
>> दुर्गेश आखाडे
5 नोव्हेंबर मराठी रंगभूमी दिनाच्या पार्श्वभूमीवर रंगभूमीची सेवा हेच उदरनिर्वाहाचे साधन निवडलेल्या कोकणातील यशस्वी रंगकर्मी अजित पाटील यांची कहाणी. पारावरची नाटकं करत पोटाची खळगी भरणारे अजित पाटील हे एक व्यावसायिक नाटय़कर्मी. रत्नागिरी म्हणजे पारावरची आणि उत्सवाच्या नाटकांची रंगभूमीच. तिच्या रुपाने अजित यांच्या घरात रोजीरोटी येतेय असं म्हणायला हरकत नाही. नाटक अनेक जण जगतात पण अनेकांना नाटक जगायला शिकवतं. अजित पाटील यांच्यासाठी रंगभूमीची सेवा हेच उदरनिर्वाहाचे साधन बनलं.
रत्नागिरी तालुक्यातील बसणी सारख्या ग्रामीण भागात जन्मलेल्या अजित पाटील यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड असल्याने गावातीलच सहकारी श्रीकांत पाटील यांच्या बरोबर पहिल्यांदा पारावरचं नाटक करण्याची संधी त्यांना वयाच्या सोळाव्या वर्षी मिळाली. ’वाहते गंगा त्यागाची’ या नाटकात वयाच्या सोळाव्या वर्षी 60 वर्षांच्या म्हाताऱयाची भूमिका करुन अजित पाटील यांनी आपले अभिनयाचे गुण दाखवले. अजित पाटील आणि श्रीकांत पाटील या जोडीने ’घोटभर पाणी’ ही एकांकिका गाजवली. राम भिसे यांच्याकडून प्रायोगिक नाटकाचे धडे गिरवल्यानंतर 19साव्या राज्य नाटय़स्पर्धेत अजित पाटील यांनी पहिल्यांदा सहभाग घेतला. यंदा 58 वी राज्य नाटय़स्पर्धा होणार आहे यावरुन अजित पाटील यांच्या रंगभूमीवरील अनुभवाचा अंदाज येतो.
ही नाटक वेडी माणसं कशी असतात याचा किस्साही भन्नाट आहे. अजित पाटील आणि श्रीकांत पाटील तेव्हा दोघेही बेकार. तरीही एकांकिका स्पर्धेची त्यांच्या डोक्यात भलतीच झिंग होती. अजित पाटील, श्रीकांत पाटील आणि त्यांच्या सहकाऱयांनी घोटभर पाणी ही एकांकिका सावंतवाडीत सादर केली. एकांकिकेच्या प्रयोगानंतर परतीच्या प्रवासात त्यांच्याकडील पैसे संपले असता अजित पाटील यांनी आपलं घडय़ाळ पन्नास रुपयाला विकलं आणि रत्नागिरी गाठली.
नोकरीच्या शोधात अजित पाटील जे.के. फाईल्स या कंपनीत रुजू झाले. त्याचवेळी जे.के. कलादर्पणच्या माध्यमातून सुहास भोळे यांच्यासोबत ’वर्कस’ सारखी एकांकिका राज्यभर गाजवली. नाटकात जसं धक्कातंत्र असतं तसेच धक्के आयुष्यातही येतात. अजित पाटील हे जे.के.फाईल्स कंपनीत मशिन्स ऑपरेटर म्हणून काम करत होते. त्यांचा एक पाय थोडा लहान असल्यामुळे त्यांना मशिनवर काम करणे त्रासाचे होऊ लागले. म्हणून त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला. नोकरी सोडल्यावर रोजीरोटीसाठी काय करायचं, हा प्रश्न अजित पाटील यांच्यासमोर पडला. अशावेळी रंगभूमीने त्यांना पुन्हा उभं रहायला शिकवले. 2000 सालापासून त्यांनी उत्सवाची आणि पारावरची नाटकं दिग्दर्शित करायला सुरुवात केली.
गेली 18 वर्षे शेकडो नाटकांचे प्रयोग सादर करुन अजित पाटील पारावरच्या रंगभूमीवरचे व्यावसायिक कलाकारच बनले आहेत. पावसाळय़ातील तीन महिने सोडले तर उर्वरित नऊ महिने रत्नागिरी, गुहागर, संगमेश्वर, लांजा, राजापूर या तालुक्यात अजित पाटील दिग्दर्शित नाटकांचे फलक पाहायला मिळतात. 1989 साली राज्य नाटय़स्पर्धेतील पहिलं अभिनयाचे प्रमाणपत्र पटकावणारे अजित पाटील यांनी नाटय़लेखक बाजीराव निकम यांच्या ’सारे पर्याय खुले,’ ’मिडासला स्पर्श’ या नाटकातून राज्य नाटय स्पर्धेत चमक दाखवली. ’मन वैशाखी डोळे श्रावण’ आणि ’मॅन विदाऊट शॅडो’ या नाटकासाठी त्यांनी राज्य नाटय़स्पर्धेत दिग्दर्शनाचे पारितोषिक पटाकवले. विजय साळवी लिखित अस्तित्व या नाटकात वाढत्या वयातही राज्य नाटय़स्पर्धेत अभिनयाचे पारितोषिक पटाकावून तरुण रंगकर्मीसमोर एक आदर्श उदाहरण निर्माण केले.
आकाशवाणीचा मान्यताप्राप्त कलाकार म्हणून बिरुदावली मिळवताना अनेक नभोनाटयाचे सादरीकरण केले. एका पाय लहान असतानाही रंगभूमीवर वावरताना अभिनयाच्या ताकदीवर ती पायातील उणीव कधीच दिसली नाही हे प्र.ल.मयेकरांच्या कुंती पार्थिवातील त्यांच्या अभिनयातून ठळकपणे सांगावसं वाटतं. दुचाकीवरुन शेकडो किमी अंतर प्रवास करत ग्रामीण भागात नाटक बसवणारा रंगभूमीवरचा व्यावसायिक कलाकार म्हणून ही त्यांची ओळख बनली आहे. कारण नाटक आणि नाटय़ कलाकार यांच्या त्यांचे वेगळे ऋणानुबंध आहे. प्रयोगाच्या वेळी एखादा कलाकार आजारी पडला किंवा आला नाही तर ते पात्रही ते साकारतात. वर्षाला 30 हून अधिक नाटकांचे दिग्दर्शन करणारे कोकणातील रंगभूमीवरचे व्यावसायिक कलाकार अजित पाटील गावडेआंबेरे आणि मराठी रंगभूमी या संस्थांचे दरवर्षी एक नाटक बसवून त्याचे 15 ते 20 प्रयोग सादर करतात. गावागावात त्यांना रंगकर्मी म्हणून आदराने ओळखतात हेच त्यांच्या कर्तृत्वाचं सुवर्णपदक आहे.





























































