लेन्स आय – प्रणयरंग…

>> ऋता कळमणकर

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं! माणसाचं काय, पक्ष्याचं काय, प्राण्याचं काय आणि फुलपाखरंच काय सेमच असतं…

परमेश्वराने सजीव सृष्टी निर्माण केली आणि ती सतत अस्तित्वात राहावी म्हणून प्रजोत्पादनाची व्यवस्था केली. नर आणि मादी बनवून त्यांच्यात आकर्षण निर्माण केले. जीवसृष्टी अविरत चालू राहिली. प्राणी, पक्षी, सरपटणारे प्राणी, मानव या सर्वांच्याच आयुष्यात महत्त्वाची बाब म्हणजे प्रजोत्पादन. त्यासाठी पक्ष्याचा विणीचा काळ किंवा हंगाम ठरलेला असतो.

पक्ष्यांच्या शरीरात तसेच त्यांच्या वागण्यात बदल होतात. अगदी साधासा पांढरा गायबगळा (एग्रीट) विणीच्या काळात मानेवर दिमाखदार सोनेरी झळाळती लव बाळगतो आणि मादीला आकर्षित करतो. मोरपिसारा फुलवून नाचतो. तो नाच लांडोरीसाठी तर असतो. नर कोकीळ त्याच्या मादीसाठी सुंदर ताना घेतो. त्याची ‘कुहू कुहू’ आपण सर्वांनीच ऐकली आहे. नीलकंठ त्याच्या मादीला निरनिराळ्या हवाई कसरती करून दाखवतो. तोंडाने ‘चक…चक…’ आवाज करून तिचे लक्ष वेधतो. सारसांच्या जोडीने केलेला नाच तर प्रसिद्धच आहे. तो धुंद प्रणयी नाच पाहणे यासारखा सुंदर अनुभव नाही. माळढोक पक्षी गळ्याजवळची पिशवी फुलवून ‘हुम हुम’ आवाज करून मादीसमोर इकडून तिकडे ऐटीत चालत जातो. त्याचा दिमाख पाहून भुलते. गालापागोस या बेटावर असणारा फिजीद पक्षी त्याच्या गळ्याजवळ लालबुंद मोठी पिशवी फुलवतो. इतर नरांपेक्षा आपला गळ्याजवळचा फुगा मोठा आहे हे पटवून देतो.

मेलसाठी फिमेलला आकर्षित करणे सोपे नाही. आपण इतर नरांपेक्षा कसे श्रेष्ठ आहोत, कसे ताकदवान आहोत हे दाखवण्याची चढाओढच लागते. प्रत्येक पक्षी विणीच्या काळात अतिशय सुंदर रंग धारण करतो. काही पक्षी घरटी बांधतात, उदा. वीव्हर मादीला पसंत नाही पडले तर मोडून दुसरे बांधतात.

पोपट नरमादी फांदीवर एकत्र बसून नाजूक आवाजात एकमेकांचे लक्ष वेधून घेतात. ससाणा हा पक्षी शिकार हवेत हेलकावत सोडतो. मादी ती शिकार बरोबर झेलते. जांभळी पाणकोंबडीचा नर गवताचे पाते तोंडात धरून मादीचे लक्ष वेधून घेतो. तिच्यासाठी कमळाचे कंद खाणे म्हणून आणतो. असे सांगतात की, पेंग्विन हा चांगले चांगले पेबल (समुद्री दगड) वेचून त्याला आवडलेल्या मादीला देतो. पक्षी विणीच्या काळात स्वतःची टेरिटरी साम्राज्य बनवतात. तेथे इतर नरांना येऊ देत नाही.

वाघ, सिंह, हत्ती हे प्राणी त्यांच्या फिमेलच्या युरिन स्प्रेवरून ती प्रजोत्पादनासाठी तयार आहे हे ओळखतात व मागोवा काढतात. हत्ती तर झुंडीत राहत असल्यामुळे त्याला झुंडीतील योग्य मादी पटकन कळते. पुढे मुलांची काळजी, त्यांना मोठे करणे हे सर्व कळपातील माद्या मिळून करतात. वाघ-वाघीण प्रथम रिंगणात फिरल्यासारखे एकमेकांभोवती गोल गोल फिरतात. दोघेही एकमेकांच्या पसंतीस उतरले तर मग काही दिवस एकत्र राहतात. सिंह आणि सिंहीण काही काळ एकत्र राहतात. साधारण आठ ते 10 दिवसांचा काळ एकत्र घालवतात. मग सिंहीण शिकार करून आणते. खाणे झाले की, आपापल्या मार्गाने जातात.

हरणाचे नर एकमेकांकडे शिंगे रोखून मारामारी करतात. त्याचप्रमाणे हे मीटिंगसाठी कॉल देतात. मारामारीनंतर विजयी नर त्याची जोडीदारीण निवडतो. डिंक डिंक नावाचे छोटे हरीण जन्मभर एकाच जोडीदारासोबत राहते. त्याचप्रमाणे पक्ष्यांमध्ये हॉर्नबिल आणि सरसाची जोडीही एकमेकांशी एकनिष्ठ राहते. फुलपाखरे प्रणयादरम्यान एकत्र विहार करतात. हवेत मेटिंग पेअर दिसते. कोळ्यांच्या काही प्रजातीत मीलनानंतर कोळीण नर खाऊन टाकते असे म्हणतात. चित्ता नर युरिन स्प्रेवरून मीलनास योग्य मादी शोधतो. एरवी ते एकत्र राहत नाहीत. काही काळासाठी एकत्र येतात. काही प्राणी एकाच जोडीदारासोबत राहतात, परंतु मोठय़ा संख्येने प्राणी, पक्षी हे प्रत्येक विणीच्या हंगामात वेगळा जोडीदार शोधतात. जिराफ जोडी लांबलचक माना एकमेकांत गुंतवून प्रेम करतात. पोलर बेअरसारखा अतिशय सुंदर पण हिंस्र प्राणी एकटाच फिरतो. मादीसोबत मोजकाच काळ घालवतो. मादीनंतर बर्फाची गुहा शोधून तेथे पिलांना जन्म देते. अशी ही प्राणीपक्ष्याचे प्रेमाची दुनिया. सुंदर, निरागस आणि रोखठोक!

[email protected]