शिरीषायन – तुमचा आवडता लेखक कोण?

>> शिरीष कणेकर

लेट मी रीफ्रेम माय क्वेश्चन- नेमक्या कुठल्या गुणधर्मांमुळे लेखक तुमचा आवडता होतो? सांगू? मी लेखक नाही, पण मी लिहिलं असतं तर थेट असंच लिहिलं असतं, असं सातत्याने वाटायला लावतो तो तुमचा आवडता लेखक! ही मोजपट्टी लावून बघा तुमचा आवडता लेखक तुम्हाला गवसतो का. तुमचे विचार, तुमची आर्ग्युमेंट्स, तुमचा भाव तुमच्या शब्दात, पण लेखनाच्या कौशल्याने, सफाईने व मुद्देसुदपणे मांडू शकतो तो तुमचा आवडता लेखक होतो.

मग जी. ए. कुलकर्णी अशा बहुप्रिय लेखकात मोडतात का? सॉरी, नाही. त्यांच्या लेखनासारखेच त्यांचे वाचक दर्जेदार व चोखंदळ असतीलही, पण याच कारणानं त्यांची संख्या मर्यादित राहणे क्रमप्राप्त आहे. जी. ए. कुलकर्णी काय, भालचंद्र नेमाडे काय किंवा यांच्या पठडीतले आणखी कोणी काय, ते थोर असतीलही, पण ते सामान्य वाचकांच्या आवाक्यातले नाहीत व कधीच नव्हते. सर्वसामान्य व असामान्य वाचकांना सारखेच जवळचे वाटणारे पु. ल. देशपांडे विरळा. ते प्राधान्याने विनोदी लिहित असल्याने सामान्य वाचकांनी त्यांना आपले मानले हा निष्कर्ष बरोबर नाही. विनोदी लिहिणारे खंडीभर होते व आजही आहेत. मग त्यांचं आसन पु. लं. शेजारी का मांडलं गेलं नाही? विनोदा-विनोदातही दर्जाचा फरक असतोच ना? वाचकांच्या काळजाला गुदगुल्या करणारं लेखन आणि आणखी कोणी केलंय?

वाचकांच्या गळय़ातील ताईत होण्यासाठी लेखक विनोदीच असायला हवा का? द. मा. मिरासदार, वि. आ. बुवा या ठळक उदाहरणांवरून तरी तसं वाटतं. विनोदाचं सर्वसामान्य ‘अपील’ विचारात घेता अन्य प्रकारचं साहित्य व ते प्रसवणारा साहित्यिक लोकप्रियतेचा कळस गाठणं दुरापास्त. पु. ल., जयवंत दळवी आणि व. पु. काळे यांची लोकप्रियता हेच सांगतात. हृदयाला हात घालणारी चमकदार वाक्ये यांचा व. पु. काळेंच्या निर्विवाद लोकप्रियतेत मोठा वाटा होता. पु. लं.चं अमोघ, धमाल वक्तृत्व नकळत त्यांच्या लेखनाला चार चाँद लावत होतं. बर्फीला खोका मागितल्यावर दुकानदार पु. लं.ना म्हणाला, ‘खोक्याचे पैसे पडतील हं! त्यावर तक्षणी पु. ल. म्हणाले, ‘म्हणजे बर्फी फुकट?’ हे असले किस्से अफाट गाजले व लेखक म्हणून पु. लं.ची लोकप्रियता वृद्धिगत करून गेले.

ना. सी. फडके व वि. स. खांडेकर हे कादंबरीकार त्यांच्या काळात आपल्या परीने गाजले. फडक्यांनी त्यांच्या ‘दौलत’ या वाचकप्रिय कादंबरीचं नाव पुण्यातील आपल्या बंगल्याला ठेवलं. वि. वा. पत्की हे फडक्यांच्या शैलीचं अनुकरण करीत असं त्या काळी म्हटलं जायचं. अनुकरणाचे म्हणजेच नकलेचे स्वागत करण्याचे दिवस भविष्यात येतील असं तेव्हा वाटलं नव्हतं. त्यावर बोलून मी लेखणी विटाळू इच्छित नाही.

शं.ना. नवरे, दी. बा. मोकाशी, श्री. पु. वालावलकर, श्री. ज. जोशी, वसंत सबनीस, पु. भा. भावे, सुमती क्षेत्रमाडे, स्नेहलता दसनूरकर, इंद्रायणी सावकार, विद्याधर पुंडलिक, व्यंकटेश माडगुळकर, चिं.त्र्यं. खानोलकर, रत्नाकर मतकरी, दया पवार, शंकर पाटील, उद्धव शेळके या व अशा अनेक लेखकांना वाचक होते हे निर्विवाद. पण यातलं कोणी कोणाचं अत्यंत आवडता लेखक असेल? आय डाउट. कारण माझ्यापाशी तसं कोणी बोललेलं नाही. माझ्यापाशी बोलणं ही अट नाही, पण ते सूचक असू शकतं. बाबुराव अर्नाळकरांची लोकप्रियता अगाध होती, पण ती लेखक म्हणून त्यांचं स्थान उंचावू शकली नाही.

माझा आवडता लेखक कोण असेल? मी सुरुवातीला दिलेल्या आवडत्या लेखकाच्या व्याख्येनुसार जायचं तर मीच माझा आवडता लेखक ठरतो. मला लिहायला आवडतं तसंच तर मी लिहितो. गंमत केली. एखादा लेखक बहुसंख्य वाचकांचा लाडका असण्याचं कारण जाणून घेण्यासाठी त्याच्या लेखन गुणवैशिष्टय़ांचे सखोल अध्ययन करणं आवश्यक आहे. पण ही खिटखिट करण्यापेक्षा गपगुमान त्याला आवडून घेणं श्रेयस्कर.

आता माझा आवडता लेखक सांगतो. साहित्यशुण्ड, शब्दप्रभू, कलमनवाज जयवंत दळवी. कथा म्हणू नका, कादंबऱ्या म्हणू नका, नाटकं म्हणू नका, प्रवासवर्णन म्हणू नका, विनोद तर अगदीच म्हणू नका. एकोणतीस वर्षांपूर्वी 16 सप्टेंबर 1994 रोजी दळवी आपल्याला सोडून गेले. पण आजही त्यांचा ‘ठणठणपाळ’ कुठूनही उघडून वाचाल तर खदखदून हसाल. एका साहित्य संमेलनातील जेवणाच्या पंगतीविषयी ते लिहून गेले- ‘आमचे अनंत भावे असे जेवत होते की कुणाला वाटावं हे आयुष्यातील शेवटचंच जेवण आहे.’ हा हा।़ हा।़।़
हॅटस् ऑफ टू यू, दळवी सर!
 [email protected]