संचित – पडद्यावरची महाराणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>दिलीप जोशी

आपल्या देशातलं सिनेसृष्टीत अतुलनीय कर्तृत्व गाजवणाऱ्या व्यक्तीला दिलं जाणारं ‘दादासाहेब फाळके’ पारितोषिक ज्येष्ठ-श्रेष्ठ अभिनेत्री दुर्गा खोटे यांना नुकतंच मिळालं होतं आणि त्यानिमित्ताने त्यांच्या घरी मी त्यांची मुलाखत घेत असतानाचे हे ध्वनीमुद्रण.

माझ्या आश्रमातली शकुंतला आता मी भव्य राजवाडय़ात पाठवत आहे… असं सांगताना वृद्ध दादासाहेब फाळके यांच्या डोळय़ांतून अश्रू ओघळू लागले. हिंदी सिनेसृष्टीच्या रौप्य महोत्सवाचा तो समारंभ होता. म्हणजे बघा, साधारण 1938 मधला असेल. दादासाहेबांचे ते शब्द ऐकताना सारं प्रेक्षागार गहिवरलं. त्या एकाच हृद्य प्रसंगाच्या वेळी मी त्यांना पाहिल्याचं आठवतं. त्यांचं ते वाक्य मात्र माझ्या मनात कायमचं कोरलं गेलं.’’

आपल्या देशातलं सिनेसृष्टीत अतुलनीय कर्तृत्व गाजवणाऱया व्यक्तीला दिलं जाणारं ‘दादासाहेब फाळके’ पारितोषिक ज्येष्ठ-श्रेष्ठ अभिनेत्री दुर्गा खोटे यांना नुकतंच मिळालं होतं आणि त्यानिमित्ताने त्यांच्या घरी मी त्यांची मुलाखत घेत असताना त्या सांगत होत्या. माझ्या प्रथेनुसार हा संवाद ध्वनिमुद्रित होत होता.

दुर्गाबाईंनी फाळके यांना पाहिलं त्यालाही तेव्हा म्हणजे XXX मध्ये 50 वर्षांचा काळ लोटला होता. दुर्गाबाईंचं वय ऐंशीच्या घरात होतं, पण त्यांना सुरुवातीपासूनचं सारं काही अगदी स्पष्ट आठवत होतं. तरुण वयातील ‘फरेबी जाल’ ते ऋषी कपूरच्या ‘कर्ज’पर्यंतचा हिंदी चित्रपटांचा पडदा गाजवणाऱया दुर्गाबाईंचं व्यक्तिमत्त्व राजस (ग्रेसफुल) होतं. म्हणूनच त्या ‘मोगले आझम’मधल्या ‘महाराणी जोधाबाई’च्या भूमिकेत शोभल्या आणि पडद्यावर कायम तशाच थाटात वावरल्या. कोणत्याही ‘अभिनय शाळेत’ न जाता स्वतःच्या निरीक्षणावर त्यांनी आपल्या भूमिकांचे स्वभाव बेतले आणि कधी महाराणी, कधी सामान्य गृहिणी तर ‘पायाची दासी’मधली कजाग सासू आणि ‘कर्ज’मधली प्रेमळ, दुःखी आई या सर्व भूमिका त्या जगल्या. बाईंचा तो प्रदीर्घ चित्रानुभव ऐकणं हाच आमच्यासाठी एक अनुभव होता. त्यात सामील व्हायला त्यांची जबरदस्त फॅन निशा सोपारकर आणि प्रसिद्ध छायाचित्रकार दत्तू आंबेरकर माझ्या सोबत होते. मी ज्या मुलाखती ‘ऑडिओ रेकॉर्ड’ केल्या त्यातल्या या एकाच्या मुलाखतीच्या वेळचा पह्टो माझ्या संग्रही आहे.

कफ परेड भागातल्या आलिशान वस्तीत बाईंचा तितकाच भव्य फ्लॅट होता. धनलक्ष्मी त्यांच्यावर सतत प्रसन्न असावी. कारण त्यांच्या माहेरी म्हणजे सॉलिसिटर लाड यांच्या घरी चांदीचं बॉनेट असलेली ‘सिल्व्हर घोस्ट’ नावाची आलिशान (बहुधा रोल्सरॉईस) कार होती. बाईंच्या बोलण्यात या यश-कीर्ती-संपत्तीचा पिंचीतही गर्व नव्हता. श्रीमंती पचवलेली माणसं अशीच साधी असतात.

मुलाखतीच्या सुरुवातीलाच त्या म्हणाल्या, ‘‘अहो, गेले काही दिवस वृत्तपत्रं, टीव्ही वगैरेला इतक्या मुलाखती देतेय की, नवं काय सांगणार?’’ पण असा आरंभ झाला तरी आमच्या गप्पा चांगल्या दीड-दोन तास रंगल्या. आम्ही खरं तर त्यांचा फारच वेळ घेतला याची रुखरुख नंतर लागली, पण जे रेकॉर्डिंग झालं ते उत्तम होतं. आजही चाळीस वर्षांनंतर त्यातलं बरंचसं चागल्या स्थितीत आहे.

‘‘मला माझ्या सगळय़ाच भूमिका आवडल्या. प्रत्येक भूमिका वेगळी होती. दुसरं म्हणजे मी काम केलेले चित्रपटही खूप चालले. दिग्दर्शक चांगले मिळाले. ‘मोगले आझम’चं शूटिंग तर तीनवेळा झालं. आधी नर्गिस (अनारकली) चंद्रमोहन (अकबर), सपू (सलीम) आणि मी (जोधाबाई) असा संच होता. ते अर्धवट राहिलं. शेवटी पृथ्वीराज, दिलीप कुमार, मधुबाला यांच्यासह चित्रपट पूर्ण झाला.’’

हे सांगताना बाई मिस्कीलपणे म्हणाल्या, ‘‘पण आम्ही चिवट!’’ प्रत्येक वेळी त्यांचंच नाव ‘महाराणी’साठी निश्चित झालं हे खरं तर त्यांचं यश. ‘पायाची दासी’ हा आचार्य अत्र्यांचा चित्रपट. त्यातल्या कजाग सासूच्या भूमिकेसाठी त्यांनी दुर्गाबाईंना विचारलं. बाई आठवण सांगताना म्हणाल्या, ‘‘मी अत्र्यांना म्हटलं, पण मला ही भूमिका जमेल का?’’ अत्रेच ते. ते गरजले, ‘‘दुर्गाबाई, खऱया कलाकार असाल तर हा पैजेचा विडा उचला नाहीतर तलवार घेऊन फिरा! मग काय, आम्हाला डिवचल्यासारखं झालं.’’ बाईंनी ती ‘सासू’ उत्तम वठवण्यासाठी खूप मेहनत घेतली. त्यात मास्टर अविनाश (मोहिते) नायक आणि ज्योत्स्ना भोळे नायिका होत्या. तो चित्रपट मला कुठे मिळाला नाही. बाईंच्या अभिनय कारकीर्दीचे अनेक पैलू होते. ‘भाऊबंदकी’ नाटकाच्या दिल्लीत झालेल्या प्रयोगात त्यांनी आनंदीबाईंची भूमिका केली होती. नाटक पाहायला पंडित नेहरू, यशवंतराव चव्हाण अशी बरीच मोठी माणसं होती. दुर्गाबाईंच्या अभिनयाचं खूप काwतुक झालं.

आज या लेखाच्या निमित्ताने बाईंचा आवाज खूप वर्षांनी ऐकला. बरं वाटलं. कर्तृत्ववंतांच्या अशा गाठीभेटी आपल्यालाही ऊर्जा देतात. तशी मुलाखत खूपच मोठी. त्यातल्या काही गोष्टी लिहिल्या. त्या पुन्हा ऐकताना ते क्षण पुन्हा अनुभवते आले.
 [email protected]