
>> डॉ. अनिल कुलकर्णी
चांगल्या सवयी, चांगले विचार, चांगले संस्कार, चांगले वळण हे विद्यार्थ्यांचे पुढील आयुष्य मनोहर करते. केवळ भौतिक बाबतीत मनोहर नको, तर मानसिकतेतही ते मनोहर हवे. नाती जपणं ही मनोहारी अवस्था आहे. नाती दुरावली की, मन उदास होते. आपली मुले परदेशात पैसा कमविण्यासाठी जातात हे मनोहर चित्र असलं तरीही पालकांना आपल्यापासून मुलं दुरावल्याची जाणीव उदास करते.
‘आहे मनोहर तरी गमते उदास’ ही अवस्था प्रत्येकाच्या जीवनात येते. उदास वाटले की, आठवणीच्या प्रदेशात स्वैर भटकंती करावी पाखरांसारखी. आपल्याला भेटलेली माणसे आपल्या मनावर ठसा उमटवतात. कुणाचा तरी ठसा आपल्या मनावर उमटणे म्हणजे ते आपले संचित असते. भवतालच्या मनोहर गोष्टींमुळेच आपण घडतो व भवतालच्या काही गोष्टींमुळेच आपल्याला उदास वाटते. भवताल मनोहर होण्यासाठी माणसे अविरत धडपडतात, पण स्वतलाच विसरतात. कुटुंबाचे वैभव वाढविण्यासाठी माणसे झटतात व आपल्याच माणसांना वेळ देत नाहीत. मुलांना आईवडील हवे असतात, त्यांचा वेळ हवा असतो, त्यांचा सहवास हवा असतो. आईवडील व नाती नसण्याची पोकळी मुलांना असह्य होते. सजीवांचा गोतावळा सभोवताली असणे हेच मुलांसाठी मनोहर असते. कुटुंबातील नातीगोती यांची जागा निर्जीव खेळ पूर्ण करू शकत नाहीत व शेवटी येते ते उदासपण. आजची घरे भौतिक वस्तूंनी भरलेली आहेत. घरात नाते व नातेवाईक नसतात. बोलण्यासाठी, संवाद साधण्यासाठी घरात माणसेच नसतील तर उदासपण येते…कसे वाटणार मनोहर?
प्रत्येक माणसाचे बहराचे क्षण वेगळे आहेत, सुखाचे क्षण वेगळे आहेत. एखाद्याचे भेटणे मनोहारी असते, एखाद्याचे भेटणे उदास करते. आठवणींचा लेप आपण चेहऱयावर जसा लेपतो तसे रूप चेहरा धारण करते. सुखद आठवणीने चेहरा उजळतो व दुःखद आठवणीने चेहरा उदास भासतो. चेहऱयावर मुखवटे चढवणे आपल्याच हातात असते. आपण चेहऱयावर मुखवटे चढवायचे ते आपल्याच आनंदासाठी, दुसऱयाला फसवण्यासाठी नव्हे! विचार रोज येतात आणि अस्तंगत होतात. ही सातत्याने चालणाऱया प्रािढया आहे.
त्या-त्या क्षणाला त्या-त्या क्षणाचे प्राबल्य असते. क्षण हे मनावर राज्य करतात. क्षणांना जगता आले पाहिजे, क्षणांना जपले पाहिजे, क्षणावर प्रेम करता आले पाहिजे. क्षण दवबिंदूसारखे असतात. क्षणांशी झिम्मा खेळताना आनंद घ्यायचा असतो. क्षणांना जिंकणारेच जीवन जिंकतात. क्षणांना शरण जाणारे आयुष्य संपवतात. जीवन आहे तोपर्यंत विचार असतातच.
मृत्यूबरोबर विचारांची मालिका खुंटते, विचार संपतात, पण आधीचे विचार सुरक्षित असतात. व्यक्तीचे विचार ही मुदतीची ठेव असते. विचारांच्या व्याजावरच माणसे जगतात. विचारांचे संचित सगळ्यांनाच मिळत नाही. चांगले विचार पिढय़ान्पिढय़ा राज्य करतात.
विचार इतके स्फोटक असतात की, विचार माणसे मारतात. काही विचार इतके प्रेमळ असतात, इतके प्रगल्भ असतात की, माणसे कोमेजलेली असली तरीही फुलतात. चांगले विचार लोहचुंबकाचे काम करतात. ते माणसाला आकृष्ट करतात. विचारांचा पगडा फार जबरदस्त असतो. एखाद्या विचाराच्या अधिपत्याखाली जगणे माणसे आपल्या जीवनाची इतिकर्तव्यता मानतात. विचारासाठी माणसे जीव देतात, माणसे जीव घेतात.
इतिहास न वाचता नको ते विचार बोलून प्रसिद्धीच्या झोतात असलेली माणसे स्वतचे अस्तित्व हरवून बसतात, स्वतला हास्यास्पद करून बसतात. जीवन जगण्यासाठी व स्वतची जीवनशैली बदलण्यासाठी कोणाची तरी प्रेरणा व साथ हवी असते. माणसे कोठेतरी नतमस्तक होण्यासाठी पाय शोधत असतात. जीवन मनोहारी होण्यासाठी जाणिवा प्रगल्भ व समृद्ध हव्यात. यश, पैसा यांच्या मागे न लागता समाधानाचे बोट धरले की, उदासपण मागे पडते. समाधानी वृत्ती बाळगली की, सर्व भवताल मनोहर वाटायला लागते.
‘घरात असता तारे, मी पाहू कशाला नभाकडे…’ ही अवस्था घराघरांतून दिसायला हवी. मनाची समृद्धी असली की, सर्वच मनोहर भासायला लागते. मनोहर वाटणे आणि उदास वाटणे हे आपल्या मनावरच अवलंबून असते. ज्याचे त्याचे मन हे शेवटी त्याच्याच हातात असते. अशा ठिकाणी मन गुंतवावे, जिथे मनोहर वाटेल, पण उदास वाटणार नाही.





























































