खाणं आणि बरंच काही – गरमागरम… लज्जतदार

>> आरती देवगावकर

खरे तर थंडीचे दिवस असतात सर्वार्थाने तब्येत कमावण्याचे. नव्या वर्षाचे संकल्प ताजे असतात. पाऊस म्हटलं की जसं कांदा भजी, भाजलेलं मक्याचं कणीस आठवतं तसंच थंडी म्हटलं की काही खास पदार्थ आपल्याला आठवतातच. थंडीत काय खाऊ आणि किती खाऊ अशीच अवस्था असते. या हंगामात जितका पोषक आहार आपण घेऊ तितका सार्थच असतो. थंडी म्हटलं की खमंग पराठे, धपाटे, थालीपीठ आणि जोडीला लोण्याचा गोळा किंवा दही, लसणाची चटणी आणि लिंबाचं लोणचं… बस्स दिन बन गया!

संक्रांत संपली आणि सोबतच मुंबई-पुण्यातला गोठवणारा गारठाही कमी झाला. कधी नव्हे ते या शहरवासियांनी इतकी थंडी अनुभवली असेल परंतु उर्वरित महाराष्ट्रात अजूनही गारठा आहेच की. या थंडीत अंगावर उबदार रजई घेऊन गुरफटून झोपण्यात जे सुख तेच सुख लज्जतदार आणि गरमागरम पदार्थ खाण्यात. पाऊस म्हटलं की जसं कांदा भजी, भाजलेलं मक्याचं कणीस आठवतं तसंच थंडी म्हटलं की ही काही खास पदार्थ आपल्याला आठवतातच. थंडीत काय खाऊ आणि किती खाऊ अशीच अवस्था असते. या हंगामात जितका पोषक आहार आपण घेऊ तितका सार्थच असतो.

खरे तर थंडीचे दिवस असतात सर्वार्थाने तब्येत कमावण्याचे. नव्या वर्षाचे संकल्प ताजे असतात. रस्त्यावर पहाटे फिरायला येणाऱयांची वर्दळ हळूहळू वाढू लागलेली असते. काही जण खरोखरचे संकल्प पूर्ण करण्यासाठी, व्यायामासाठी तर कुणी केवळ नजरसुख घेण्यासाठी फिरत असतात. यात तुमच्या-माझ्यासारखे असतात ज्यांना सकाळच्या नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत सुगरणपणाची हौस भागवायची असते. अशाच वेळी आपली नजर जाते ती ताज्या भाज्या आणि फळफळावळाने भरलेल्या मंडईकडे. किती रंग ल्यालेले असतात आणि तो ताजेपणाचा सुगंध वेगळाच. मग काय खमंग पराठे, धपाटे, थालीपीठं आणि रंगीबेरंगी कोशिंबीरी नाश्त्याला सगळ्यांची वाट बघत असतातच.

पूर्वी दिवाळीच्या आसपास थंडी सुरू व्हायची. दिवाळीचे पदार्थ संपले की, घरोघरच्या आयांची वेगळीच लगबग चालू व्हायची. थंडीत जेव्हा शरीर सगळी पोषक द्रव्ये सामावून घेऊन आरोग्य सुधारायला मदत करत असते, अशा वेळी आपल्या नवऱयाच्या, मुलांच्या काळजीपोटी या माऊली कामाला लागायच्या. जेवणात बाजरीची भाकरी तर असायचीच, पण तिच्या उष्णतेचा त्रास होऊ नये म्हणून त्यावर आवर्जून घरच्या लोण्याचा गोळा हमखास असायचा. बाजारात या सीझनला भाज्या, फळे मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. तेव्हाही असायच्या. त्यामुळे रोजच्या जेवणात विविध प्रकारच्या भाज्या, कोशिंबिरी यांची रेलचेल असायची. आताच्या आयादेखील यात मागे नाहीत बरं! आईच ती, कोणत्याही काळातली असली तरी तिच्या वात्सल्याच्या, ममतेच्या आणि काळजीवाहू व्यक्तीच्या भूमिकेत फरक थोडाच पडणार? फरक आहे तो पदार्थ करण्याच्या पद्धतीत, त्यांच्या प्रेझेंटेशनच्या प्रकारात.

पूर्वी मुलांच्या न आवडत्या भाज्या खाऊ घालायचा राजमार्ग होता तो म्हणजे थालीपीठ किंवा धपाटे. हल्ली परोठे, कटलेट, विविध नावांचे बॉल्स अर्थात आपले मुटके, फक्त आकार जरा वेगळा. यामध्ये मुले खायला अजिबात नको म्हणतात ते मोठय़ा खुबीने लपवून खाऊ घालता येते. त्यासोबत चमचमीत, चटकदार चटणी, लोणचे, दही, गेलाबाजार टोमॅटो सॉस दिला तर समोरची ताटली कधी मोकळी होते याचा पत्ताही लागत नाही. शक्तिवर्धक पिठांमध्ये भाज्या, निरनिराळे मसाले, आंबटगोडपणासाठी दही, लिंबूरस, लिंबूसत्त्व, आमचूर यांपैकी काहीही घातले आणि त्याच्या हिशेबाने साखरेची चिमूट टाकली की, त्या पदार्थाला वेगळीच लज्जत येते. निरनिराळे मसाले वापरून चवीत बदल करता येतात. यातच खुबीने थोडा चीजचा वापर केला तर अगदी ‘तू तू मैं मैं’ करत पदार्थ संपण्याची गॅरंटी! पूर्वी घरात जे बनेल ते सगळय़ांनी खाल्लेच पाहिजे असा दंडक असे. हल्ली काही घरांत हे पाळले जात असले तरी काही घरांमध्ये पालकच एखादी भाजी पानात पडू देत नाहीत. काही घरे तर अशीही असतात, जिथे वडिलांना एखादी भाजी आवडत नाही म्हणून ती घरात आणलीही जात नाही. मग अशा घरातील मुलांना ती माहीतही होत नाही. त्याची चव आणि पोषणमूल्ये समजणे फार लांब राहिले. अशा वेळी अशा काही भाज्या, पावभाजी, मिक्स व्हेज कोफ्ता करी या नावाखाली करता येतात. काही हुशार आया तर यात कडधान्येसुद्धा बेमालूमपणे खपवतात. त्या तरी काय करणार! घरच्यांच्या प्रेमापोटी, काळजीपोटी त्यांना हे करावे लागते. एरवी ज्या पदार्थाला हातही लावला नसता असे घटक पदार्थ असलेल्या या डिशेस मात्र घरात भाव खाऊन जातात.

थंडीत जोडीला सारखे काहीतरी गरमागरम हवे असते. यासाठी वेगवेगळय़ा प्रकारची सूप करता येतात. पूर्वापार पद्धतीने केले जाणारे कढण, चिकनचा अळणी रस्सा, येसर आमटी, सार हे सगळे प्रकार थंडीत भाव खाऊन जातात. तब्येत चांगली ठेवण्यासाठी काही पदार्थ केवळ थंडीतच केले व खाल्ले जातात. त्याबद्दल आपण पुढच्या भागात पाहूच. तोवर मस्त खा-प्या आणि स्वस्थ रहा!
(लेखिका अनुवादक व समतोल या द्वैमासिकाच्या संपादक आहेत.)
[email protected]