दोनदा जगज्जेते ठरले असून दोघांपैकी एक तिसऱयांदा वर्ल्ड कप जिंकणारा चौथा संघ ठरू शकतो.
एम्बाप्पे की मेस्सी…
अंतिम सामना हा अर्जेंटिना विरुद्ध फ्रान्सच रंगणार आहे. सर्वांच्या नजरा मेस्सी आणि एम्बाप्पेवर असल्या तरी या दोन्ही संघांत गोल करण्याची क्षमता असलेले अनेक दिग्गज आहेत. या यादीत साहजिकच एम्बाप्पे आघाडीवर आहे. रशियात फ्रान्सला जगज्जेतेपद मिळवून देणाऱया किलीयन एम्बाप्पेने कतारमध्येही चक्क पाच मैदानी गोल केलेत. त्यामुळे एम्बाप्पे ‘गोल्डन बूट’ आणि ‘गोल्डन बॉल’च्या शर्यतीतही सर्वात पुढे आहे. त्याच्या मागोमाग आहे ऑलिव्हिएर जिरू. या स्पर्धेतील सर्वोत्तम गोल करणाऱया जिरूने चार गोल ठोकलेत. एम्बाप्पे आणि जिरूच्या जोडीने वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत कमालच केलीय, पण त्यांच्या ऍण्टोइन ग्रिझमन, राफाएल वॉरेन आणि कर्णधार ह्युगो लिओरिसला विसरून चालणार नाही. यांनीही स्पर्धेत जोरदार खेळ केला आहे. त्याचप्रमाणे अर्जेंटिनाच्या मेस्सीच्या जोडीला ज्युलियन अल्वारेज, नाहुएल मोलिना, एंजो फर्नांडेझ आणि इमिलानो मार्टिनेझ हे आहेतच. उपांत्य सामन्यात अल्वारेजने दोन गोल करून फायनलमध्ये हम भी हैं जोश में दाखवून दिलेय. शेवटी असे असले तरी सर्वकाही मेस्सीच्या कामगिरीवरच अर्जेंटिनाची मदार असेल, हे कोणीही नाकारू शकत नाही.

























































