
हर्षवर्धन दातार
मोजके कलाकार, कसलीही गुंतागुंत नसलेला साधासुंदर, सोपी कथा असलेला आणि नितांतसुंदर संगीत लाभलेला एक काwटुंबिक चित्रपट बाजी मारून गेला तो म्हणजे बासू चॅटर्जी, अमोल पालेकर, रवींद्र जैन आणि येसूदास यांचा ‘‘चितचोर’. आज आपण चर्चा करणार आहोत येसूदासनी गायलेल्या ‘आज से पहले आज से ज्यादा खुशी आज तक नही मिली’ या गाण्याबद्दल.
सत्तरच्या दशकात शेवटी राजेश खन्नाची जादू ओहोटीला लागली होती त्याच सुमारास क्षितिजावर एक ‘अँग्री यंग मॅन’ प्रवृत्तीचे वादळ घोंगावू लागले होते आणि प्रेक्षकांचा कल ‘दे मार’ हाणामारीच्या चित्रपटांकडे वळू पाहत होता. नेमका त्याच सुमारास ‘चितचोर’ बॉक्स ऑफिसवर यशस्वी झाला आणि त्याला अनेक सन्मान व नामांकने मिळाली. ‘गोरी तेरा गाव बडा प्यारा’ या गाण्याकरिता सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक म्हणून येसूदासना राष्ट्रीय सन्मान, सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा राष्ट्रीय सन्मान राजू श्रेष्ठला आणि सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिकेचा फिल्मफेअर सन्मान हेमलताला. तसेच फिल्मफेअर नामांकन होते सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट गायक येसूदास आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक बासू चॅटर्जी या सर्वांचे. ‘चितचोर’ने एक गोष्ट मात्र सिद्ध केली. टुमदार खेडेगावातील हिंदुस्थानी रूढीपरंपरा व संस्कारांनी नटलेली साधी कथा, मधुर संगीत, सहजसुंदर अभिनय असेल तर आपले प्रेक्षक अशा कलाकृतीला उत्तम प्रतिसाद देतात. ही साधीसोपी व सरळ कथा आहे एका छोटय़ा गावातील अल्लड निरागस गीता (झरिना वहाब), विनोद (अमोल पालेकर) आणि सुनील (विजयेंद्र घाटगे) या तिघांची. गैरसमजुतीमुळे गीताचे आईवडील विनोद (अमोल पालेकर) हेच गीताकरिता संभाव्य स्थळ आहे असे समजून त्याची खूप सरबराई करतात. नंतर जेव्हा विनोदचा साहेब उच्चशिक्षित सुनील (विजयेंद्र घाटगे) गावात येतो तेव्हा त्यांना समजते की, सुनील हाच गीताच्या बहिणीने सुचविलेला मुलगा आहे आणि ते विनोदकडे दुर्लक्ष करायला लागतात. विनोदच्या बाबतीत त्यांचा व्यवहार रूक्ष होऊ लागतो. मात्र गाणे शिकविणारा, हसतमुख दिलखुलास स्वभावाचा विनोद गीताला भावतो. विनोदलाही गीता आवडायला लागते. वस्तुस्थिती उघड झाल्यावर चित्रपटातील वातावरण थोडे गंभीर वळण घेते, पण गीता आपल्या निर्णयावर ठाम राहते. सुनीलला जेव्हा विनोद आणि गीता यांचे परस्परांवर प्रेम आहे असे कळते तेव्हा तो खिलाडू वृत्तीने बाजूला होतो आणि त्याच्याच पुढाकाराने शेवटी खऱया प्रेमाचा विजय होतो आणि चित्रपटाचा गोड शेवटही. चित्रपटातली चारही गाणी त्यातील शब्द, आशय, संगीत नियोजन आणि गायकीमुळे श्रोत्यांना भावली.
बासू चॅटर्जी यांच्या ‘छोटी सी बात’ चित्रपटातील ‘जानेमन जानेमन’ या लोकप्रिय गाण्यातून पुढे आलेल्या येसूदासना ‘चितचोर’मध्ये चारही गाण्यांत गायची संधी मिळाली. शास्त्र्ााrय संगीताची बैठक असलेली ‘जब दीप जले आना’ आणि ‘तू जो मेरे सूर मे सूर मिला दे’ ही दोन युगुलगीते आणि मोकळेपणाच्या आविर्भावातील दोन एकल गाणी आजही लोकप्रिय आहेत.
चित्रपटाच्या उत्तरार्धात विनोद, गीता, सुनील आणि दीपू (मास्टर राजू) हे चौघे पिकनिकला जातात तेव्हा ‘आज से पहले…’ हे गाणे चित्रित केले आहे. गीता उदास, विमनस्क आहे, पण विनोद मात्र उत्साहात आहे. विनोदच्या संगीत शिकवणीत तयार होत असलेल्या गीताला गाण्याचा आग्रह होतो, पण उदास गीता नकार देते आणि विनोद आपल्या खेळकर स्वभावाला अनुसरून गाणे म्हणतो. जीपमधून पिकनिकला जात असताना गाणे सुरू होते. डोंगराच्या वळणदार रस्त्यावर धावणाऱया जीपच्या वेगाची लय पकडून अकॉर्डिअन व्हायोलिन, गिटार आणि ड्रम्सच्या साथीने गाणे सुरू होते. सुरुवातीचं सुंदर वाहतं संगीत एकूणच आनंदाचा, पिकनिकचा ‘मूड’ तयार करतं.
आज से पहले आज से ज्यादा,
खुशी आज तक नही मिली
इतनी सुहानी, ऐसी मिठी,
घडी आज तक नहीं मिली
हा दिवस खूप आनंदाचा आहे, इतका आनंद मला आतापर्यंत कधीच मिळाला नव्हता. इतके सुख, इतका आनंद की, तो गगनात मावेनासा झाला आहे. इतकी प्रसन्न, इतकी गोड घटिका आजपर्यंत माझ्या आयुष्यात कधीच आली नव्हती.
इसको संजोग कहें या किस्मत का लेखा,
हम जो अचानक मिले हैं
मनचाहे साथी पा के हम सबके चेहरे
देखो तो पैसे खिले हैं
इन तकदीरों को, जोड दे ऐसी
कडी आज तक नहीं मिली
हा केवळ योगायोग आहे की माझं नशीब जोरावर आहे, की आपण एकमेकांना असे अचानक भेटलो आणि आता भेटून मनंसुद्धा जुळली आहेत. या मनासारख्या घटना घडल्यामुळे आणि मनासारखा जोडीदार मिळाल्यामुळे आपले चेहरे आनंदाने फुलले आहेत. आपल्या भाग्यरेषा एकमेकांना जोडणारा प्रेमाचा दुवा आज आपल्याला सापडला आहे.
सपना हो जाये वो पूरा जो हमने देखा
ये मेरे दिल की दुआ है
ये पल जो बीत रहे हैं इनके नशे में
दिल मेरा गाने लगा है
हम इसी खुशी को, ढूंढ रहे थे
यही आज तक नहीं मिली
आपण पुढील आयुष्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहू म्हणजे आपली सर्व स्वप्नं पूर्ण होतील. उज्ज्वल भावी आयुष्याचं जे स्वप्न आपण बघितलं आहे ते पूर्ण व्हावं ही मंगल कामना आहे. या अमूल्य आनंदाच्या क्षणात मी भिजून निघतो आहे. माझं मन, शरीराचा कण न् कण आनंदाचे गाणे गायला अधीर आहे. जो आनंद, जी परिपूर्णता आपण आयुष्यभर शोधत होतो ती आज आपल्याला गवसली आहे.
गाण्याचा पहिला भाग इथे संपतो. विनोद गीताबरोबरच्या पुढील आयुष्याची स्वप्न रंगवतो आहे. मात्र गाण्याच्या या भागानंतर परिस्थिती बदलते आणि सुनील विनोदला सांगतो की, कामाबरोबर तो गीताला पाहायला पण आला आहे आणि ती त्याला पसंत आहे. विनोदला धक्का बसतो. त्याचं स्वप्न भग्न होणार हे समजून तो दुःखीकष्टी होतो, पण तरीही स्वतःला सावरतो. गाण्याचा शेवटचा अंतरा हा पिकनिकनंतर परतीच्या प्रवासात चित्रित झाला आहे. वातावरणात तणाव आहे आणि तो गाण्याच्या लयीत प्रकर्षाने जाणवतो. आता विनोद जीप चालवतो आहे आणि या शेवटच्या कडव्यात त्याची खंत व्यक्त होते. इथे सॅक्सोपह्न सूर गाण्यात खिन्नतेची किनार देतात…
अंतःकरणात कल्लोळ आहे, वादळ उठले आहे. माझ्या आत कुठेतरी जखम झाली आहे, पण तरीही चेहऱयावर मी ते दिसू देत नाही. डोळ्यात आनंदाश्रू आहेत. प्रेमभंग झाला असूनही विनोदच्या मनात गीताच्या पुढील आयुष्यासाठी सदिच्छाच आहेत.
बासू चॅटर्जीनी गीतकार, संगीतकार रवींद्र जैन यांच्या साथीने या गाण्याची सुंदर विभागणी केली आहे. या गाण्याची संकल्पना, शब्द, संगीत, कथेच्या नाजूक आणि योग्य वळणावर त्याची मांडणी तसेच कल्पक चित्रीकरण, प्रसन्न व उदास अशा दोन भागांत त्याची विभागणी, वाहता वाद्यमेळ आणि येसूदासची अमोल पालेकरांच्या भूमिकेला साजेशी गायकी हे ‘टोटल पॅकेज’ आहे. संपूर्ण चित्रपटात विनोद आणि गीताचे एकमेकांबद्दलचे प्रेम हे उघडपणे कधीही व्यक्त होत नाही. त्यात एक प्रकारची निरागसता दिसते. या गाण्याचे एक वैशिष्टय़ म्हणजे हे गाणे दोन भागांत आहे. मुखडा आणि पहिले दोन अंतरे प्रवासाच्या पहिल्या भागात आहेत, जेव्हा सगळे पिकनिकला जात असतात. गीताला सोडून इतर तिघे आनंदात आहेत. गाण्याचा मूड प्रसन्न, आल्हाददायक आहे. मात्र मध्येच कथेतला मूळ मुद्दा पुढे येतो. सुरुवातीच्या गैरसमजुतीवरचा पडदा उघडतो. विनोदला खऱया परिस्थितीचे आकलन होते. तरीही तो स्वतःला सावरतो आणि आपले दुःख लपवतो. तिसऱया अंतऱयात विनोदचे उदास, खिन्न भाव त्याच्या देहबोलीतून आणि शब्दांतून तसेच त्याला साजेशा किंचित धीम्या लयीच्या संगीत आणि गायकीतून व्यक्त होतात.
येसूदासचा आवाज अमोल पालेकरला चपखल बसला आहे. वाद्यमेळात गिटार, अकोर्डियन, व्हायोलिन, सॅक्सपह्न बॉन्गोचा योग्य ठिकाणी वापर, गाण्याला एक सुंदर लय आहे. मध्ये वाजणारी शीळ एकूण वातावरणाला प्रसन्न आणि आल्हाददायक बनविते. एक मध्यमवर्गीय आणि अगदी आपल्यातला ‘शेजारी’ वाटणारा विनोद (अमोल पालेकर) आणि खेडेगावातली निरागस, अल्लड, पण स्वतःचे स्वतंत्र विचार असणारी गीता (झरिना वहाब) या दोन्ही मुख्य भूमिका सार्थ वाटतात. राग यमन कल्याणवर आधारित ‘जब दीप जले आना’ आणि ‘पिलू’वर बेतलेलं ‘तू जो मेरे सूर मे सूर मिला दे’ या दोन उत्कृष्ट रागदारीवर आधारित गाण्यांनी या कथेला एक सुंदर सांगीतिक बाज दिला आहे. ‘गोरी तेरा गांव बडा प्यारा’ या गाण्यातून तर गीतकार-संगीतकार रवींद्र जैन आणि गायक येसूदास यांनी एका छोटय़ाशा गावाचं आणि तिथे राहणाऱया साध्या लोकांचं संपूर्ण चित्र आपल्या डोळ्यापुढे उभं केलं आहे. चित्रपटातील सगळी गाणी आजही अत्यंत लोकप्रिय आहेत.
(लेखक संगीत अभ्यासक आहेत)































































