
>> मंगेश उदगिरकर
आयुष्यातल्या अनोख्या अनुभवांसारखी वेगवेगळ्या टप्प्यांवर भेटलेली माणसं मनाच्या कप्प्यात अलगद विसावतात. अल्पकाळ वेडावणारी तर कधी दीर्घकाळ रेंगाळणारी, पण मनाच्या अंगणात त्यांच्यातली अपूर्वाई तशीच राहते. हे तरल अस्तर उलगडताना भेटलेल्या अवलियांविषयी.
उंची पाच फुटांवर दोनेक इंच. डोईवर कायम गांधी टोपी, काळसर वर्ण, पाणीदार लहानसे डोळे, सरळ नाक, वरती वळवलेल्या शुभ्र मिश्या, दाढीचे पांढरे खुंट, अंगात सदरा आणि कोल्हापुरी लुंगी. फार दिवसांनंतर इतके अफलातून व्यक्तिमत्त्व माझ्या पाहण्यात आले.
“मी काय सांगतूय, मी तुमची क्षमा मागतूय, तुमी सगळे माझ्यासाठी देव हायसा. मी अंगठाछाप आडानी मानुस. मला सांगा देव कुट आसतूय?”
आमच्यापैकी एकाने आभाळाकडे हात केले.
“चूक.”
“आपल्या सगळ्यामध्ये!” मी तोंड घातले.
“शाबास रे माज्या वागा. ह्यो मानुस खरं बोलला बगा. मला मापी करा. मी आडानी मानुस, पन परमेसुर परतेक मानसामधी अस्तुय. कुटं दगडासमुर जाऊन डोकं आदळताय, आपल्यासमुर देवासारका मानुस बसल्याला हाय, तेच्याकड बगा की.”
आमच्या सोसायटीत आम्हा ज्येष्ठ नागरिकांच्या टोळीत कोल्हापूरकर पाटील सामील झाले आणि आमच्या गप्पांना रंगत चढली. ही लहानखुरी मूर्ती आमच्या जवळची होऊन गेली. त्यांचे वास्तव्य कोल्हापूरचे, पण अधूनमधून मुलाला भेटायला इथे यायचे आणि मग रमून जायचे. दोनेक आठवडे झाले की, त्यांना गावाकडची आठवण यायची.
“आता आमचा मुक्काम संपला. माजी काळी माय मला हाकारे घालाय लागली बरं का, आमचा रामराम घेवा.”
आमचे दुर्मुखलेले चेहरे पाहून,
“अवो, मी येतुय की दोन-चार म्हैन्यात. मलाबी तुमच्याशिवाय करमना. लई जीव लावला बगा तुमी.”
पाटील अक्षरशत्रू असले तरी त्यांची समज आम्हा पढतमूर्ख लोकांच्या डोळय़ांत अंजन घालणारी होती, नव्हे आहे. पोथ्यापुराणे वाचून, तथाकथित अध्यात्म अंगात मुरवून कर्मठ अवस्थेला पोहोचलेल्या आम्हाला या निरक्षर माणसाने त्याच्याही नकळत एक चपराक मारली होती.
एकदा सकाळी मी एकटाच बसलो होतो. तेवढय़ात पाटीलबाबा आलेच.
“येकटेच?”
“हो, अजून कुणी आलं नाही.”
“बरं झालं, कधी कधी येकलं बसल्यालं बरं हातंय.”
“का?”
“अवो त्या निमतानं सवताशी बोलायला येळ घावतोय!”
मी सर्दच झालो.
“बाबा, तुम्हाला खरंच वाचता-लिहिता येत नाही की, उगी नाटकं?”
“न्यानेसराच्यान मी आडानी गोळा. म्या कंदी साळा सिकलोच न्हाई, पर… ”
“पण काय?”
“कुस्ती मातर सिकलो बगा. तसा म्या लहान चनीचा, पन भल्याभल्यांना आस्मान दाखीवलय बगा.”
या गृहस्थाचा ठाव लागणे मुश्कील आहे हे कितव्यांदा तरी मला समजले.
गावाकडे जाताना आमचा निरोप घेताना…
“तुमी सगळे ज्ञानी हायसा. तुमच्यासमुर मी आडानी, पन तुकोबा काय सांगून गेले?”
की, लगेच तुकोबाच्या अभंगाचे पारायण सुरू.
“माऊली काय म्हंत्यात!” ज्ञानेश्वरीचे निरूपण चालू.
लिहू-वाचू न शकणाऱया या माणसामध्ये हे सगळे कुठून आले असेल? हा माझ्यासमोर पडलेला प्रश्न आहे. अर्थात कुठेतरी कानावर आलेल्या प्रवचनांचे, कीर्तनांचे हे फळ असूही शकेल, पण एवढे पाठांतर? बरं, केवळ पोपटपंची म्हणावे तर तसेही नाही, तर यातले घ्यायचे तेवढेच घेऊन त्यातून स्वत:ची एक माणुसकीच्या पातळीवरची विचारसरणी या अक्षरशत्रू माणसाने कशी तयार केली असेल? हे सगळे अनाकलनीय आहे. देवाचे अस्तित्व आहे की नाही? या कोडय़ात अडकलेल्या माझ्यासारख्यांना पाटलांच्या निमित्ताने हे कोडे सुटल्यासारखे वाटते हे मात्र खरे.
[email protected]





























































