
>> चंद्रसेन टिळेकर
दैवी शक्तीचा बहाणा करूनच हे पाखंडी बुवा-महाराज आपल्या अंगात दैवी शक्ती आहे असे भासवून लोकांना भुरळ पाडीत असतात, दिशाभूल करीत असतात. दुर्दैवाने या दैवी शक्तीवर जसे अशिक्षित-अडाणीजन विश्वास ठेवतात, तसे ज्यांनी त्यांचे प्रबोधन करायचे तो पांढरपेशा वर्गही आपल्याला अंधश्रद्धेच्या आहारी गेलेला दिसतो. अशा प्रसंगी दीडशे-दोनशे वर्षांपूर्वी अंधश्रद्धेवर कठोर प्रहार करणाऱ्या जोतिबा-सावित्रीबाईची आठवण प्रकर्षाने झाल्याशिवाय राहिली नाही.
रविवारचा दिवस होता. लिखाणाचा रतीब घालून झाला होता. संध्याकाळी कुठल्या मित्राकडे गप्पा कुटायला जावं किंवा त्याला आपल्याकडे बोलवावं याचा विचार करीत होतो. तोच फोन वाजला.पलीकडे मिसेसच्या नात्यातले म्हटले तर दूरचे नाहीतर जवळचे काका होते. ते मला म्हणाले, ”आज संध्याकाळी काय करताय?” मी म्हटलं ”तसं अजून काही ठरलं नाही.” तसे ते पटकन म्हणाले,
”तसं काही ठरवूही नका.”
”का हो?”
”अहो, आमच्या घरी पाळंदे महाराज येणार आहेत. अगदी सिद्धपुरुष म्हणून त्यांची ख्याती आहे. माझ्या घराच्या हॉलमध्येच आपण तीस-चाळीस जण जमणार आहोत.”
खरंतर मी कुठल्याच बुवा-महाराजांना भीक घालत नाही हे त्यांना चांगलं माहीत होतं. ”काका, तुम्हाला तर चांगलं माहीत आहे की, मी बुवा-महाराज असल्या लोकांवर मुळीच विश्वास ठेवत नाही.”
”अहो, ते मला चांगलं माहीत आहे. मी निलासाठी फोन केलाय.” निला म्हणजे माझी पत्नी. ”अहो त्या आमच्या हिला बऱयाच वेळा म्हणाल्या की, अलीकडे त्यांना पाठदुखीचा त्रास होऊ लागलाय. म्हणूनच तुम्हाला फोन केला. संध्याकाळी जे बाबा येणार आहेत ना, त्यांना कसली तरी सिद्धी प्राप्त झालीय. त्या सिद्धीच्या जोरावर ते असली दुखणी चुटकीसरशी गायब करतात. तेव्हा ही संधी दवडू नका. संध्याकाळी दोघेही नक्की घरी या.”
माझी तर पंचाईतच झाली. कारण हे काका तसे ‘मानी’ पंथातले होते. गेलो नसतो तर फुरगुटून बसले असते. असली आप्तमंडळी असल्या छोटय़ाशा कारणावरूनही दुरावतात. आपली परिस्थिती ‘धरलं तर चावतं अन् सोडलं तर पळतं’ अशी होते. शेवटी आम्ही पती-पत्नी मनाचा हिय्या करून त्यांच्या घरी गेलो. आम्हाला पाहताच काकांना आनंद झाला. त्यांच्या हॉलमध्ये वीस-पंचवीस महिला बसलेल्या दिसल्या. पुरुषांची संख्या मात्र हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच होती. ते सिद्धपुरुष कुठेही दिसत नव्हते म्हणून मी काकांना विचारलं, तर ते म्हणाले, “ते बाजूच्या रूममध्ये चेंज करायला गेलेत.” हा काय प्रकार आहे ते मला समजेना. मी मनात म्हटलं, इथे काय एकपात्री प्रयोग होणार आहे की काय, परंतु मी असा विचार करीत असताना भगवी कफनी घातलेला जेमतेम 30-35 वर्षांचा हिरोसारखा दिसणारा तरुण हॉलमध्ये प्रवेश करून त्याच्यासाठी ठेवलेल्या सुशोभीत चौरंगावर जाऊन विराजमान झाला. काका, बहुतांशी स्त्रियांचा भरणा असलेल्या त्या समूहातून पुढे आले आणि त्या सिद्धपुरुषाची माहिती त्यांनी सांगायला सुरुवात केली.
”कुणाच्या वाणीत सिद्धी असते ते बोलतात तसे होते, तर कुणाच्या नुसत्या हस्तस्पर्शाने पीडा दूर होते, तसे आपले हे जे महाराज आहेत त्यांच्या पायात सिद्धी आहे. अनेक जणांना त्यांनी आपल्या पदस्पर्शाने पाठीच्या दुखण्यातून मुक्त केले आहे.”
माझ्या डोक्यात प्रकाश पडला. पायात सिद्धी आहे म्हणजे हे सिद्धपुरुष ‘पायाळू’ असले पाहिजेत (Breech baby). असल्या लोकांच्या अंगात दैवी शक्ती असते असा आपल्या समाजात विश्वास आहे. खरंतर भ्रम आहे. ग्रामीण भागात तर अशा लोकांना जमिनीतले पाणी शोधून देण्यासाठी बोलवतात हे सर्वश्रुत आहे. त्यांना ‘पानाडे’ असे म्हणतात. ते त्या कामाचे चांगले 25-30 हजार घेतात. त्यांचा अंदाज चुकला तरी ते काही ना काही पैसे घेऊन पोबारा करतात. ग्रामीण भागात अजून अशा बऱयाच अंधश्रद्धा आहेत, पण शहरातल्या पांढरपेक्षा वर्गातही याबद्दल अज्ञान असावे याबद्दल मी विचार करीत असतानाच काकांनी खुणावल्यामुळे एक पन्नाशीतील बाई त्या महाराजांच्या समोर पाठमोरी जाऊन बसली. तिने आपला पाठीवरचा पदर बाजूला केला. बाबांनी तिच्या पाठीवरून आपला पाय वरून खाली फिरवायला सुरुवात केली. त्या मॅडमही डोळे मिटून कुठल्या तरी स्वर्ग किंवा इंद्रालोकात गेल्या असाव्यात असे वाटू लागले. चांगली तीन-चार मिनिटे झाल्यावर महाराजांनी दुसऱ्या महिलेला बोलावलं. आधीच्या त्या बाई इतर महिलांना “फार छान वाटते हो” असे काही तरी सांगत होत्या. निलाची तर अजिबात तयारी नव्हती, पण मी म्हटलं, “तू जा नाहीतर काका अबोला धरायचे.” मग तिनेही तो समारंभ उरकून घेतला. शेवटी फक्त पुरुष उरले होते. मग एकेक करून ते महाराजासमोर पाठमोरे बसले, पण स्त्रियांच्या पाठीवर तन्मयतेने मिनिटेच्या मिनिटे आपले पाय फिरवणारे ते स्वामी महाराज पुरुषांच्या पाठीवरून मात्र चटावरचे श्राद्ध उरकावे तसे एकदाच पाय फिरवून त्यांची बोळवण करत होते. मला हसावे की रडावे तेच कळेना. शेवटी सगळी गिऱहाईकं (?) संपल्यावर महाराज बाजूच्या खोलीत गेले आणि आपला पोशाख चेंज करून आले. चक्क एखाद्या नाक्यावर उभे रहाणाऱ्या पोरासारखे दिसत होते. आम्ही उभयता पती-पत्नीने काकांचा घाईघाईत निरोप घेऊन कशीबशी सुटका करून घेतली.
घरी परतताना माझ्या मनात सारखे विचार येत होते की, आपल्या समाजातील सर्वसामान्यांचा दैवी शक्ती तसेच दुष्ट शक्तीवर जो विश्वास आहे किंवा योग्य शब्दांत सांगायचे तर ‘श्रद्धा’ आहे ती नष्ट तरी कशी करायची? कारण दैवी शक्तीचा बहाणा करूनच हे पाखंडी बुवा-महाराज आपल्या अंगात दैवी शक्ती आहे असे भासवून लोकांना भुरळ पाडीत असतात, दिशाभूल करीत असतात. दुर्दैवाने या दैवी शक्तीवर जसे अशिक्षित-अडाणीजन विश्वास ठेवतात, तसे ज्यांनी त्यांचे प्रबोधन करायचे तो पांढरपेशा वर्गही आपल्याला अंधश्रद्धेच्या आहारी गेलेला दिसतो. अशा प्रसंगी दीडशे-दोनशे वर्षांपूर्वी अंधश्रद्धेवर कठोर प्रहार करणाऱ्या जोतिबा-सावित्रीबाईची आठवण प्रकर्षाने झाल्याशिवाय राहिली नाही.
– [email protected]
(लेखक वैज्ञानिक व वैचारिक विषयाचे अभ्यासक असून विवेकवादी चळवळीशी निगडित आहेत)































































