कवडसे – जाणिवा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> महेंद्र पाटील

कधी कधी काही नात्यांची गोष्ट खूप वेगळी असते. अनेक वर्षे ओलांडून जातात तरी त्या नात्याचा थांग लागत नाही. त्या नात्याचा अर्थ कळत नाही आणि कदाचित त्या नात्याला नावसुद्धा दिलं जात नाही. असंच काहीसं आपलं नातं असावं असं वाटू लागलंय मला.

तुझ्या येण्या-जाण्याच्या रस्त्यावर एका संध्याकाळी सहज भेटलो होतो आपण. औपचारिक ओळख झाली तेव्हा लक्षात आलं आपलं आभाळ एकच आहे. हाकेच्या अंतरावर राहात असूनही कधी कधी समोर यायला खूप वेळ लागतो. तसंच आपल्याही बाबतीत झालं, पण त्या संध्याकाळी प्रत्यक्ष भेट झाल्यावर माझ्या मनाला तुझ्या मनाची एक अनामिक ओढ वाटू लागली. पुढे हळूहळू अनेक वळणांवर, अनेक वाटांवर तुझी माझी भेट होत राहिली. कधी आपल्यात खूप चांगलं बोलणं व्हायचं, तर कधी अनेक दिवस विनाकारण अबोला…आपण का बोलत होतो याचं उत्तर तू शोधलं नाहीस आणि आपण का बोलत नव्हतो याचं उत्तर मी शोधलं नाही. त्यामुळे समज-गैरसमज वाढत गेले. आपल्यातलं अंतर वाढत गेलं.

काळ आपल्या वेगाने पुढे सरकत राहिला. आपणसुद्धा हळूहळू मोठे होऊ लागलो. बालपण सरले आणि तारुण्याच्या उंबरठय़ावर येऊन आपण पुन्हा एकदा नव्याने भेटलो. आता तरी तुझ्या-माझ्या गोष्टीतला अर्थ कळून आपली गोष्ट सुरू होईल असं वाटलं, पण तसं काही झालं नाही. दिवस नवीन होते, ऋतू नवीन होते. काळसुद्धा बदललेला, पण आपली गोष्ट मात्र तशीच तिथेच होती. आताचा आणि तेव्हाचा अबोला मात्र वाढत गेला. आपलं आभाळही वेगळं झालं होतं. त्यामुळे येण्या-जाण्याच्या वाटेवर भेटसुद्धा कधी व्हायची नाही.

खूप दिवस असेच निघून गेले आणि मनात उरली एक अनामिक हुरहुर. आपल्या अधुऱया भेटी, आपले अधुरे क्षण, आपल्या मनातील अबोल नि:शब्द भावना, आपल्या राहून गेलेल्या भेटी, तुला सांगायचं राहून गेलेलं सगळं काही मनातल्या मनात तसंच राहिलं. पुन्हा एक तप ओलांडून गेलं. तुझं शहर आता वेगळं झालं. तुझ्या वाटा आता वेगळय़ा झाल्या. तुझ्या नात्याचे निकषसुद्धा बदलले आणि तू पुन्हा भेटशील या आशासुद्धा मावळल्या कायमच्याच, पण आपल्या आयुष्यात नियती नावाचा जो काही प्रकार आहे ना तो काही आपल्या मनाला स्वस्थ बसू देत नसतो. पुन्हा एकदा नियतीच्या कृपेने आपण तुझ्या नव्या शहरात, नव्या वाटेवर, पुन्हा एकदा नव्याने भेटलो…आणि पुन्हा आपल्या मनातल्या जुन्या जाणिवा जिवंत झाल्या. आता आपण आपल्या नात्याची गोष्ट आणि त्यातला अर्थ शोधू लागलो. तुझ्या-माझ्या मनातले सारे अबोल शब्द, साऱया अबोल भावना, मनातले अव्यक्त प्रेम हळूहळू उलगडून शब्दांच्या रूपाने बाहेर येऊ लागले. तेव्हा जाणीव झाली आपली गोष्ट ही मैत्रीची गोष्ट नव्हती. आपली गोष्ट ही ओळखीची गोष्ट नव्हती. खरं तर आपली गोष्ट ही ‘प्रेमाची गोष्ट’ होती, पण वेळेवर व्यक्त न होता आपण एकमेकांची वाट पाहत राहिलो. त्यामुळे मनात फुटलेला प्रेमाचा अंकुर कधी उमललाच नाही.

…आणि आता अशा ऋतूंत आपण भेटलोय की, आता फुलांचा ऋतू येणे नाही. आता मनात फक्त उरल्या कोमेजलेल्या भावना आणि ओसरलेले ऋतू…आपल्या भेटीनंतर कदाचित आता नवा वसंत फुलावा, तुझ्या-माझ्या प्रीतीचा नवा पाऊस यावा, आपल्या जाणिवा सतत भिजत ठेवणारा…