
>> डॉ. मुकुंद कुळे
केवळ ग्रामीण नाही, तर शहरी रसिकांच्याही मनात लावणीला अढळ स्थान मिळवू देण्याचं महत्त्वाचं काम केलं ते केवळ सुलोचना चव्हाण यांनीच! त्यामुळे ‘लावणीसम्राज्ञी’ हा किताब खऱया अर्थाने सुलोचनाबाईंनी सिद्ध केला.
सुलोचना चव्हाण या नावातच लावणी होती. म्हणजे लावणीला ‘सुलोचना चव्हाण’ हे पर्यायी नाव म्हणून शोभावं इतपं लावणी आणि सुलोचना चव्हाण हे जुळून आलेलं समीकरण होतं. खरं तर लावणी हा कला प्रकार ग्राम संस्कृतीत रुजलेला आणि पह्फावलेला. त्याला अभिजनांच्या शहरी संस्कृतीत काहीच मानपान नव्हता. कारण लावणी म्हणजे केवळ शृंगारिक उत्तान असं लेबल तथाकथित विद्वत्तजांनी लावलेलं, मात्र सिनेमातील लावण्यांमुळे हा कला प्रकार काहीसा शहरी जनांच्या कानांवर पडायला लागला आणि लावणीची थोडी-थोडी भुरळ शहरी रसिकांनाही पडायला लागली. त्यापुढच्या काळात केवळ ग्रामीण नाही, तर शहरी रसिकांच्याही मनात लावणीला अढळ स्थान मिळवू देण्याचं महत्त्वाचं काम केलं ते केवळ सुलोचना चव्हाण यांनीच! त्यामुळे ‘लावणीसम्राज्ञी’ हा किताब खऱया अर्थाने केवळ त्यांनाच शोभून दिसतो.
लावणी गावी तर ती सुलोचना चव्हाण यांनीच! असं काय होतं त्यांच्या लावणी गायनात? कारण त्या काही परंपरेतून आलेल्या लावणी कलावंत नव्हत्या. संगीतकारांनी चाली दिलेल्या लावण्याच त्यांनी सिनेमासाठी आणि म्युझिक पंपन्यांसाठी गायल्या, पण पारंपरिक लावणीची अस्सल खूणगाठ त्यांनी म्हटलेल्या लावण्यांतच सापडते. लावणीची अदा, नखरा नि मुरका काही फक्त नृत्यांगनेच्या अंगात नसतो, त्याहून अधिक तो गाण्यात असतो हे केवळ सुलोचना चव्हाण यांनी सिद्ध केलं. लावणीसाठी जो विशिष्ट तर्ज, म्हणजे ढंग लागतो तो सुलोचना चव्हाण यांच्या गळय़ात नेमका होता. म्हणूनच त्यांची कोणतीही लावणी ऐकताना समोर प्रत्यक्ष नाचणारी नर्तकी नसली तरी चालायची. त्या केवळ आपल्या गाण्यातूनच लावणीनृत्याचा थाट उभा करायच्या.
लावणी गायिका म्हणून सुलोचना चव्हाण केवळ महाराष्ट्र नाही तर जगभर प्रसिद्ध असल्या तरी त्यांनी प्रत्यक्षात लावणी किंवा तमाशा पाहिलेला नव्हता. उलट लहानपणी जेव्हा त्या वत्सलाबाई कुमठेकर यांनी गायलेली ‘सांभाळ गं, सांभाळ गं, सांभाळ दौलत लाखाची’ ही लावणी सहज म्हणून गुणगुणायच्या तेव्हा त्यांना अनेकदा आईच्या हातचा मार पडायचा. कारण तेव्हा लावणीला प्रतिष्ठा नव्हती, मात्र लावणीला हीच प्रतिष्ठा मोठेपणी सुलोचना चव्हाण यांनी मिळवून दिली.
सुलोचनाबाईंचं माहेरचं आडनाव कदम. त्यांच्या मोठय़ा भावाचा मेळा होता, ‘श्रीकृष्ण बालमेळा’ हे त्याचं नाव. या मेळय़ात सुलोचनाबाई काम करायच्या. त्या वेळी त्यांच्याबरोबर या मेळय़ात संध्या आणि वत्सला (ज्या पुढे मोठय़ा अभिनेत्री म्हणून गाजल्या) या दोघी बहिणीही काम करायच्या. या मेळय़ात अगदी लहानपणापासून सुलोचनाबाई गायच्या. गाण्याचं कुणाकडेही रीतसर शिक्षण न घेता केवळ रेकॉर्ड ऐकून सुलोचनाबाईंनी गाण्यात प्रावीण्य मिळवलं होतं. ऐकलेलं कुठलंही गाणं त्या सहसही म्हणून दाखवायच्या. त्यांच्या या कौशल्यामुळेच त्यांच्या मेळय़ातील दांडेकर नावाचे मेकअपमन त्यांना सिनेमात गाणी गाण्यासाठी घेऊन गेले आणि सुलोचनाबाई वयाच्या अवघ्या 9 व्या वर्षी संगीत दिग्दर्शक श्यामबाबू भट्टाचार्य यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली ‘कृष्ण सुदामा’ या हिंदी सिनेमासाठी पहिलं गाणं गायल्या. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलंच नाही.
थोडय़ाच अवधीत सुलोचनाबाईंनी पार्श्वगायिका म्हणून नाव कमावलं. त्या काळातल्या सगळय़ा नामवंत गायक, गायिकांबरोबर त्या गायल्या. अगदी संगीत दिग्दर्शक सी. रामचंद्र यांच्यापासून ते मोहम्मद रफी, मन्ना डे, शमशाद बेगम, गीता दत्त अशा कितीतरी जणांबरोबर अन् तरीही त्यांचं नाव झालं ते मात्र ‘लावणीगायिका’ म्हणूनच. सुलोचनाबाईंनी गायलेली पहिली लावणी म्हणजे ‘हीच माझी लक्ष्मी’ या सिनेमातील ‘कॉलेजात गेले पती…’ आचार्य अत्रे यांच्या सिनेमातील ही लावणी हंसा वाडकर यांच्यावर चित्रित झाली होती आणि ती संगीतबद्ध केली होती प्रसिद्ध संगीतकार वसंत देसाई यांनी. ही पहिलीच लावणी सुलोचनाबाईंच्या आयुष्याला कलाटणी देऊन गेली. त्यांनी ती लावणी अशी काही गायली की, प्रत्यक्ष आचार्य अत्रे यांनी त्यांना ‘लावणीसम्राज्ञी’ ही पदवी उत्स्फूर्तपणे बहाल केली आणि मग ‘नाव गाव कशाला पुसता अहो मी आहे कोल्हापुरची, मला हो म्हणत्यात लवंगी मिरची’, ‘तरुणपणाच्या रस्त्यावरचं पहिलं ठिकाणं नाक्याचं, सोळावं वरीस धोक्याचं’, ‘फड सांभाळ तुऱयाला गं आला, तुझ्या उसाला लागल कोल्हा’, ‘कळीदार कपुरी पान’, ‘खेळताना रंग बाई होळीचा होळीचा, फाटला गं कोना माझ्या चोळीचा’, ‘कसं काय पाटील बरं हाय का, काल काय ऐकलं ते खरं हाय का’ अशा एकापेक्षा एक सरस लावण्या त्यांच्यापर्यंत चालत आल्या, मात्र सुलोचनाबाईंनी किती लावण्या गायल्या यापेक्षा त्या कशा गायल्या हे महत्त्वाचं आहे. कारण लावणी गाणं हे सोपं काम नाही. लावणीसाठी वसंत देसाई यांच्यापासून ते विठ्ठल शिंदे यांच्यापर्यंत त्यांना नामांकित संगीत दिग्दर्शक मिळाले खरे, पण लावणी गायनाचा खास पारंपरिक अस्सल ढंग त्यांनी स्वतःच आत्मसात केला आणि त्याकामी त्यांना आपल्या मिस्टरांची अतिशय मोलाची मदत झाली. साठच्या दशकाच्या सुरुवातीला आलेल्या ‘कलगीतुरा’ या सिनेमासाठी सुलोचनाबाईंनी लावणी गायन केलं होतं. त्या सिनेमाचे दिग्दर्शक होते एस. चव्हाण, त्यांच्याबरोबरच नंतर सुलोचनाबाईंचा विवाह झाला. चव्हाण मूळचे कोल्हापूरचे असल्यामुळे त्यांना पारंपरिक लावण्यांचा बाज चांगला ठाऊक होता. शिवाय ते हार्मोनियमही उत्तम वाजवायचे. साहजिकच त्यांनी सुलोचनाबाईंना लावणी गायनातलं किंबहुना सादरीकरणातलं मर्म उलगडून दाखवलं नि मग सुलोचनाबाई जणू लावणीचा ‘आवाज’ बनल्या.
सुलोचनाबाई लावणी गायला लागल्या की, आपल्या गायनातून तमाशाच्या फडातील लावणीचा अस्सल जाळ उभा करायच्या. गंमत बघा, त्यांच्या लावणी गायनातून रसिकांच्या अंगाला इश्काच्या लाख इंगळय़ा डसायच्या, पण त्याच वेळी सुलोचनाबाईंकडे पाहिलं तर तिथे साक्षात शालिनता बसलेली असायची. रसिकांसमोर गाताना त्यांनी कधीच नजर वर करून गायलं नाही. त्यांची नजर कायम रंगमंचावरील मोकळय़ा जागेवरच खिळलेली असायची. एकदा मी त्यांना त्यासंबंधी विचारलं होतं तेव्हा त्या म्हणाल्या होत्या, ‘गाताना मी नजर वर उचलत नाही. कारण जेव्हा लावणी म्हणत असते तेव्हा नजरेसमोर शब्दच नाचवत असते. शब्दांच्याच पायात घुंगरू बांधलेले असतात’ आणि ते खरंच होतं. लावणी गाताना त्या अशा काही रमलेल्या असत की, जणू काही त्यांच्यासमोर प्रत्यक्ष लावणीच नाचतेय.
लावणी गायनाचं त्यांनी कमावलेलं हे खास कसबच त्यांना नावलौकिक देऊन गेलं, मात्र याचमुळे त्या काहीशा पार्श्वगायनाच्या मुख्य प्रवाहाबाहेरही फेकल्या गेल्या. ज्ञानाचं कुठलंही क्षेत्र असो, त्यावर कायम मूठभरांचीच मत्तेदारी राहिलेली आहे. उच्च संस्कृती, उच्च कलात्मकता, उच्च आचार-विचार या साऱया कल्पना, संकल्पना मूठभरांनी आपल्या सत्तेच्या सोयीसाठी राबवल्या. यातूनच जीवनशैलीपासून कलाशैलीपर्यंत ते थेट अभिरुची, अभिव्यक्तीपर्यंत भेदाभेद निर्माण झाले. याची झळ संगीतक्षेत्रालाही पुरेपूर बसली. त्यातूनच 19 व्या शतकाच्या मध्यापासून ते 20 व्या शतकाच्या शेवटापर्यंत शास्त्र्ााrय संगीताच्या मैफली किंवा नाटक, सिनेमातील गाण्यांतून जे संगीत प्रसृत होत राहिलं ते प्रामुख्याने बुद्धिजिवी आणि मध्यमवर्गीय होतं. त्यात अभिरुचीचा विचार पहिल्यांदा केला जायचा. त्या गाण्यांचे शब्दही जपून वापरलेले असायचे, संगीतही तसंच. उत्फुल्ल, पण भावनांना थोपवून ठेवणारं. भावनांचा कुठेच उद्रेक होऊ न देणारं. शब्द, संगीत एकाच वेळी दिल खूश करणारं, पण त्याच वेळी भावना आटोक्यात ठेवायला लावणारं. जणू एकप्रकारे सामाजिक साधनशुचिता शिकवणारीच ही गाणी होती, पण यामुळेच लोकशैलीतील संगीत प्रकाराला फार समाज मान्यता कधी मिळाली नाही. त्याकडे कायम उच्छृंखल म्हणूनच पाहिलं गेलं आणि याचीच झळ सुलोचनाबाईंनाही बसली. त्यांनी गायलेल्या सगळय़ाच लावण्या गाजल्या. त्यांच्या लावण्यांवर मराठी रसिकांनी भरभरून प्रेमही केलं. त्यांच्या लावण्या गाजल्या कारण, त्यांचा आवाज लावण्यांतला आशय रसिकांच्या मनात थेट पोचवायचा. ती सुलोचनाबाईंच्या खर्जयुक्त आवाजाची आणि शब्दफेकीची ताकद होती, परंतु अशा लावण्या गायल्यावर थोडय़ाच कालावधीत ‘लावणीगायिका’ असा टॅग लावून सुलोचनाबाईंना गाण्याच्या मुख्य प्रवाहातून बाजूला सारलं गेलं.
अर्थात यामुळे सुलोचनाबाई किंवा लावणी काही छोटी ठरली नाही. उलट सुलोचनाबाईंनी लावणी गायनात स्वतःला एवढं मोठं केलं की, गायनाच्या क्षेत्रात त्यांच्याआधी ‘लावणीसम्राज्ञी’ झाली नाही आणि यापुढेही होणार नाही.





























































