संचित – व्यासंगी आणि मिश्कील

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> दिलीप जोशी

कम्युनिस्ट जगात केवळ ‘डी’ या नावाने प्रसिद्ध असलेले कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांची भेट, त्यांच्या भुरळ पाडणाऱया वक्तृत्वाची आजही आठवण करून देते.

विषय होता मातृभाषेतून(च) शिक्षण घेण्याचा. त्यासाठी 1985 मध्ये अनेक दिग्गजांच्या मुलाखती घेतल्या, रेकार्ड केल्या. ही सगळी मंडळी विविध क्षेत्रांतली होती. त्याच अनुषंगाने भेट झाली ती काम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांची. 1985 मध्ये डांगे 86 वर्षांचे होते. मुंबईत दादरला त्यांच्या घरी झालेली ही भेट. चारच्या सुमारास पोहोचलो. कारण फोनवर ते म्हणाले होते की, “दुपारची थोडी झोप घेतो… तू चार वाजता ये.”
गेल्या गेल्या त्यांनी विचारले, “काय घेणारेस? चहा की काफी? मी काफी घेतो. गप्पा नंतर सुरू करू. बरं, नुसती काफी की सोबत साण्डविच?”
“नको.”
“अरे, हो म्हण. म्हणजे मला पण मिळेल” आणि ते खळाळून हसले. घरातलेच प्रेमळ आजोबा भासावेत असा चेहरा आणि एकेकाळी जागतिक कम्युनिस्ट नेतृत्वासोबत काम केल्याचा कोणताही अभिनिवेश नाही. एकूण काय तर ‘पुढारी’पणाला साजेसं काहीच नाही. एसेम जोशींकडेही मला असाच अनुभव आला होता. अगदी सरळसाधी, घरगुती वाटणारी ही व्यक्तिमत्त्वं.
लोकमान्य टिळकांपासून राजीव गांधींपर्यंतच्या राजकारणात प्रदीर्घ काळ वावरलेले आणि रशियात स्टालिनला भेटलेले, संयुक्त महाराष्ट्राच्या लढय़ात बिनीचे शिलेदार असलेले, वयाच्या पंचाहत्तराव्या वर्षी कामगारांच्या मोर्चात सामील होऊन सहजपणे एका कापड मिलच्या गेटवर चढणारे डांगे ते हेच का? असा मला प्रश्न पडला. ते माझ्या चेहऱयावरचे भाव मिश्कीलपणे न्याहाळत होते. कोपऱयातल्या स्टालिनच्या अर्धपुतळय़ाकडे नजर जाताच कम्युनिस्ट जगात केवळ ‘डी’ या नावाने प्रसिद्ध असलेले डांगे म्हणाले.
“अरे, त्या स्टालिनशी भेट झाली तेव्हा मी शेकहाण्ड करायला हात पुढे करत माझं नाव सांगितलं आणि तो गोंधळला नि म्हणाला, ‘मी जोसेफ स्टालिन!” त्या आठवणीनेही डांग्यांना हसू येत होतं. लोकमान्य टिळक चिरोलची केस संपवून हिंदुस्थानात परतले तेव्हा त्यांना इथल्या कामगारांनी मदत केली होती. त्या सभेला 1919 मध्ये डांगे हजर होते तेव्हा त्यांचे वय वीसेक वर्षांचे होते. मराठीतून शिक्षणाचा विषय निघताच ते म्हणाले, “अरे, जिथे जिथे या ब्रिटिशांच्या वसाहती होत्या ना, तिथेच इंग्लिश येत नसल्याबद्दलचा न्यूनगंड निर्माण झालेला आहे. एरवी युरोपातले सगळे नागरिक त्यांच्याच भाषेत बोलतात. रशियन, चिनी, जपानी कुठे इंग्लिश बोलतात? चालतं ना त्यांचं? मग आपल्यालाच न्यूनगंड का?”
“तोच तर प्रश्न आहे.”
“काय आहे, आपले कायदेसुद्धा मराठीत होतील. प्रशासनात मराठी येईल तेव्हा आपोआप आपली भाषा शिकावीच लागेल. आता पाड म्हणून मुलांना इंग्लिशमध्ये शिकवायचं हा ब्रिटिशांचा वारसा आहे. फाडफाड इंग्लिश बोलणारा विद्वान असतो अशी आपली भ्रामक समजूत असते. तुला सांगतो, इंग्लंडमध्येही सगळय़ांना शुद्ध इंग्लिश बोलता येत नाही! बराच काळ परक्या सत्तेखाली गेल्याने आपल्याकडे अशी न्यूनगंडाची भावना तयार झालेली आहे.”
बालपण नाशिकला गेलेले डांगे तिथल्या मराठी शाळेतच शिकले, “पण त्यामुळे आम्हाला काही उणेपणा जाणवला नाही. उगाचच शिष्टपणा म्हणून चार इंग्लिश वाक्यं टाकायची याला अर्थ नाही. शिवाय आपल्या भाषेचा अभिमान असायलाच हवा. कोणत्याही भाषेला कमी समजू नये, पण मातृभाषेत शिक्षण घेतले तर ते विद्यार्थ्यांना लवकर समजतं हा जागतिक अनुभव आहे.” डांगे भरभरून बोलत होते. मधूनच रोझाताई येऊन त्यांना काही सूचना करत होत्या. डांगे यांचा आंतरराष्ट्रीय कम्युनिस्ट चळवळीतला सहभाग, मीरत खटल्यानंतर त्यांना झालेला 13 वर्षांचा तुरंगवास अशा कितीतरी गोष्टी आमच्या चर्चेत आल्या. डांगे संस्कृत आणि फारसी भाषेचेही चांगले जाणकार होते. बहुभाषिक होते. त्याबद्दलचे किस्से ते सांगत राहिले.
त्यांचे राजकीय जीवन एका विचारधारेने प्रेरित झालेले होते. यशापयशाचा विचार न करता ते स्वत:च्या विचारांशी प्रामाणिक राहिले. त्यांच्या अनेक मतांवर त्यांच्याच पक्षातूनही टीका झाली, पण कामगारहिताचा त्यांचा ध्यास सतत होता. बदलता काळ ते अलिप्तपणे पाहत असावेत. राजीव गांधींच्या काळात जगातल्या वेगाने बदलत्या अर्थकारणाची आणि तंत्रज्ञानाची चाहूल लागलीच होती. डांगे यांचे वक्तृत्व त्यांच्या राजकीय विरोधकांनाही भुरळ पाडणारे असायचे. ते साध्यासोप्या शब्दांत प्रसन्नतेने बोलत असत. त्यांचे भाषण श्रोत्यांशी संवादासारखे असायचे. अशी अनेक भाषणे मी ऐकली होती. डांगे यांना भेटलो त्याच्या काही दिवस आधी एसेमना भेटलो होतो.
“कसा आहे तो?” डांग्यांनी विचारलं.
“हल्ली भेट होते?”
“नाही रे. दोघांचीही वयं झालीत, पण माझ्यापेक्षा लहान आहे तो आणि भेटून काय बोलणार! वाद होईल. कारण मी वात्रट आणि तो तिरसट.” हे रेकार्डर बंद केल्यानंतरचं. मला खूप हसू आलं. डांगे मला दारापर्यंत सोडायला आले. वाटलं त्यांचा प्रदीर्घ अनुभव रेकार्ड करावा. ते म्हणाले, “कधीही ये. आता मी बेकारच आहे.” नंतर ते न जमल्याची रुखरुख राहिली. उद्या डांगे यांचा स्मृतिदिन. त्यानिमित्त सारं आठवलं.

[email protected]